खाऊगल्ली : एकादशी, दुप्पट खाशी!

>>संजीव साबडे

वर्षभर एकही उपास (उपवास) न करणारे स्त्री-पुरुष आषाढी एकादशीला आवर्जून उपास करतात. केवळ साबुदाणा खिचडी किंवा वरीचा भात व शेंगदाण्याची आमटी हे प्रकार पुरेसे वाटत नाहीत. फराळी मिसळ, फराळी थालीपीठ, बटाटय़ाची भाजी व राजगिऱयाच्या पुऱया, रताळ्याच्या गुळातल्या काचऱया, तूप, मिरची, जिरे, शेंगदाण्याचं कूट असलेला रताळ्याचा कीस अशा अनेक मागण्या-विनंत्या घरात स्रू होतात. त्या दिवशी जेवण नव्हे, तर कमी खावं या अपेक्षेतून ‘फराळ’ हा शब्द आला असणार. प्रत्यक्षात मात्र ‘एकादशी, दुप्पट खाशी’ या म्हणीप्रमाणे हे चालतं.

येत्या बुधवारी आषाढी एकादशी. मराठीजनांची सर्वात मोठी एकादशी. सर्व पालख्या आणि त्यातील वारकरी पंढरीच्या विठ्ठल-रखुमाईचं दर्शन घेत असतात. भजन-कीर्तन स्रू असतं. ‘कानडा राजा पंढरीचा’च्या दर्शनाला सर्वांना जाता येत नाही म्हणून वर्षभर एकही उपास (उपवास) न करणारे स्त्राr-पुरुष आषाढी एकादशीला आवर्जून उपास करतात. ती एक प्रकारे विठ्ठलाची भक्तीच असते. अनेक घरांत सर्वांचाच उपास असतो आणि ते बरंही असतं. सर्वांसाठी सारखेच पदार्थ करायचे. अर्थात काहीजण उपास न करताही उपासाचे भरपूर पदार्थ फराळ म्हणून खातात. त्या दिवशी जेवण नव्हे, तर कमी खावं या अपेक्षेतून ‘फराळ’ हा शब्द आला असणार. प्रत्यक्षात मात्र ‘एकादशी, दुप्पट खाशी’ या म्हणीप्रमाणे हे चालतं.

केवळ साबुदाणा खिचडी किंवा वरीचा भात व शेंगदाण्याची आमटी हे प्रकार पुरेसे वाटत नाहीत. फराळी मिसळ, फराळी थालीपीठ, बटाटय़ाची भाजी व राजगिऱयाच्या पुऱया, रताळ्याच्या गुळातल्या काचऱया, तूप, मिरची, जिरे, शेंगदाण्याचं कूट असलेला रताळ्याचा कीस अशा अनेक मागण्या-विनंत्या घरात स्रू होतात. त्यामुळे नेहमीचा स्वयंपाक परवडला, असं म्हणायची वेळ येते. तरीही फराळाचे तीन-चार पदार्थ होतातच.

पूर्वी आषाढी एकादशीची सर्वांना सुट्टी असायची. आता ती खात्री नाही. अनेकांना कामासाठी घराबाहेर पडावंच लागतं. सकाळी डब्यात भरून घेतलेली खिचडी दुपारपर्यंत वातड होते किंवा थंड झालेल्या राजगिऱयाच्या पुऱया व भाजी खाताना कसंसंच होतं. उपास असला म्हणून काय झालं, समोर पदार्थ गरमच हवे असतात. ही गरज म्हणा, सवय म्हणा की आवड म्हणा, रेस्टॉरंटवाल्यांनी बरोबर हेरली. त्यामुळे मुंबईतील मराठी रेस्टॉरंटमध्ये उपासाचे पदार्थ मिळू लागले.

