वेबसीरिज- सखोल माहिती देणारी मालिका

>> तरंग वैद्य

औषधं बनवणाऱया काही कंपन्या ठरावीक मापदंड बाजूला सारून, पैसा शक्ती आणि युक्तीच्या जोरावर ‘शॉर्ट कट’ वापरून आपली औषधे बाजारात आणतात फक्त आपल्या तिजोऱया भरण्यासाठी. असा एक वेगळा आणि अचंबित करणारा विषय घेऊन आलेली वेबसीरिज म्हणजे ‘पिल!’

आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला सतत गरज पडणारी वस्तू म्हणजे औषधं-गोळ्या… ह्या गोळ्यांना इंग्रजीत ‘पिल’ म्हणतात. ह्या औषधी गोळ्या बनवण्यासाठी फार्मा किंवा फार्मास्युटिकल कंपन्या अनेक वर्षं संशोधन, प्रयोग केल्यावर विविध आजारांवर परिणामकारक औषधं तयार करतात. म्हणजे पुण्याचंच काम करतात. पण काही कंपन्या ठराविक मापदंड बाजूला सारून, पैसा शक्ती आणि युक्तीच्या जोरावर ‘शॉर्ट कट’ वापरून  औषधं बाजारात आणतात ते फक्त आपल्या तिजोऱया भरण्यासाठी. असा एक वेगळा आणि अचंबित करणारा विषय घेऊन आलेली वेबसीरिज म्हणजे ‘पिल!’ आजारपण आलं की आपण पटकन गोळ्या घेतो, पण गोळ्या कशा तयार होतात, ह्या औषधांचे काही सकारात्मक परिणाम दिसल्यावरच त्यांना बाजारात आणले जाते ही सखोल माहिती आपल्याला ही मालिका बघताना मिळते.

‘फॉरएवर क्युअर’ ही देशातील मोठी आणि नामवंत औषध बनवणारी कंपनी. विविध आजारांवर ह्या कंपनीची औषधं बाजारात आहेत. एक युवा पत्रकार नूर खानची आई आजारी होऊन तिचे देहावसान होते आणि सर्वसामान्यांप्रमाणे तोही आईचे आयुष्य एवढंच होतं हे समजून आईच्या आठवणींसह पुढची वाटचाल करू लागतो. योगायोगाने आणि ‘फॉरएवर क्युअर’च्या दुर्दैवाने त्याच्या वाटेत त्याला एक ‘कॉन्फिडेन्शियल’ फाइल मिळते, ज्यात त्याच्या आईला दिलेलं औषध ‘मेडिकल अॅथॉरिटी ऑफ इंडिया’ने ‘रिजेक्ट’ केल्याचं लिहिलेलं असतं. इकडे ‘डेप्युटी मेडिकल कंट्रोलर’ ह्या पदावर बढती मिळून ‘मेडिकल अॅथॉरिटी ऑफ इंडिया’मध्ये रुजू झालेल्या डॉ. प्रकाशला पण ह्या कंपनीच्या कार्यपद्धतीत गौडबंगाल जाणवतो आणि कंपनीच्या तपासणीसाठी वरिष्ठांकडून मिळणारी परवानगी वारंवार नाकारली गेल्यावर त्याचा संशय आणखीन बळावतो.

डॉ. प्रकाशची सहयोगी गुरसिमरत पण प्रकाशच्या विचारांसोबत असते आणि फॉरएवर क्युअरची डायबिटीसवरची औषधं घेऊन अनेकजणांनी प्राण गमावलेत, काहींना दिसेनासे झाले ही बातमी ती प्रकाश ह्यांना देते. ह्या औषधांची प्रोटोकॉलप्रमाणे चाचणी झालेली नाहीये आणि फक्त कागदांवर खोटे रिपोर्टस् सरकारजमा केले आहेत हे त्याच्या पूर्णपणे लक्षात येतं. दरम्यान नूर खान आणि प्रकाश ह्यांची भेट होते आणि नूर प्रकाशला ज्यांच्यावर ह्या औषधांचा प्रयोग झाला आहे ती माणसं ह्या औषधांचे वाईट परिणाम भोगत आहेत हे सांगतो.

औषधांवर डोळे झाकून विश्वास ठेवणाऱया, औषधांना देवाचे रूप मानणाऱया प्रत्येकासोबत ही फार्मा कंपनी विश्वासघात करीत आहे आणि शासनाचे अधिकारी, नेते ह्यात सामील आहेत हे लक्षात आल्यावर डॉ. प्रकाश हतबल होतो. वरिष्ठांना समजावण्याच्या प्रयत्नात आपली नोकरी गमावतो. फार्मा कंपनीचे मालक, शासनाच्या मेडिकल अॅथॉरिटीचे वरिष्ठ प्रकाश संपला हे समजून खूश होतात. प्रकाश आपल्या नावाप्रमाणे फार्मा इंडस्ट्रीवर येऊ घातलेल्या काळोखाला दूर सारण्यासाठी प्रयत्नबद्ध होतो आणि कोर्टाची पायरी गाठतो. पुढे काय आणि कसं घडतं, कसे प्रसंग उद्भवतात हे सांगण्यापेक्षा बघण्यात जास्त गंमत आहे.

रितेश देशमुख चांगला अभिनेता आहे हे वेगळ्याने सांगायला नको. ह्या वेबसीरिजमध्येही त्याने ताकदीचा अभिनय केला आहे. वरिष्ठांकडून सतत नकार आणि अपमान सहन करण्याची प्रतिक्रिया त्याच्या चेहऱयावर नेमकी येते. भ्रष्ट तंत्राविरुद्ध लढायचं ठरवल्यावर त्याने जो अभिनय केला आहे तो उत्तम दर्जाचा आहे. इथे एक सांगावंसं वाटतं – ‘पिल’ ह्या वेबसीरिजचा हीरो रितेश तर आहेच, पण ‘कन्टेन्ट’ही हीरो आहे. त्यामुळे लेखकही प्रशंसेला पात्र आहेत. पवन मल्होत्रा ‘फॉरएवर क्युअर’ ह्या कंपनीचे सर्वेसर्वा म्हणून भाव खाऊन जातात. अंशुल चौहान ह्या मुलीने मिळालेल्या संधीचे सोने केले आहे. अक्षत चौहानचा पत्रकार नूर खूप खरा वाटतो. इतर कलाकार ओळखीचे नसले तरी अभिनयात कुठेही कमी पडले नाहीत.

औषधं आपली गरज असल्याने औषध व्यवसायामागचे काळे धंदे दाखवणारी ही मालिका आपल्याला खूप जवळची वाटते.  माहीत नसलेल्या अनेक गोष्टींची माहिती  ही मालिका बघताना मिळते. त्यामुळे नुसती करमणूक नसून आपल्या ज्ञानात भर घालणारी ही मालिका आहे. उत्तम कथा, सशक्त पटकथा घेऊन येणाऱया लेखन आणि रिसर्च टीमचेही दिग्दर्शिकासोबत कौतुक. डोळे उघडणारी ‘पिल’ ही आठ भागांची मालिका जियो टीव्हीवर 12 जुलै, 2024 रोजी आली आहे. त्यामुळे वेळात वेळ काढून अवश्य बघा.

 [email protected]

(लेखक सिनेदिग्दर्शक व पटकथाकार आहेत)