लेख – आधुनिक भारताचे आद्य शिल्पकार

>> अॅड. मनमोहन चोणकर

 मुंबईने ज्यांना श्रीमंत केले असे लक्षावधी लोक आपल्याला सापडतील, पण आपल्या कर्तृत्वाने आणि दातृत्वाने ज्यांनी मुंबईला श्रीमंत केले असे अगदीच मोजके. नाना ऊर्फ जगन्नाथ शंकरशेट हे त्यातील अग्रगण्य नाव. आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने करत नानांनी या मुंबईत चोख व्यापार केला, उदंड पैसे कमावले आणि कमावलेल्या या पैशाचे फक्त उंच इमले बांधता त्यातून समाज घडविणाऱ्या संस्था उभ्या केल्या. नानांनी उभारलेल्या संस्था पाहिल्या की, आजही अवाक व्हायला होते. आज नानांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या या खऱ्या श्रीमंतीचे मॉडेल समजून घेण्याचा केलेला हा प्रयत्न.

नाना ऊर्फ जगन्नाथ शंकरशेट यांचा काळ (1803-1865) हा इंग्रजांविरुद्ध सुरू झालेल्या स्वातंत्र्ययुद्धाच्या आधीचा काळ. मुंबई हे शहर म्हणून आकाराला येण्याचा हा कालावधी. समुद्री व्यापारामुळे हे शहर घडत होते आणि रोजगाराची संधी शोधण्यासाठी लोक या शहरात येत होते. नानांचे कुटुंब या अशा मुंबईत येणाऱ्या लोकांमधील अगदी सुरुवातीला आलेल्यांमधले लोक म्हणायला हवेत. नानांचे पूर्वज बाबूलशेट मुरकुटे अठराव्या शतकात कोकणातून मुंबईत आले. मुंबईच्या आघाडीच्या व्यापाऱ्यांमध्ये त्यांची गणना होत असे.

नानांचे वडील शंकरशेटजी ईस्ट इंडिया कंपनी व इंग्रजांचेही सावकार होते. 1800 मध्ये त्यांची एकूण संपत्ती 18 लाख रुपयांच्या घरात होती, असे संदर्भ सापडतात. नानांची आई लहानपणीच गेली. त्यामुळे वडिलांनीच त्यांना मोठे केले. त्या वेळच्या पद्धतीनुसार घरीच मास्तर येऊन नानांना भारतीय आणि इंग्रजी असे दोन्ही पद्धतीचे शिक्षण मिळाले. त्यामुळे मराठी, संस्कृत आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषांवर नानांचे प्रभुत्व होते. या ज्ञानाचा उपयोग करून नानांनी आपला व्यापार यशाच्या शिखरावर पोहोचविला.

ज्या शिक्षणाने आपण घडलो ते शिक्षण आज सर्वांना सहज उपलब्ध नाही, हे नानांनी जाणले होते. त्यासाठीच शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न नानांनी सुरू केले. देशातील मुलांना उत्तम शिक्षण मिळायला हवे यासाठी सुरू झालेल्या ‘नेटिव्ह स्कूल सोसायटी’ नावाच्या पश्चिम भारतातील पहिल्यावहिल्या शिक्षणसंस्थेचे नाना संस्थापक होते. याच संस्थेने पुढे मुलींच्या शिक्षणाचा आग्रह धरला. अर्थातच त्या वेळी त्याला सनातनी लोकांकडून विरोध झाला. नानांनी हा विरोध मोडून काढत आपल्या घरात मुलींची शाळा सुरू केली. आजही नानांची ही शाळा ‘स्टुडंट्स लिटररी अॅण्ड सायंटिफिक सोसायटी’च्या रूपाने गिरगावात आपले अस्तित्व टिकवून उभी आहे.

एखादा समाज किंवा शहर उभे राहते ते संस्थांच्या जोरावर. समाजातील संस्था जेवढय़ा ताकदीच्या, तेवढा तो समाज बलवत्तर म्हणून ओळखला जातो. ऑक्सफर्डसारखे शहर तिथल्या विद्यापीठामुळे ओळखले जाते, तर न्यूयॉर्कमधला शेअर बाजार जगातील सर्वात मोठा ठरतो. या अशा संस्था शहरे घडवत असतात. हे नानांमधल्या दूरदृष्टीच्या शिल्पकाराने जाणले होते. म्हणूनच मुंबईच्या जडणघडणीच्या काळात नानांनी दीर्घकाळ टिकतील, समाजाला समृद्ध करतील अशा संस्थांच्या उभारणीकडे याकडे प्रामुख्याने लक्ष दिले. नानांचे हे संस्थाकारण आज पुन्हा एकदा समजून घ्यायची वेळ आली आहे.

1819 मध्ये माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन मुंबई इलाख्याचे गव्हर्नर झाले. नानांची आणि एल्फिन्स्टन यांची ओळख झाली. एल्फिन्स्टन यांच्या शिक्षणविषयक कामांमध्ये नानांनी त्यांना मदतीचे आश्वासन दिले. या दोघांच्या प्रयत्नांतून 1822 मध्ये ‘मुंबईची हिंदशाळा आणि शाळापुस्तक मंडळा’ची स्थापना झाली. सर्वसामान्यांपर्यंत शिक्षण न्यायचे असेल तर ते मातृभाषेतून दिले जावे याबद्दल दोघांचेही एकमत होते. त्यामुळेच मराठी, गुजराती व हिंदी भाषांमध्ये प्रथमच क्रमिक पाठय़पुस्तके छापली गेली.

