किस्से आणि बरंच काही : मिश्कील मित्र

>>धनंजय साठे

पहिल्या भेटीत चहात बिस्कीट बुडवून खाताना आम्हा दोघांना हे निश्चित माहीत झालं होतं की, अपनी जमेगी! समान सेन्स ऑफ ह्युमर जपणारे आम्ही दोघे. मित्र प्रियदर्शन जाधव याच्यासह सुरू झालेला आमचा मैत्रीचा प्रवास निरंतर राहील हा विश्वास आहे.

साल 2010, मी तेव्हा साम मराठी वाहिनीचे प्रोग्रॅमिंग डिपार्टमेंट सांभाळत होतो. एक साधारण दुपार होती. माझ्या कामात मी व्यस्त असताना केबिनच्या दारावर टक टक झाली. मी “कम इन” म्हणताच दार ढकलून एक अतिशय किरकोळ शरीरयष्टीचा युवक केबिनमध्ये आला. चेहऱयावर स्मितहास्य ठेवत म्हणाला, “नमस्कार, मी प्रियदर्शन जाधव…!” ती माझी आणि दर्शनची पहिली भेट. आज 14 वर्षांनंतर जेव्हा आम्ही दोघेही मागे वळून बघतो, तेव्हा आठवतात असंख्य गमतीदार किस्से आणि खूप शिकवून गेलेले अनुभव.

त्या पहिल्या भेटीत चहात बिस्कीट बुडवून खाताना आम्हा दोघांना हे निश्चित माहीत झालं होतं की, अपनी जमेगी! आमचा सेन्स ऑफ ह्युमर बऱयापैकी सारखाच आहे आणि त्या केबिनपासून सुरू झालेला आमच्या मैत्रीचा प्रवास अजूनही चालू आहे. देव करो असाच चालू राहो…

त्या दिवसांमध्ये दर्शनचे ‘जागो मोहन प्यारे’ हे नाटक प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. त्यामुळे दर्शन प्रेक्षकांचा लाडका बनला होता. काही दिवसांनी त्याचे ‘चेहरा फेरी’ हे नाटकसुद्धा रसिकांच्या पसंतीला उतरले होते. झी मराठीवरील ‘फू बाई फू’ प्रेक्षकांना आवडत होते. त्या कार्पामातून नाटय़ आणि सिनेसृष्टीमधले कसलेले, होतकरू, नवोदित सगळेच कलाकार एकाच मंचावर झळकत प्रेक्षकांना वेगळाच आनंद देऊन गेले. यातल्या एका स्किटचे लेखन प्रियदर्शनने केले होते. ते स्किट खूप गाजले होते. ते स्किट निर्माते, दिग्दर्शक रवी जाधव याने पाहिले. त्याने लगेच माहिती काढून दर्शनशी बोलणे केले आणि दर्शनच्या हातात ‘टाईमपास’ या चित्रपटाचे पटकथा लेखनाचे काम पडले. पुढे तो चित्रपट खूप चालला. त्या काळातले सर्व रेकॉर्डस् ‘टाईमपास’ने मोडले आणि त्यानंतर ‘टाईमपास- 2’ येत असल्याची बातमी कानावर आली. असे म्हणतात की, माणसांसारखाच चित्रपटही आपले नशीब घेऊन येतो.

याच सुमारास माझी एक खूप प्रतिष्ठित, नावाला वलय असलेली मैत्रीण चित्रपट निर्मिती व्यवसायात पदार्पण करण्यास इच्छुक होती. एक दिवस मी दर्शनला तिच्या घरी घेऊन गेलो ‘मस्का’ नावाच्या चित्रपटाची कथा ऐकवायला. तिला ती कथा अतिशय आवडली. ती म्हणाली, अशा प्रकारच्या कथेपासून मला निर्मिती क्षेत्रात एन्ट्री घ्यायला आवडेल. त्या वेळी प्रियदर्शन झी-मराठीवरच्या एका मालिकेत काम करत होता, पण ‘मस्का’ची कथा त्याने लिहिलेली असल्यामुळे त्यावर काम करायची तयारी होतीच आणि तेव्हाच नशिबाचे काटे फिरले. रवी जाधवने प्रियदर्शनला ‘टाईमपास-2’ मधल्या दगडू परबच्या भूमिकेसाठी फायनल केलं. आता काय करावं? असो… प्रियदर्शन ‘टाईमपास-2’ च्या चित्रीकरणात व्यस्त झाला.

