मनतरंग – बदल

>>दिव्या नेरुरकर-सौदागर

तणावाची अवस्था जर खूप काळ असेल तर ती ‘समायोजन विकार’मध्ये (Adjustment Disorder) परावर्तित होऊ शकते. ह्या अवस्थेची मुख्य लक्षणे ही तणाव किंवा नैराश्याची आहेत. मुख्यत्वे ह्या अवस्थेमध्ये व्यक्ती ही बदलाला नकारात्मक दृष्टिकोनातून सामोरी जात असते आणि तिच्या प्रतिक्रिया अत्यंत टोकाच्या नकारात्मक, अस्वस्थपूर्ण आणि चिडचिडीच्या असू शकतात. म्हणूनच या अवस्थेतील व्यक्ती ही तणावात जाऊन गंभीर पावलेही उचलू शकते.

रोहन (नाव बदलले आहे) हल्ली बराच बदलला होता. त्याची रोजची दिवसाची सुरुवात चिडचिडीने व्हायची आणि दिवसही तसा नाराजीतच संपायचा. ऑफिसमधून घरी आल्यानंतर तो तडक आपल्या रूममध्ये जाऊन मोबाइल स्वीच ऑफ करून पडून राहायचा. रोहनला आई-बाबांनी विचारूनही पाहिलं होतं. पण ‘काही खास नाही’ ही सबब सांगून चर्चा करायचंही टाळत होता. त्याचे आईवडील आता मात्र चांगलेच काळजीत पडले होते.

जसा रोहन घरी अबोल बनला होता तसाच ऑफिसमध्येही शांत झाला होता. त्याला हल्ली कंटाळा यायला लागला होता. त्याच्या सहकाऱयांना तो टाळण्याचा प्रयत्न करायला लागला होता. त्याला कारणही होतं; रोहनला त्यांचं सतत त्याच्या लग्नावरून चिडवणं डोक्यात जात होतं. त्यामुळे तो लंच टाइमलाही त्याच्याच डेस्कवर बसून खायचा आणि तडक कामाला सुरुवात करायचा. कामातही त्याचं लक्ष नसायचंच! पण वेळ घालवायला आणि ‘बिझी’ राहायला तो त्याच्या लॅपटॉपमध्ये डोकं खुपसून बसायचा.

रोहनच्या बाबतीत अजून एक गोष्ट घडत होती. ती म्हणजे मोबाइलची त्याला वाटणारी प्रचंड भीती आणि ताण. एकदा तर त्या ताणातून त्याने मोबाइल जमिनीवर आपटलाही होता आणि नंतर पश्चातापात दुरुस्त करून घेतला. त्याचा त्रास हा वाढतच होता म्हणून शेवटी त्याने स्वतच्या ताणासाठी काही उपाय करण्याचे ठरवले आणि समुपदेशनाचा मार्ग धरला.

पहिल्या सत्रात रोहनने स्वतबद्दल व्यवस्थित माहिती सांगितली आणि नंतर स्वतच्या ताणाबद्दल, मोबाइलच्या वाटणाऱया भीतीबद्दल बोलायला सुरुवात केली. ‘तुला मोबाइलचा एवढी भीती का वाटायला लागली आहे?’ असे त्याला विचारताच तो पटकन उत्तरला, ‘भीतीपेक्षाही मी म्हणेन मला अॅन्कशस व्हायला होतं. मोबाइलचा जेव्हा मेसेज किंवा व्हॉटस्अप टोन वाजतो तेव्हा सेकंदासाठी मला टेन्शन आणि इरिटेशन व्हायला सुरुवात होते. त्याच्याकडे बघावंसंही वाटत नाही इतका तिटकाराही यायला लागला आहे.’
‘कुठलेच मेसेजेस तुला बघावेसे वाटत नाहीत का?’
‘नाही. असं अजिबात नाही.’ असं बोलून रोहन शांत बसला. ‘मला माझ्या होणाऱया बायकोचे मेसेजेस किंवा कॉल्स आले तर ताण यायला लागला आहे…’ आणि त्याने एवढं बोलून त्याच्या खऱया ताणाचे कारण सांगायला सुरुवात केली.

रोहनचं लग्न ठरलेलं होतं आणि तीन महिन्यांत तो बोहल्यावर चढणार होता. पण लग्न ठरल्यानंतर तो कमालीचा तणावात गेला होता. कारण त्याच्या होणाऱया बायकोला लग्नानंतर वेगळा संसार करायचा होता. रोहनला वेगळं राहण्यात गैर वाटत नव्हतं आणि आई-वडिलांना सोडवतही नव्हतं. ‘मग तू तिला स्पष्ट बोललास का, की तुला तुझ्या पालकांसोबत राहायचंय.’

