एक काळ असा होता जेव्हा चित्रपटातील आईने गाजर हलवा बनवला नाही तर आईचे प्रेम जणू सिद्ध होत नसे. ‘मैने तुम्हारे लिए गाजर का हलवा बनाया है’ या वाक्यातून हे प्रेम अनेक दशके हिंदी सिनेमाने अनुभवले. त्याच फिल्मी हलव्याची ही कहाणी.
हलवा हा हिंदुस्थानी उपखंडातील एक सुप्रसिद्ध गोड पदार्थ, पण या पदार्थाचा उगम आपल्या देशातील नाही. हलवा हा शब्द हिंदुस्थानी भाषांमध्ये अरबी भाषेतून आला. अरबी भाषेतील ‘हल्व’ म्हणजे गोड पदार्थ. विविध पदार्थ वापरून हा हल्व बनवला जाई. गोड पदार्थ अर्थात मिठाई तयार करणाऱयाला ‘हलवाई’ नाव मिळाले ते याच पदार्थामुळे. तेराव्या शतकातील ‘किताब अल्व तबीख’मध्ये हलवा या पदार्थाचा पहिला लेखी उल्लेख आढळतो. या पुस्तकात विविध सात प्रकारच्या हलव्यांचा उल्लेख आहे. मात्र त्याहीआधी सातव्या शतकापासून पर्शियन मंडळी हलवा बनवत. सुरुवातीच्या काळात खजूर पेस्ट आणि दूध वापरून हलवा तयार होत असे. नंतर त्यात साखरेसह विविध घटक वापरले जाऊ लागले. अरबी मंडळींकडून हलवा हिंदुस्थानात आला असे काहींचे म्हणणे आहे, तर काही जण त्याचे श्रेय मुघलांना देतात.
आपल्या देशात हलव्यासारख्याच पदार्थाचा उल्लेख अन्य नावाने सोमेश्वराच्या मानसोल्लासात होतो. कर्नाटकातील केळय़ाचा हलवा, तामीळनाडूमधील तिरुनेलवल्लु गव्हाचा हलवा, केरळचा खोबरेल तेल वापरून बनवलेला काळा हलवा, पुण्यातील हिरव्या मिरचीचा हलवा, उत्तर प्रदेशातील अंडा हलवा, हे हिंदुस्थानातील विशेष प्रसिद्ध हलव्यांचे प्रकार. तिरुनेलवल्लु इथला गव्हाचा हलवा तर फक्त संध्याकाळी विक्रीसाठी उपलब्ध होतो. हिरव्या मिरचीचा हलवा नावावरून बुचकळय़ात टाकणारा असला तरी मिरचीच्या बिया काढून, त्यातला तिखटपणा पूर्णपणे काढून नंतर खवा, साखर, गुलाबपाणी, सुकामेवा वापरून हा अजब हलवा बनवला जातो. एकूण काय तर देशाच्या प्रत्येक प्रांतात स्वतःची खासियत असणारा हलवा बनतो, पण संपूर्ण हिंदुस्थानात सामायिक असणारी पाककृती गाजर हलव्याची.
गाजर हलव्याचा संदर्भ फार प्राचीन काळापासून मिळत नाही. मध्य आशियात दहाव्या शतकात गाजरांची लागवड झाली. त्यानंतर अफगाणिस्तानातून गाजर आपल्याकडे आल्याचा अंदाज आहे. त्यामुळे गाजर हलवाही तुलनेने अलीकडचा ठरतो. आधीच्या पाककृतींमध्ये हा हलवा मंद आचेवर दूध, किसलेली गाजरे, साखर, वेलची यांच्या मिश्रणात घट्ट बनेपर्यंत शिजवण्याचा उल्लेख आढळतो. नंतरच्या काळात खवा, मावा वापरून या हलव्याचे रूप पालटले गेले.
विशेष कार्यक्रमांसाठी गाजर हलव्याला स्टारडम देण्यात हिंदी चित्रपटांचा हातभार मोठा आहे. 60 ते 90 च्या दशकातील चित्रपटातल्या यच्चयावत मातांची आपल्या लेकरांच्या कोडकौतुकाची एकच परिभाषा होती, ‘मैने तेरे लिये बडे प्यारसे गाजरका हलवा बनाया है.’ याचाही फायदा या हलव्याला मिळाला.
काही असो, पण गाजर हलवा बनवणे ही कला आहे. त्यातील तोल सांभाळत गाजरे जास्त किंवा खवा, मावा जास्त न होऊ देता संतुलित हलवा बनवण्याचे कसब सगळय़ांकडेच नसते. या मस्त थंडीच्या मोसमात लालबुंद रंग, खव्याचा दाटपणा आणि सुक्यामेव्याची पखरण घेऊन येणारा हा गाजर हलवा म्हणजे थंडीचा सदिच्छादूतच ठरतो.
एकदा तरी हवाच…
विविध प्रांतांत मिळणाऱया हलव्यांच्या पलीकडे गाजर हलवा लोकप्रिय आहे. याचे कारण आशियातील लालबुंद गाजरे विशिष्ट काळात उपलब्ध होतात. पश्चिमेकडील देशातून आलेल्या नारंगी गाजरांना ती चव नसते. त्यामुळे या थंडीच्या काळात लालेलाल गाजरे बाजारात दिसू लागली की, कित्येक घरांत मोसमात एकदा तरी गाजर हलवा तयार होतोच. गाजराचा स्वतःचा एक गोडवा असतो, त्यामुळे हा हलवा खास ठरतो.