ठसा – पं. सी.आर. व्यास

>> प्रसाद पद्माकर मालाडकर

चिंतामण  रघुनाथ व्यास यांचा जन्म 9 नोव्हेंबर 1924 रोजी महाराष्ट्र राज्यातल्या धाराशिवमध्ये झाला. त्यांच्या घराण्यात संस्कृत विद्वान पंडित, हरिकीर्तनकारांची परंपरा होती. त्यांचे पिताश्री रघुनाथराव व्यास आणि आजोबांच्या गायनाचा त्यांच्या स्वर व गायनावर प्रभाव होता.

चिंतामण रघुनाथ व्यास यांचे किराणा घराण्याचे गोविंदराव भातांब्रेकर हे आद्यगुरू. त्यांच्याकडे ते दहा वर्षे शिकले. ते वयाच्या एकविसाव्या वर्षी सन 1945 मध्ये मुंबईत आले. ग्वाल्हेर घराण्याचे पंडित राजारामबुवा पराडकर यांच्याकडे मुंबईत गिरगावात शिकले. आग्रा घराण्याचे पंडित जगन्नाथबुवा पुरोहित यांच्या गायनाने ते प्रभावित झाले. एकाच वेळी पंडित जगन्नाथबुवा पुरोहित यांच्याकडे आग्रा घराण्याचे मार्गदर्शनसुद्धा सुरू केले. पंडित यशवंतबुवा मिराशी यांचेसुद्धा मार्गदर्शन घेतले. श्रीकृष्ण नारायण, एस. एन. रातंजनकर, चिदानंद नगरकर, एस. सी. आर. भट, पंडित कृष्णा गुंडोपंत, के. जी.  गिंडे या  विद्वान गायकांच्या सहवासात ते होते.

पंडित सी. आर. व्यास यांचा आवाज मोकळा होता. त्यांनी प्रशिक्षण घेतलेल्या सर्व घराण्यांचे मिश्रण त्यांच्या गायनात होते, पण ग्वाल्हेर घराण्याचा प्रभाव प्रतित होतो. ते शास्त्रीय संगीत गायक असले तरी आयटीसीमध्ये उत्तम पदावर नोकरीला होते. त्यांच्या मते, आमच्या काळात संगीताच्या माध्यमातून प्रसिद्धी, पैसा मिळवण्याचा विचारच नव्हता. आकाशवाणी मुंबई आणि मुंबई दूरदर्शनचे ते उच्च श्रेणीचे कलाकार होते. ते भारतात, परदेशात मोठय़ा संगीत कार्यक्रमात, संमेलनात सहभागी झाले होते.

त्यांचा विवाह इंदिरा व्यास यांच्याशी झाला. त्यांना तीन सुपुत्र आहेत. सुहास व्यास शास्त्रrय संगीत गायक, सतीश व्यास प्रख्यात संतूरवादक, शशी व्यास व्यवसायाने लेखापाल (चार्टर्ड अकाऊंटंट) तसेच पंचम निषाद संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक आहेत.

सी. आर. व्यास यांच्या गायकीवर किराणा, ग्वाल्हेर आणि आग्रा या तीनही घराण्यांचे संस्कार होते. तथापि त्यांनी खुल्या आणि मोकळय़ा आवाजाची भावपूर्ण अशी एक स्वतंत्र वेगळी गायकी निर्माण केली. त्यामुळे गायकीच्या प्रसन्नतेत वृद्धी झाली. संगीत रिसर्च अकादमी, भारतीय विद्या भवनमध्ये त्यांच्या बंदिशींचे ध्वनिमुद्रण सुरक्षित आहे. गुणीजन या नावाने त्यांनी अनेक बंदिशी रचल्या. धनकोनी कल्याण, सगेरा, सुध-जोगिया, शिव-अभोगी, सुधरंजनी अशा रागांची निर्मितीही त्यांनी केली. त्यांचे ‘राग सरिता’ पुस्तक प्रसिद्ध आहे. अभिजात शास्त्रीय संगीताच्या साधकांना व्यासपीठ मिळावे, त्याचा प्रसार व्हावा या हेतूने त्यांनी त्यांच्या गुरूंच्या स्मरणार्थ ‘गुणिदास संगीत संमेलन’ याची सन 1974 मध्ये सुरुवात केली.

पंडित सी. आर. व्यास यांना त्यांच्या अनेकविध सांगीतिक कार्यकर्तृत्वासाठी मानसन्मान पुरस्कार लाभले. संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन 1987, महाराष्ट्र गौरव पुरस्कार सन 1990, पद्मभूषण पुरस्कार सन 1992, उस्ताद हाफीज अली पुरस्कार सन 1994, महाराष्ट्र-मराठवाडा पुरस्कार सन 1998, मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सन 1999, मध्य प्रदेश सरकारचा मियां तानसेन पुरस्कार सन 1999 मध्ये मिळाला.

त्यांच्या संगीताचा वारसा त्यांचे सुपुत्र सतीश व्यास संतूरवादक, सुहास व्यास शास्त्रीय संगीत गायक व शिष्य श्रीपाद राजाराम पराडकर, डॉ. सुमन माटे, नीलाक्षी जुवेकर, निर्मला बापट गोगटे, उषा जोग, डॉ. अविनाश गोडबोले, लीला करंबेळकर, सविता कुलकर्णी, फैय्याज शेख, प्रभाकर कारेकर, पुंदा वेलिंग, संजीव चिम्मलगी, अलका जोगळेकर, पंडित जितेंद्र अभिषेकी आणि इतर पुढे चालवत आहेत. ते मुंबईत चेंबूरला राहत होते. दिनांक 10 जानेवारी 2002 रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या मते ते शरीराने आपल्यात नसले तरी त्यांच्या स्वर, संगीत, ध्वनिमुद्रण, ध्वनिचित्रमुद्रणाद्वारे सदाबहार संगीत कलानिधान रूपात कालातीत रसिकांच्यात आहेत.

(लेखक ज्येष्ठ प्रसिद्धी माध्यम तज्ञ आणि सल्लागार आहेत.)