वेब न्यूज – टॅक्सच्या विश्वात

>> स्पायडरमॅन

 आपल्या  अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच हिंदुस्थानचे बजेट सादर केले. आपल्या देशात इन्कम टॅक्स आहे, जीएसटी आहे अन् बरेच काय काय आहे. टॅक्ससंदर्भात जगभरात लोकांचे भिन्न भिन्न मते आहेत. प्रत्येक नागरिकाने टॅक्स भरला पाहिजे. कारण हा टॅक्स देशाला प्रगतिपथावर नेण्यासाठी, सोयीसुविधा उभारण्यासाठी उपयोगाला येतो असा एक जनप्रवाह आहे, तर सरकार नक्की करदात्यांसाठी काय करते म्हणून सरकारला टॅक्स द्यायचा? असा संतप्त सवाल करणारादेखील एक वर्ग आहे.

या रणधुमाळीत जगभरात कितीतरी विचित्र टॅक्स आकारले जातात याची तुम्हाला कल्पना आहे का? या सगळ्यात आघाडीवर आहे ती अमेरिका.  अमेरिकेच्या न्यू जर्सीमध्ये भोपळा भाजी म्हणून करमुक्त आहे, पण हॅलोविन या सणाच्या काळात हा भोपळा रंगवून अथवा सजावट करून प्रदर्शनासाठी विकल्यास त्याच्यावर टॅक्स आकारला जातो. अमेरिकेच्या अर्कान्सा राज्यात तुम्ही टॅटू रंगवून घेतला तर त्यावर 6 टक्के टॅक्स भरावा लागतो. इथल्या मेरीलँड राज्यात टॉयलेट फ्लशवरदेखील कर आकारला जातो. अर्थात दर महिना वसूल केल्या जाणाऱ्या या करातील पैसे हे राज्य नालेसफाईसाठी वापरते. इटलीमध्ये काही कॅफे बाहेरच्या आसन व्यवस्थेवर सूर्यप्रकाशात बसायचे असल्यास सनशाईन टॅक्स आकारतात.

इतिहासात तर काही कर इतके विचित्र होते की काय सांगावे! 10 व्या शतकात सुरू असलेल्या युद्धात लढण्यासाठी मृत्यूच्या भीतीने इंग्लंडमधील अनेक नागरिकांनी नकार दिला होता. अशा लोकांवर राजा हेन्री पहिला याने कर लादला होता. हा कर तसा किरकोळ होता. मात्र पुढे 1199 मध्ये त्याच गादीवर आलेल्या राजा जॉनने हा कर 300 टक्के एवढा वाढवला होता. या कराला स्कुटेज टॅक्स म्हटले जाई. हा कर भरणाऱ्या लोकांना लष्करी सेवेतून सूट देण्यात येत असे. 1784 ते 1811 या काळात ब्रिटनमध्ये पुरुषांच्या टोपीवरदेखील कर आकारला जात असे.