वेब न्यूज – जगातील सर्वात उष्ण ठिकाणे

>> स्पायडरमॅन

हिंदुस्थानात या वेळी उष्णतेने उच्चांक गाठला आहे. मान्सूनचे आगमन झाले असले तरी आजही देशाच्या अनेक भागांत उष्णतेची लाट कायम आहे. दिल्लीसारख्या शहराने 50 ची पातळी गाठली होती. मात्र पुढे ती तांत्रिक चूक असल्याचे स्पष्टीकरण दिले गेले. मात्र आपल्या सगळय़ांनी या वेळी मोठय़ा प्रमाणात उष्णतेच्या लाटा सहन केल्या आहेत हे नाकारता येत नाही. उष्णतेच्या या भीषणतेची चर्चा इंटरनेटवरदेखील चांगली रंगली आहे. या चर्चेदरम्यान जगातल्या सर्वात उष्ण जागांची माहितीदेखील समोर आली आहे. इथे घालवलेली दहा मिनिटे माणसाला आजारी पाडू शकतात, तर काही तासांत भयानक उष्णतेने त्याचा मृत्यूदेखील होण्याची शक्यता असते.

अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील डेथ व्हॅली जगातील सर्वात उष्ण ठिकाणांपैकी एक आहे. 10 जुलै 1913 रोजी येथे सर्वाधिक तापमानाचा विक्रम नोंदवला गेला होता. त्या वेळी डेथ व्हॅलीमधील फर्नेस क्रीक नावाच्या ठिकाणी कमाल तापमान 56.7 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. सध्या इथे सरासरी तापमान 37 ते 40 अंश सेल्सिअस नोंदवले जात आहे. इथल्या आजूबाजूला असलेल्या वाळवंटी भागामुळे इथे सतत गरम वारे वाहत असतात. आफ्रिकेतील सहारा वाळवंटाला जगातील सर्वात उष्ण वाळवंट म्हणून ओळखले जाते. वर्षभरात अवघा 100 मिमी पाऊस पडणाऱ्या या भागाचे सरासरी तापमान 35 ते 42 अंश सेल्सिअस असते. इथले कमाल तापमान 58 सेल्सिअसपर्यंत पोहोचलेले असून पृष्ठभागाच्या तापमानाची नोंद 776 अंश सेल्सिअस इतकी नोंदवली गेली आहे. L’Azizia हे लिबियाच्या उत्तर-पश्चिमेस असलेल्या जाफ्रा जिह्यातील एक लहान शहर आहे. या भागात खूप उष्णता आहे. साधारणपणे येथील कमाल तापमान 35 ते 40 दरम्यान राहते, परंतु 13 सप्टेंबर 1922 रोजी येथे 58 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पण नंतर जागतिक हवामान संघटनेने (WMO) 2012 मध्ये हे चुकीचे घोषित केले होते. कारण त्या वेळी या भागात तापमान मोजण्याची सोय नव्हती. मात्र असे असले तरी येथील उष्णता ही धडकी भरवणारी असते.