पूर्वी गिरगावातील ‘तांबे’, ‘पणशीकर’, ‘विनय’, ग्रॅण्ट रोडचं ‘चाफेकर’, दादरचं ‘मामा काणे’, ‘प्रकाश’, ‘आस्वाद’, ‘तांबे’, ‘पणशीकर’, गोरेगावातलं ‘सप्रे’ व ‘श्रीदत्त’, ठाण्यातलं ‘गोखले’, बदलापुरातलं काटकरांचं ‘आस्वाद’ अशी मोजकी ठिकाणं होती, जिथे उपासाचे अस्सल पदार्थ आजही मिळतात. शिवाजी पार्कच्या ‘आस्वाद’ व ‘प्रकाश’मध्ये तर अशा दिवशी गर्दीच असते. ‘आस्वाद’मध्ये उपासाची थाळीच असते. अर्थात उपवासाची थाळी हा प्रकार पहिल्यांदा पुण्यात स्रू झाला असावा. तिथल्या ‘वाडेश्वर’, ‘अभिजात’, ‘श्रेयस’ अशा काही रेस्टॉरंटमध्ये मिळणारी उपासाची थाळी खूप लोकप्रिय आहे. खिचडी, भगर, शेंगदाणा आमटी, राजगिऱयाची पुरी व बटाटा भाजी, राजगिऱयाचं थालीपीठ, साबुदाण्याचा पापड व वडा, दही, एखादी खीर वा आईपीम आणि एखाद्या फळाच्या फोडी असं सारं या ताटात असतं. एवढय़ा खाण्याला खरंतर पोटभर जेवण म्हणायला हवं, पण म्हणतात ‘फराळाची थाळी!’ काही ठिकाणी उपवासाची भजी मिळतात. बटाटा किसून व त्यातील पाणी काढून त्यात साबुदाणा पीठ मिसळायचं. तिखट पूड वा बारीक कापलेली मिरची, शेंगदाणा कूट, जिरेपूड हे सारं त्यात नीट मिसळत राहायचं. पाचेक मिनिटांनी त्याचे अगदी छोटे गोळे गरम तेलात सोडायचे. ही भजी मस्त होते. शिवाय उकडलेला बटाटा कुस्करून त्यात साबुदाणा पीठ, जिरे, बारीक मिरची घालून केलेली भजीही कुरकुरीत व मस्त लागते. ग्रॅण्ट रोडच्या चाफेकर दुग्ध मंदिरमध्ये गेलं की, खमंग काकडी खायची हे ठरलेलं असायचं. बोरिवलीला स्वामी विवेकानंद मार्गाच्या गिरगाव कट्टय़ावर उपवासाचे अनेक प्रकार मिळतात व गिरगावी संस्कृतीचं दर्शन होतं. दादरला कित्ते भंडारी सभागृहाच्या इमारतीत ‘एकादशी’ नावाचं मराठी रेस्टॉरंट आलं आहे.

गोरेगाव आणि विलेपार्ले पूर्व भागात उपासाचे चांगले पदार्थ देणारी ‘मी मराठी’ रेस्टॉरंट आहेत. विलेपार्ले पूर्वेला अगदी स्टेशनजवळ असलेलं जीवन रेस्टॉरंट अतिशय जुनं. तिथेही फराळाचे उत्तम खाद्य पदार्थ मिळतात. हनुमान रोडवरच्या ‘पणशीकर’ यांच्या मेन्यूवरही फराळी मिसळ, शेंगदाणा आमटी, राजगिऱयाच्या पुऱया, थालीपीठ, पॅटिस असे बरेच पदार्थ आहेत.

लालबागला गेलात की, ‘लाडू सम्राट’ला अवश्य भेट द्यायलाच हवी. तेथील सर्वच खाद्यपदार्थ, मिठाई यांची नेहमीच तारीफ केली जाते, पण त्यांच्या मेन्यूवर उपासाचे किमान 15/16 पदार्थ आहेत. दादरच्या गोखले रोडवरचं ‘तांबे’ उपाहारगृह व न. चिं. केळकर मार्गावरील ‘तांबे आरोग्य भवन’ ही रेस्टॉरंट मराठी व उपासाच्या खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध व लोकप्रिय आहेत. पश्चिम उपनगरांत गोरेगाव पश्चिमेला ‘माई व्हेज’मध्ये वरीचा डोसा व उपासाचे बरेच पदार्थ मिळतात. अंधेरी पूर्वेला कोलडोंगरी भागात ‘स्वाद’ रेस्टॉरंटमध्ये उपासाचे मस्त पदार्थ खाल्ले होते.

ठाण्यामध्ये मराठी मंडळी संस्कृती आजही टिकून आहे. तिथे मराठी खाद्यपदार्थांची बरीच ठिकाणं आहेत. त्यापैकी ‘गोखले’ बहुधा सर्वात जुने. पूर्वी ते स्टेशनच्या समोर होते. आता ते गोखले रोड, नौपाडा इथे असून त्यांच्याकडील उपवासाची कचोरी व पॅटिस प्रसिद्ध आहे. तिथले शेंगदाणा लाडूही मस्त लागतात. घोडबंदर रोडवर ‘पूर्णब्रह्म’मध्ये उपासाचं थालीपीठ, फराळी मिसळ आणि अर्थातच साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा असे मोजकेच, पण उत्तम प्रकार मिळतात. पळस्पे फाटा, नाशिक, अहमदाबाद व पुणे हायवे येथील ‘श्रीदत्त’मध्ये हे प्रकार बहुधा रोज मिळतात.

आता बटाटय़ाचा कीस (चिवडा नव्हे), रताळ्याचा कीस व काचऱया, खमंग काकडी, भोपळ्याचं भरीत वा खीर, वरीची खिचडी किंवा सुरणाचे काप हे मिळणं कमी झालं आहे. दादरच्या ‘प्रकाश’मध्ये फराळी मिसळीत रताळ्याचा कीस घातला जाई. अनेक ठिकाणी साबुदाण्याच्या खिचडीत कडीपत्ता व कुटाऐवजी अख्खे शेंगदाणे असतात. उडपी व गुजराती रेस्टॉरंटमध्येही खिचडी, साबुदाणा वडे, कचोरी, पॅटिस, फराळी मिसळ हे पदार्थ मिळतात, पण ते खाऊन समाधान होत नाही. हे पदार्थ करावेत आणि खावेत मराठी मंडळींनीच!

[email protected]