साय-फाय- पुनश्च ‘मिशन चांद्रयान’

>> प्रसाद ताम्हनकर

‘चांद्रयान 3’ या मोहिमेच्या दणदणीत यशानंतर हिंदुस्थानची अंतराळ संशोधन संस्था इस्रो आता ‘चांद्रयान 4’ या मोहिमेच्या तयारीला लागली आहे. ‘चांद्रयान 4’ या नव्या मोहिमेत अंतराळयान यशस्वीपणे चंद्रावर उतरवणे आणि चंद्रावरील माती व खडकाचे नमुने गोळा करून ते पृथ्वीवर आणणे असे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ‘चांद्रयान 3’ या मोहिमेद्वारे मिळालेल्या डाटाचा यासाठी खूप उपयोग झालेला आहे. ‘चांद्रयान 3’ या मोहिमेने चंद्रावर विशिष्ट ठिकाणी यान उतरवण्याचा विश्वास अधिक पक्का केल्याचे शास्त्रज्ञ सांगतात. 2040 साली मानवाला चंद्रावर उतरवण्याचे इस्रोचे लक्ष्य आहे. ‘चांद्रयान 4’ या मोहिमेकडे या लक्ष्याचे पहिले पाऊल म्हणून बघितले जात आहे.

चांद्रयानाची ही नवी मोहीम यापूर्वीच्या मोहिमांपेक्षा अधिक खडतर असणार आहे. चंद्रावर सुरक्षित उतरणे, रोबोटिक तंत्रज्ञानाच्या आणि उपकरणांच्या मदतीने चंद्राच्या पृष्ठभागावरील नमुने एका बॉक्समध्ये सुरक्षित गोळा करणे आणि ते सुखरूप पृथ्वीवर परत आणणे असे मोठय़ा जिकरीचे असे हे काम आहे. ‘चांद्रयान 4’ मोहिमेत थ्न्न्-3 आणि झ्एन्न् या दोन रॉकेटच्या मदतीने चंद्रावर स्वतंत्र उपकरणांचे दोन संच उतरवण्यात येतील. त्यानंतर खास या मोहिमेसाठी तयार करण्यात आलेल्या विविध उपकरणांच्या मदतीने तिथले नमुने गोळा केले जातील. ही मोहीम यशस्वी झाल्यास हिंदुस्थानसाठी अंतराळ संशोधन क्षेत्रातील ती एक मोठी भरारी असणार आहे.

विशेष गोष्ट म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर चंद्राच्या संदर्भात एक करार लागू आहे. 1967 साली निर्माण झालेल्या या करारानुसार कोणताही देश हा चंद्रावर आपली मालकी सांगू शकत नाही. तसेच एखाद्या देशाने चंद्रावरून काही नमुने गोळा करण्यात यश मिळवले तर त्या देशाला ते नमुने इतर देशांशी सामायिक करावे लागतील. अर्थात ते देश अशा नमुन्यांचे विश्लेषण करण्यासाठी सक्षम असणे गरजेचे आहे. 1969 आणि 1970 सालात अमेरिका आणि रशियाने चांद्रमोहिमांच्या माध्यमातून असे नमुने प्राप्त करण्यात आणि ते सुरक्षित पृथ्वीवर आणण्यात यश प्राप्त केले आहे. अलीकडे 2020 मध्ये चीननेदेखील ‘चांग इ-5’ या चांद्र मोहिमेद्वारे असे नमुने गोळा केले आहेत, तर जपान अशी मोहीम आखण्याची तयारी करत आहे.

चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करण्यामागे चंद्रावरील जीवसृष्टीचा शोध घेणे हे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. जगभरातील अनेक शास्त्रज्ञ या अभ्यासात गुंतलेले आहेत. आजवर चंद्रावरून गोळा करण्यात आलेल्या नमुन्यांच्या अभ्यासातून त्याच्या जन्माविषयी, त्याच्या इतिहासाविषयी बरीच माहिती मिळवण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. इथल्या मातीच्या केलेल्या अभ्यासातून चंद्राचे नक्की वय काय आहे आणि त्याच्या पृष्ठभागाखाली काय दडले आहे त्याची माहिती मिळवता आली आहे. तसेच तेथील ज्वालामुखींच्या संदर्भातदेखील अभ्यास चालू आहे. एका मोठय़ा टकरीमुळे निर्माण झालेल्या चंद्राच्या ध्रुवीय क्षेत्रात गोठलेल्या अवस्थेत पाणी असल्याचेदेखील स्पष्ट झाले आहे.

अमेरिकेने राबवलेल्या ‘अपोलो’ मोहिमेतील आणल्या गेलेल्या चंद्राच्या पृष्ठभागाच्या नमुन्यांच्या आणि मातीच्या विश्लेषणावरून असे स्पष्ट झाले आहे की, चंद्राच्या पृष्ठभागावर असलेला बेसाल्ट (काळा ज्वालामुखीचा खडक) सुमारे 3.6 अब्ज वर्षे जुना आहे. नव्याने होत असलेल्या अभ्यासात चंद्रावर मानवासाठी उपयोगी अशी कोणती खनिजे आहेत याचा प्रामुख्याने अभ्यास केला जात आहे. चंद्राचा हा अभ्यास भविष्यातील चांद्र मोहिमा आणि चंद्रावर मानवी वसाहत स्थापन करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे.

चांद्र मोहिमेच्या या स्पर्धेत हिंदुस्थानच्या जोडीने अमेरिका आणि चीनदेखील जोरदार प्रयत्न करत आहे. हिंदुस्थानचे सध्याचे लक्ष्य छोटे असले तरी येत्या 5 ते 10 वर्षांत मानवाला पुन्हा एकदा चंद्रावर उतरवण्यासाठी अमेरिका आणि चीनमध्ये स्पर्धा चालू आहे. यामागे राजकीय स्पर्धा हे एक कारण असल्याचे बोलले जाते. गुरुत्वाकर्षण कमी असलेल्या चंद्रावर यशस्वीपणे अवकाशयान उतरवणे आणि तेथील कार्य पार पडल्यानंतर त्या यानाला पुन्हा चंद्रावरून यशस्वी उड्डाण करून पृथ्वीवर सुखरूप परत आणणे हे सगळ्यात मोठे आव्हान असणार आहे. येत्या काही वर्षांत हिंदुस्थानचे अंतराळ क्षेत्र हे 1 ट्रिलियन डॉलर्स (1 लाख करोड) डॉलर्सची अर्थव्यवस्था बनेल, असे तज्ञ सांगत आहेत. ही चांद्र मोहीम हे स्वप्न पूर्ण करण्यास नक्की हातभार लावेल.