फिरस्ती- आतेशगाह हिंदू अग्नी मंदिर

>> प्रांजल वाघ 

साधारण सातव्या शतकात अझेर्बैजानमध्ये इस्लामचा प्रवेश झाला. आज हा देश संपूर्णपणे इस्लामी आहे, पण आजही या देशात एक वास्तू उभी आहे, जी प्राचीन काळातील अझेर्बैजानची ओळख टिकवून आहे. बाकूजवळ असलेल्या सुराखानी जिह्यात उभी असलेली ही वास्तू ज्याला किल्ल्यासारखी तटबंदी आहे. या वास्तूचे नाव आहे ‘आतेशगाह’! अग्नीचे गृह असणारी आतेशगाह!

जगाचा नकाशा उघडून दिल्लीपासून हिंदुस्थानच्या वायव्येस एक सरळ रेष काढली तर साधारण 3800 किमी दूर एक छोटासा देश लागतो. 1991 च्या अगोदर सोव्हिएत संघाचा भाग असलेलं, दागेस्तान नावाच्या प्रदेशात कॅस्पिअन समुद्राच्या काठावर असलेलं हे राष्ट्र म्हणजे अझेर्बैजान! 1991 मध्ये सोव्हिएत संघातून अनेक राज्यं तुटली आणि वेगवेगळी राष्ट्रे जन्मास आली. अझेर्बैजान हे त्यातलंच एक! भरमसाट तेलाचे साठे असल्यामुळे हा देश मुळातच श्रीमंत आहे आणि याचं प्रत्यक्ष दर्शन आपल्याला त्याची राजधानी बाकू हिच्या स्थापत्यात दिसते.

साधारण 7व्या शतकात अझेर्बैजानमध्ये इस्लामचा प्रवेश झाला आणि हळूहळू तिथला ख्रिस्त धर्माचा प्रभाव कमी होत गेला. आज हा देश संपूर्णपणे इस्लामी आहे, पण आजही या देशात एक वास्तू उभी आहे, जी प्राचीन काळातील अझेर्बैजानची ओळख टिकवून आहे. बाकूजवळ असलेल्या सुराखानी जिह्यात एक वास्तू उभी आहे. त्याला किल्ल्यासारखी तटबंदी आहे. या वास्तूचे नाव आहे ‘आतेशगाह’! फारसीमध्ये ‘आतेश’ म्हणजे ‘अग्नी’ आणि ‘गाह’ म्हणजे ‘गृह’ किवा ‘स्थान’. जे अग्नीचं गृह आहे ते आतेशगाह!

‘ग्रँड ट्रंक रोड’ हा गेली 2500 वर्षे हिंदुस्थानला आशियासोबत जोडणारा एक प्राचीन व्यापारी मार्ग. महाभारतात ‘उत्तरापथ’ म्हणून ज्याचा उल्लेख आला आहे तोच हा रस्ता. चंद्रगुप्त मौर्य याने हा रस्ता पुढे विकसित केला असे म्हणतात. याच प्राचीन व्यापारी मार्गावर बाकू आणि इतर जागेवरून मालाची ने-आण होत असे. त्यामुळे बाकू येथे अनेक हिंदू, पारसी आणि शीख व्यापारी आपला उद्योग करायचे आणि त्यांचे वास्तव्य तात्पुरते अथवा कायमस्वरूपी वास्तव्य तिथे होते. याच वास्तव्यामुळे तिथे हे ज्वालामंदिर जन्मास आले असावे!

‘आतेशगाह’ येथे त्या जागेचा इतिहास सांगणारी जवळ जवळ 10 संस्कृत, 2 गुरमुखी (पंजाबी) आणि 2 फारसी शिलालेख आहेत! मंदिराच्या कोटसदृश महाद्वारावर असलेल्या शिलालेखाची अथवा आतमधील बहुतांश शिलालेखाची सुरुवात ‘श्री गणेशाय नम’ या वाक्याने होते! इतकेच नव्हे तर महाद्वारावर ‘कमळ’ चिन्ह कोरलेलं आहे. या अग्नी मंदिराचा प्राकार ‘पंचकोनी’ असून मंदिराच्या कोटाच्या भिंतीत वाटसरू, व्यापारी आणि भक्तांसाठी (हिंदू, पारसी आणि शीख) अनेक खोल्या आहेत. आज या खोल्यांमध्ये त्या काळचे जनजीवन दर्शविणारे अनेक पुतळे ठेवले आहेत. अनेक खोल्यांमध्ये त्या काळची भांडी, कपडे आणि त्या ठिकाणचा इतिहास यावर भाष्य करणारे माहिती फलक आहेत. एका खोलीत तर चक्क ‘ॐ गं गणपतये नम’ची ध्वनिफीत अखंड सुरू असते, तर दुसऱया एका खोलीत सध्याच्या काळी स्थापन केलेली श्री गणेशाची मूर्ती आहे! भारतापासून इतक्या दूर येऊन श्री गणेशाचे दर्शन होताच हात आपोआप जोडले जातात!

पंचकोनी आवाराच्या मध्यभागी उभे आहे ते मंदिराचे ‘गर्भगृह’ किवा ‘अग्नीचे स्थान’. या वास्तूवर असलेल्या शिलालेखात स्वस्तिक, त्रिशूल यांसोबत अनेक हिंदू चिन्ह आपल्याला सापडतात!

‘सुराखानी’ हा जिल्हा आपल्या तेलसाठय़ासाठी प्रसिद्ध असलेला प्रदेश. आजही इथे ‘यानारदाग’ या जागी जमिनीतून अविरत ज्वाला बाहेर येत असतात. तसेच ‘आतेशगाह’ येथे पूर्वी होत असे आणि म्हणूनच ‘ज्वालाजी’ या देवीला अर्पित अशी ही वास्तू आहे. तसा उल्लेख अनेक शिलालेखांत सापडतो! येथील अग्नी ही नैसर्गिकरीत्या अनेक शतके अखंडपणे जळत होता, पण विसाव्या शतकात 1969 साली हा अचानक थांबला. आजूबाजूच्या परिसरात जमिनीतून तेल काढले जाऊ लागले आणि त्यामुळे येथील ज्योत मालवली. आज येथे असलेली ज्योत ही कृत्रिमरीत्या तेवत ठेवली आहे.

साधारण 11-12 व्या शतकांपासून ऐतिहासिक पुरावे आणि उल्लेख सापडणारी वास्तू ही हिंदू आहे की पारसी (zoroastrian) यावर अनेक इतिहासकारांमध्ये वादविवाद होते, पण खुद्द पारसी धार्मिक गुरूंनी ही वास्तू हिंदू असल्याचे मान्य केले आहे. कधी अझेर्बैजान येथे जाणे झालेच तर ‘आतेशगाह’ येथे नक्की भेट द्या!

[email protected]