देशभरातील 297 रेल्वेच्या किचनवर AI ची नजर, IRCTC अनोखा उपक्रम

इंडियन रेल्वेतर्फे प्रवाशांना देण्यात येणाऱ्या जेवणाबाबात दिवसेंदिवस तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे आता रेल्वेतर्फे एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. देशात प्रथमच रेल्वेने अन्नाच्या उत्तम दर्जासाठी AI चा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रवाशांच्या अन्नाचा दर्जा आणि स्वच्छता राखण्यासाठी आपल्या 297 किचनमध्ये AI चा वापर सुरू केला आहे.

देशभरात रेल्वेचे 800 हून अधिक किचन आहेत. दरम्यान यामधून प्रवाशांना मिळणाऱ्या जेवणाचा दर्जा हा फारसा चांगला नसतो. त्यामुळे रेल्वेच्या जेवणात प्रवाशांना उंदीर, पाल, झुरळ यांसारखे प्राणी, किडे आढळून येण्याचे प्रमाण वाढले आहे. कर्मचारी कधी हातमोजे घालत नाहीत तर, कधी किचन कॅप घालणे टाळतात, अशाही तक्रारी आहेत. त्यामुळे स्वयंपाकघरातील या नियमांबाबत रेल्वेने कठोर निर्णय घेतले आहेत. सर्व स्वयंपाकघरातील नियमांचे पालन केले जाईल याची खात्री करण्यासाठी रेल्वेने आता आर्टिफिशल इंटॅलिजन्स वापरण्यास सुरुवात केली आहे.

IRCTC चे सीएमडी सीएमडी संजय कुमार जैन यांनी एका न्यूज चॅनला दिलेल्या मुलाखतीत याबाबत भाष्य केलं. आता एआयच्या माध्यमातून देशभरातील रेल्वेच्या किचनमध्ये कोणत्याही कर्मचाऱ्याने किचन कॅप किंवा हातमोजे न घालता प्रवेश केला, तर स्वयंचलित प्रणालीद्वारे त्याच्या प्रभारींना तक्रार पाठवली जाईल. तसेच इतरही नियमावलीवर लक्ष ठेवण्यात येईल. नियम मोडल्यास AI लगेच तक्रार करेल, असे संजय कुमार जैन यांनी सांगितले आहे.

आयआरसीटीसीचे प्रवक्ते आनंद झा यांनी देखील रेल्वेच्या या महत्त्वपूर्ण निर्णयावर भाष्य केलं. एआयच्या वापरासाठी दिल्लीतील आयआरसीटीसीच्या मुख्य कार्यालयात एक वॉर रूम तयार करण्यात आली आहे. या वॉर रूममध्ये अनेक मोठे स्क्रीन लावण्यात आले आहेत. प्रत्येक स्क्रीनवर रिअल टाइममध्ये 12, 24 किंवा 48 किचन एकाच वेळी पाहता येतात. देशभरातील 297 किचन वॉर रूमच्या या स्क्रीन्सशी थेट जोडले गेले. आता या किचनमध्ये काय चालले आहे यावर आयआरसीटीसीच्या मुख्यालयात कर्मचारी लक्ष देणार आहेत, असे आनंद झा यांनी सांगितले.