महिलांच्या शिक्षणाप्रमाणेच सतीच्या अमानुष प्रथेविरोधातही नानांनी आपला विरोध नोंदविला. सतीबंदीसाठी 1823 मध्ये ब्रिटिश पार्लमेंटकडे जो अर्ज करण्यात आला होता, त्यावर राजा राममोहन रॉय आणि जगन्नाथ शंकरशेट यांच्या प्रमुख सह्या होत्या. या सतीबंदीमुळे मुंबई इलाख्यात सनातन्यांकडून काही प्रतिक्रिया उमटल्या, तर नाना ते सांभाळून घेतील यावर इंग्रजांचा विश्वास होता. म्हणूनच डिसेंबर 1829 मध्ये लॉर्ड बेंटिकने सतीबंदीच्या कायद्यावर सही केली आणि हजारो वर्षांच्या क्रूर प्रथेचे उच्चाटन झाले. फक्त लोकानुनय करून नव्हे, तर प्रसंगी कटू वाटतील, पण भविष्यवेधी असतील असे ठोस निर्णय समाजाच्या नेत्याला घ्यावे लागतात, हेच नानांच्या सतीबंदीच्या वेळच्या वागण्यातून स्पष्ट झाले.

1845 मध्ये एतद्देशीयांच्या भागीदारीने पश्चिम भारतात वाफेच्या बोटींचा पाया घालणारी ‘द बॉम्बे स्टीमशिप नेव्हिगेशन कंपनी’ उभारण्यात नानांचा पुढाकार होता. त्याच वर्षी जे. जे. रुग्णालय आणि ग्रँट मेडिकल महाविद्यालय, 1851 मध्ये संस्कृतचे शिक्षण सर्वांसाठी खुले करणारे ‘पूना संस्कृत कॉलेज’ (आजचे डेक्कन कॉलेज), 1855 मध्ये पहिले कायदा महाविद्यालय, 1857 मध्ये मुंबई विद्यापीठ आणि जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, 1862 मध्ये व्हिक्टोरिया गार्डन (आजची राणीची बाग) अशा महाकाय संस्थांच्या स्थापनेत नानांनी आपला सिंहाचा वाटा उचलला. 16 एप्रिल 1853 रोजी आशियातील पहिली रेल्वे बोरीबंदर ते ठाणे अशी धावली. या रेल्वेसाठी नानांचे प्रयत्न महत्त्वाचे होते. एवढेच नव्हे तर पूर्वीच्या बोरीबंदर स्थानकाच्या इमारतीवर (आजचे सीएसएमटी) आजही ज्या दोन भारतीयांचा पुतळा आहे, त्यात नानांचाही आहे. रेल्वेमुळे मुंबईत आधुनिकता धावू लागली आणि या शहराचा वेग प्रचंड प्रमाणात वाढला हे कोणीच नाकारू शकत नाही.

भारतीयांच्या समस्या इंग्लंडपर्यंत पोहाचाव्यात यासाठी 1851 मध्ये ‘बॉम्बे असोसिएशन’ नावाची पश्चिम भारतातील पहिली राजकीय संस्था स्थापन झाली. या संस्थेचे ‘प्रतिष्ठत’ अध्यक्ष म्हणून जमशेटजी जिजीभॉय, तर अध्यक्ष म्हणून जगन्नाथ शंकरशेट यांना निवडले गेले. या संस्थेतर्फे ब्रिटिश पार्लमेंटकडे सुधारणांसाठीचे अर्ज केले गेले आणि ते मंजूरही झाले. 1857 च्या उठावात क्रांतिकारकांना मदत केल्याचा आरोप नानांवर झाला. त्यात नानांची चौकशीही झाली, पण काही पुरावे न आढळल्याने त्यांच्यावर कारवाई मात्र झाली नाही.

नानांनी उभारलेले हे काम पाहिले की, आपल्याला यासाठी एक जन्म पुरणार नाही असे वाटत राहते, पण नानांनी आपल्या ज्ञानाचा, शिक्षणाचा आणि श्रीमंतीचा उपयोग समाजासाठी केला. जेवढे या शहराकडून घेतले, त्याच्या कैक पटीने या शहराला, समाजाला परत दिले.

भारताच्या स्वातंत्र्यानंतर देशातील अनेक टर्मिनस, रेल्वे स्थानकांचे नामकरण झाले, पण ज्यांनी हिंदुस्थानात नव्हे, आशिया खंडात पहिली रेल्वे 16-4-1853 रोजी मुंबई ते ठाणे सुरू केली, त्यानंतर रेल्वेचे जाळे देशभर पसरले. म्हणूनच आज देशाची प्रगती आणि विकास होत आहे. त्याकरता मुंबई सेंट्रल टर्मिनसला नाना शंकरशेट मुंबई टर्मिनस नामकरण करण्यासाठी 1996 सालापासून नानाप्रेमी जनता राज्य, केंद्र सरकारकडे पत्रव्यवहार करत आहे. मुंबई सेंट्रल टर्मिनसला त्यांचे नाव देऊन उचित सन्मान, गौरव केंद्र सरकारने पुढाकार घेऊन करायला पाहिजे होता, अशी भावना सर्वसामान्य नागरिकांची आहे. त्यासाठी सरकारला लवकर सुबुद्धी येवो हीच अपेक्षा.

(लेखक नामदार जगन्नाथ (नाना) शंकरशेट प्रतिष्ठानचे सरचिटणीस आहेत.)