मधल्या काळात माझा ‘बंध नायलॉनचे’ नावाचा सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमाचा मी कार्यकारी निर्माता होतो. महेश मांजरेकर, सुबोध भावे अशी भन्नाट स्टारकास्ट होती. काही दिवसांनी मी आणि दर्शन पुन्हा भेटलो. 2016 मध्ये आपण पुन्हा नव्याने ‘मस्का’ बनवण्यासाठी प्रयत्न करू असे ठरले.

पुन्हा तेच चक्र सुरू झाले. बऱयाच मंडळींना भेटलो. अनेक मीटिंग्स झाल्या, पण काही ठोस घडत नव्हते. एक दिवस अचानक नशिबाने दार ठोठावले. आम्हाला निर्माते लाभले आणि 2018 मध्ये ‘मस्का’ प्रदर्शित झाला. दिग्दर्शक बनण्याच्या प्रियदर्शनच्या प्रवासात माझा तो एक छोटासा वाटा होता. ‘मस्का’ चित्रपटाचा मी कार्यकारी निर्माता होतो आणि त्यात एक छोटीशी भूमिका पण केली होती. त्यानंतर दर्शनने ‘चोरीचा मामला’ हा सिनेमा दिग्दर्शित केला.

2011 मध्ये साम मराठीमधून बाहेर पडल्यावर मी ओपटिमिस्टिक्स एंटरटेन्मेंट, टीव्ही मालिका आणि इतर मनोरंजनाचे कार्पाम बनविणाऱया संस्थेत रिजनल ािढएटिव हेड म्हणून रूजू झालो. तेव्हा ‘ढिंका चिका’ नावाचा ‘फू बाई फू’च्या पठडीत बसणारा स्किटवाला शो घेऊन मी सुरुवात केली. त्यासाठी मला लेखकांची आणि नटांची फौज लागणार होती. सगळ्यात आधी मी कॉल करून बोलावून घेतलं ते माझ्या मित्राला, प्रियदर्शन जाधवला. मग तो आणि मी मिळून लेखकांची, कलाकारांची फळी तयार केली आणि कार्यक्रम सुरू झाला. मस्त दिवस होते ते. दोघे राहायला ठाण्यात असल्याने रोज सकाळी गडकरी रंगायतनच्या दारात मी दर्शनला भेटायचो आणि आम्ही दोघे दर्शनच्या अल्टोमधून ओपटिमिस्टिक्सच्या अंधेरी ऑफिसला जायचो.

मित्र म्हणून मी पाहिलेला प्रियदर्शन म्हणजे एक अवलिया आहे. तसाच एक फॅमिली मॅनही आहे. त्याची पत्नी बँकर आहे व दोन मुलांची आई तशीच दर्शनची बायको म्हणून खंबीरपणे त्याला भक्कम साथ देणारीही आहे.

दर्शन मूळचा कोल्हापूरच्या एका सुसंस्कृत, मध्यमवर्गीय व सुखवस्तू घरात बालपण घालवलेला मुलगा आहे. दर्शनची आई शिक्षिका, त्या मुळे घरात सतत चांगली पुस्तके असायची. त्याला एक मोठा भाऊही आहे. वडील एका मोठय़ा सिमेंट कंपनीमध्ये कामाला होते. त्यामुळेच कदाचित त्यांनी जाधव कुटुंबाला एकत्र जोडून ठेवलं होतं.

दर्शनला ड्रायव्हिंगचं चिक्कार वेड. इतकं की, अनेकदा मी कॉल केला की उत्तर मिळायचं, “आता जस्ट कोल्हापूरला पोहोचतोय, उद्या पहाटे निघेन. कारण संध्याकाळचा प्रयोग आहे.” बरं गाडी चालवताना पठ्ठय़ात कमालीचा पेशन्स असतो. कधी कोणी अगदीच गाडीसमोर आडवा आला की, “अरे आकाश… जरा बघून चाल ना मित्रा,” असे हसत हसत बोलून जातो. अजूनही आकाश कोण? याची ओळख मला झालेली नाही. रस्त्यात कोणी त्याला ओळखले आणि सेल्फी काढायला आला तर न कंटाळता हसू चेहऱयावर कायम ठेवून आनंदाने समोरच्याला खूश करणारा माझा मित्र. फक्त माझा त्याला इतकाच सल्ला आहे की, ड्रायव्हिंग सावकाश कर, वेळेवर खा आणि झोपेचे शेडय़ूल पाळ.

अभिनेते सतीश तारे यांना देव मानणाऱया तसेच रामगोपाल वर्मा आणि राजकुमार हिरानीचा जबरदस्त फॅन असलेल्या माझ्या या मिश्कील मित्राला त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी अनेक अनेक शुभेच्छा.

[email protected] (लेखक क्रिएटिव्ह हेड, अभिनेते आणि गायक आहेत.)