वेब न्यूज – नालंदा

>>  स्पायडरमॅन

नालंदा  विश्वविद्यापीठाच्या नव्या स्वरूपाचे नुकतेच लोकार्पण झाले. यानंतर नालंदा विद्यापीठाची चर्चा सर्वत्र जोरदार सुरू झाली आहे. सोशल मीडियावर अनेक अभ्यासक नालंदाच्या इतिहासाची रोचक माहिती लोकांना करून देत आहेत. या माहितीमुळे आजवर लोकांना अज्ञात असलेल्या नालंदा संबंधीच्या अनेक गोष्टी समोर येत आहेत. ऑक्सफर्ड आणि केंब्रिज सारख्या विद्यापीठांच्या 600 वर्षे आधी नालंदाची स्थापना झाली होती. ना, आलम आणि दा या तीन शब्दांच्या संयोगातून नालंदा हे नाव तयार झाले. अमर्याद अशी भेट वस्तू असा त्याचा अर्थ होतो.

पाचव्या शतकात गुप्त काळात बांधले गेलेले नालंदा विद्यापीठ हे जगातील प्रथम निवासी विद्यापीठ होते. जगभरातील अनेक प्राचीन आणि ऐतिहासिक पुस्तकांमध्ये उल्लेख असलेले नालंदा हे संपूर्ण जगाला हिंदुस्थानने दिलेली अत्यंत महत्त्वाची भेट मानली जाते. अनेक महान व्यक्तींनी इथे आपले शिक्षण पूर्ण केले आहे. ‘नालंदा विद्यापीठ हा आपल्या (बौद्ध) ज्ञानाचा मुख्य स्रोत होता,’ असे गौरवपूर्ण उद्गार दलाई लामा यांनी काढले आहेत.

गुप्त सम्राट कुमार गुप्ता पहिला याने इसवीसन 427 मध्ये नालंदा विद्यापीठाची स्थापना केली. हर्षवर्धन आणि पाल या पुढील शासकांनी नंतर त्याचे संरक्षण केले. 300 मध्यम खोल्या, 7 मोठय़ा खोल्या आणि अभ्यासासाठी 9 मजली ग्रंथालय इथे बांधलेले होते. यावरून या विद्यापीठाच्या भव्यतेचा अंदाज लावता येतो. ग्रंथालयात 90 लाखांहून अधिक पुस्तके होती. नालंदा विद्यापीठ केवळ भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील सर्वात मोठं शैक्षणिक केंद्र होतं. नालंदा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात प्रामुख्याने वैद्यकशास्त्र, सांख्यदर्शन, तर्कशास्त्र, बौद्ध पंथाचे तत्त्वज्ञान असे अनेक विषय प्रतिष्ठत विद्वानांकडून शिकवले जात.

पाचव्या शतकात मिहिरकुलातील हूणांनी या विद्यापीठावर हल्ला केला होता. पुढे आठव्या शतकात बंगालच्या गौड राजानेही विद्यापीठावर आक्रमण केलं होतं. 1113 पर्यंत इथे शिक्षण प्रसार सुरू होता. मात्र तुर्की आक्रमक बख्तियार खिलजीने विद्यापीठावर हल्ला केला. त्याने संपूर्ण विद्यापीठ उद्ध्वस्त केले.