‘मॅम, ती काही वेगळं राहण्याचा हट्ट करत नाहीये. तिने फक्त तिची अपेक्षा सांगितली आणि तिला मी ओके म्हटलं. ज्याचाच मला खूप ताण आलाय. कारण एकुलता एक असल्यामुळे मला माझ्या आई-बाबांबरोबरच राहायचं आहे, जे तिला मी स्पष्टपणे सांगू शकत नाही.’ असं म्हणून त्याने ओंजळीत तोंड लपवलं आणि हातानेच डोळे पुसले. ‘मी तिला बऱयाच गोष्टी कबूल करून बसलोय. विचार केल्यानंतर लक्षात आलं की त्या कबूल करण्यात मी घाई केली. ती मनाने खूप चांगली आणि स्वभावाने मोकळी आहे. त्यामुळे ती भेटल्यावर आणि मोबाइलवर चॅटिंग करताना खूप बोलते. अगदी स्वतबद्दल, माझ्याबद्दल आणि आमच्या सुरू होणाऱया संसाराबद्दल. तिच्या जास्त अपेक्षाही नाहीत… पण ज्या काही आहेत, त्यामुळे मला ताण येतो.’
‘कसला ताण?’

‘हेच की मी तिला आयुष्यात सुखात ठेवू शकेन की नाही.’ रोहनची घुसमट ही मोबाइलमुळे नव्हती तर ती त्याच्या आयुष्यात येणाऱया नवीन पर्वामुळे होती, ज्यासाठी तो मानसिकदृष्टय़ा तयार नव्हता. तो मुळातच कुठलीही नवीन गोष्ट करताना किंवा कामाला सामोरं जाताना थोडा भांबावून जात असे. आता तर त्याचं लग्न ठरलं होतं. त्यामुळे त्याच्या स्वाभाविक प्रतिक्रिया नकारात्मक उमटायला सुरुवात झाली होती. त्याच्या या अस्वस्थतेमुळेच त्याचं मनस्वास्थ्य हरवत चाललं होतं.

अशी ही अवस्था जर खूप काळ असेल तर ती ‘समायोजन विकार’ यात (Adjustment Disorder) परावर्तित होऊ शकते. या अवस्थेची मुख्य लक्षणं ही तणाव किंवा नैराश्याची आहेत. या अवस्थेमध्ये व्यक्ती ही बदलाला नकारात्मक दृष्टिकोनातून सामोरी जात असते आणि तिच्या प्रतिक्रिया या अत्यंत टोकाच्या नकारात्मक, अस्वस्थपूर्ण आणि चिडचिडीच्या असू शकतात. म्हणूनच या अवस्थेतील व्यक्ती तणावात गंभीर पावलेही उचलू शकते. या अवस्थेचे मूळ हे आनुवंशिक असू शकते किंवा त्या व्यक्तीची जडणघडण नकारात्मक आणि तणावपूर्ण वातावरणात झाली असेल तर त्यामध्येही असू शकते.

रोहनची जडणघडण ही अतिशय शिस्तप्रिय घरात झाली होती. कारण त्याचे आईवडील हे दोघेही शिक्षक होते. त्याच्या लहानपणी त्याचे आजी-आजोबाही त्यांच्यासोबत होते जे कर्मठ वृत्तीचे होते. त्यामुळे रोहन तसा धाकात राहिला आणि त्याचा स्वभाव मितभाषी, बुजरा झाला. तो पटकन मोकळा होत नसे. त्याची होणारी बायको ही अत्यंत मोकळ्या वातावरणात वाढलेली होती. त्यामुळे ती मनमोकळ्या स्वभावाची होती. दोघांचे स्वभावधर्म जरी भिन्न असले तरी एकमेकांना पूरक असल्याने त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

रोहनसाठी समुपदेशन गरजेचंच होतं. त्यामध्ये काही सत्रे त्याच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी घेण्यात आली आणि त्या दरम्यान त्याला लग्नाचा विचार काही मर्यादित कालावधीपर्यंत न करण्यास सांगण्यात आले. या कालावधीत तो अत्यंत कठिण अशा स्वबदलाला सामोरा जाणार होता. रोहनची सत्रे दोन महिने सुरू होती. ज्यामध्ये त्याने स्वतच्या आत्मविश्वासावर काम केलं. आपली मतं स्पष्टपणे मांडायलाही शिकला. त्याचबरोबर राग आणि तणावाचं नियोजनही करत होता. हे सर्व करताना रोहन आपले विचार जास्तीत जास्त सकारात्मक आणि तर्कशुद्ध कसे बनवता येतील याकडेही लक्ष ठेवून होता. कारण त्याला आयुष्यातल्या महत्त्वाच्या बदलाला उत्स्फूर्तपणे आणि आनंदाने स्वीकारायचे होते.

[email protected] (लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत.)