>> अनघा सावंत
द वेल्फेअर ऑफ स्ट्रे डॉग्स, मुंबई या सामाजिक संस्थेची स्थापना 1985 मध्ये श्वानांचे संरक्षण व्हावे या हेतूने झाली. 1994 पासून संस्था रेबीज निर्मूलन आणि श्वानांची संख्या नियंत्रणात रहावी यासंबंधी जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारशींचे पालन करून रस्त्यावरील श्वानांसाठी सामूहिक नसबंदी कार्यक्रम राबवत आहे.
मुंबईतील रेबीज निर्मूलन, रस्त्यावरील श्वानांची संख्या नियंत्रित करणे, रेबीज प्रतिबंधाबद्दल लोकांना शिक्षित करणे आणि रस्त्यावरील/बेघर प्राणी दत्तक घेण्यास प्रोत्साहन देणे ही द वेल्फेअर ऑफ स्ट्रे डॉग्स, मुंबई यांची मुख्य उद्दिष्टे आहेत. शिवडी आणि नेव्ही नगर येथे संस्थेची पेंद्रे आहेत. आतापर्यंत संस्था अडीच लाखांहून अधिक रस्त्यावरील प्राण्यांपर्यंत पोहोचली आहे.
संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अबोध आरास यांनी सांगितले की, ‘‘प्राणी हा निसर्गाचाच एक भाग आहे. त्यांनाही आपल्यासारख्याच भावना असतात आणि त्यांचेही आपल्यासारखेच एक जग असते. त्यामुळे ‘जगा आणि जगू द्या’ या तत्त्वाने आपण आणि ते आनंदाने एकत्रित कसे राहू शकतो या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. गेली 27 वर्षे मी या संस्थेशी जोडलेलो आहे आणि या कार्याचे खूप समाधान आहे.’’
दत्तक मेळावा
दत्तक कार्यक्रम हा संस्थेचा मोलाचा उपक्रम असून मालकांनी सोडून दिलेले तसेच रस्त्यावरील श्वान, मांजरे दत्तक घेण्यास संस्था प्रोत्साहित करते. संभाव्य मालकांची कठोर तपासणी केली जात असल्यामुळे या मुक्या जिवांसाठी योग्य घरे सापडतात. मुंबईत ‘दत्तक मेळावा’ ही संकल्पना संस्थेने सर्वप्रथम मांडली.
– संस्थेच्या शिवडी केंद्रावर दररोज सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत प्राण्यांसाठी ओपीडी सेवा उपलब्ध आहे. संस्था दर महिन्याला सुमारे 1000 जनावरांवर विनामूल्य उपचार करते. संस्था रस्त्यावर आणि झोपडपट्टय़ांमधून नियमितपणे श्वानांचे लसीकरण करते.
निर्बीजीकरण
संस्थेचा प्रमुख उपक्रम ‘निर्बीजीकरण’ हा असून व्हॅनद्वारे आणलेल्या रस्त्यांवरील श्वानांचे किंवा महापालिकेने पकडलेल्या श्वानांचे निर्जंतुकीकरण आणि निर्बीजीकरण केले जाते. सहा दिवस त्यांची व्यवस्थित देखभाल करून त्यानंतर रेबीजविरोधी लसीकरण केले जाते आणि जिथून आणले तिथे त्यांना सोडून दिले जाते. दरमहा जवळ जवळ 250 ते 300 रस्त्यावरील श्वान आणि मांजरींची नसबंदी केली जाते.
– संस्था इंग्रजी, हिंदी आणि मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये रस्त्यावरील श्वानांची समस्या, रेबीज प्रतिबंध इत्यादींवर स्लाइड सादरीकरण करते. प्रतिबंधात्मक उपायांची माहिती देण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी रेबीज जनजागृती मोहिमेचे आयोजन केले जाते.
– संस्थमध्ये 50 कर्मचारी असून त्यात तीन पशुवैद्यकीय शल्यचिकित्सक, चार पशुवैद्यकीय चिकित्सक, एक क्षेत्र व्यवस्थापक, नऊ पशू परिचारिका, पर्यवेक्षक, शिक्षण व्यवस्थापक, दोन हेल्पलाइन अधिकारी आणि पशूंची निगा राखणारे बारा परिचर यांचा समावेश आहे. संस्थेचे 150 हून अधिक सक्रिय स्वयंसेवक संस्थेच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी आहेत.
– आतापर्यंत संस्थेने 65,500 नसबंदी केली असून मानवी रेबीज मृत्यूच्या संख्येत 95 टक्केपेक्षा जास्त घट झाली आहे. मुंबई रेबीजमुक्त करण्याच्या आमच्या या प्रयत्नांसाठी आम्हाला ‘पीपल ऑफ मुंबई’ पुरस्कार मिळाला आहे याचा आनंद आहे, अशी माहिती आरास यांनी दिली.