लेख – बोलावे मराठी, लिहावे मराठी

>> दिलीप देशपांडे

ज्येष्ठ साहित्यिक, ज्ञानपीठ पारितोषिकप्राप्त तात्यासाहेब वि. वा. शिरवाडकर तथा कवी कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस.  मराठी भाषा दिन, मराठी भाषा गौरव दिन, जागतिक मराठी भाषा दिवस अशा अनेक नावांनी आपण साजरा करत असतो. मराठी साहित्यात कुसुमाग्रजांचे योगदान मोठे आहे. त्यांची ग्रंथसंपदाही खूप मोठी आहे. येणाऱ्या पिढीला मराठीचा विसर पडू नये, मराठीचा वारसा पुढे चालावा म्हणूनच मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्याची प्रथा सुरू झाली. 1999 पासून हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून शासनातर्फे जाहीर करण्यात आला.

मराठी भाषेला पंधराशे वर्षांची परंपरा आहे. जगभरातल्या मोठ्या भाषिकांचा बोलणाऱ्यांचा समूह आहेत त्यात मराठीचा पंधरावा नंबर लागतो, तर नऊ कोटी माणसांची मातृभाषा मराठी आहे. परदेशात अनेक ठिकाणी मराठी मंडळ, महाराष्ट्र मंडळ आहेत. मराठी सणवार व उत्सव ते मोठ्या उत्साहाने साजरे करत असतात. आपण ‘लाभले आम्हांस भाग्य, बोलतो मराठी। जाहलो खरेच धन्य, ऐकतो मराठी।।’ असे म्हणून धन्यता मानतो. पण मी स्वतः मराठी असून मराठीला किती न्याय देतोय हेही तपासणे गरजेचे आहे. खरं म्हणजे आता आपल्यालाच मराठीचा विसर पडत चाललाय. इंग्रजी जरूर शिका, पण त्यासाठी मराठीचा अव्हेर करू नका. गेल्या काही वर्षांत आपली मुले इंग्रजी माध्यमातून शिकावी हा दृष्टिकोन फारच वाढत चाललाय. त्यामुळेच  सुरुवातीपासूनच इंग्रजीत ओळख होत असल्याने मुले आता मराठीत बोलायला अडखळू लागली आहेत. येणारी पिढीच जर मराठीचा वारसा जपणार नसेल तर कसे होणार?

मराठीत बोलायला आपल्याला लाज का वाटावी हेच समजत नाही. छोट्या- छोट्या गोष्टीतून आपण खूप काही करू शकतो. मराठीत खूप मोठी साहित्यसंपदा आहे. हजारोंच्या संख्येने पुस्तके, शेकडो दिवाळी अंक प्रसिद्ध होतात. यातले आपण किती वाचतो? वर्तमानपत्र किती जण वाचता? कुठल्या वाचनाला प्राधान्य देतो? वर्षभरात मराठीतले काही वाचण्याचा संकल्प करा. किमान पाच-सात पुस्तके वाचा. वाचून जवळच्याला प्रवृत्त करा. काही चांगले ग्रंथ खरेदी करा. वाढदिवसाला, लग्न समारंभात पुस्तकांची भेट द्या. इंग्रजी माध्यमातून मुलांचे शिक्षण असले तरी त्यांना मराठीपासून तोडू नका. त्यांना मराठीतली चांगली-चांगली पुस्तके वाचायला द्या, त्यांच्यामध्ये आवड निर्माण करा.

निरनिराळ्या कार्यालयांत कार्यालयीन कामकाज मराठीत व्हावे म्हणून शासनाने निर्णय घेतला आहे व सक्तीचे केले आहे, पण त्यातही प्रगती नाही. संपूर्ण महाराष्ट्रात सर्वच ठिकाणच्या पाट्या मराठीतच हव्यात हा आग्रह धरला पाहिजे. पण फक्त पाट्या मराठीत करून भागणार नाही. महाराष्ट्रात रहिवास करावयाचा त्याला मराठी भाषा अवगत असावी. त्यासाठी काहीतरी धोरण असावे. कोणत्याही भाषेचे संगोपन होण्यासाठी तिचा वापर ज्ञानभाषा म्हणून ज्ञान संवर्धनासाठी होणे आवश्यक आहे.

ज्ञानभाषा म्हणजे जी विज्ञान तंत्रज्ञान शिक्षण आणि विशेषतः उच्च शिक्षण, मूलभूत संशोधन, उद्योग, वाणिज्य, विधी व न्याय प्रशासन आदी प्रगत व्यवहार क्षेत्रांत पूर्ण क्षमतेने व गुणवत्तापूर्ण रीतीने समाजातील सर्व घटकांकडून ती वापरली जाते, तसेच बुद्धीवर्ग आपल्या क्षेत्रातील विचारमंथनासाठी तिचा वापर करतो अशी भाषा. आता मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला असला तरी ती ज्ञानभाषा कशी होईल आणि टिकून राहील याचा विचार महत्त्वाचा आहे व ते सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे. कारण वाचण्यातून, लिहिण्यातून, बोलण्यातून आणि दैनंदिन व्यवहारातून हे शक्य आहे. वाचा, बोला, शिका, शिकवा, टिकवा मराठी.

[email protected]