फिटनेस क्वीन

अभिनेत्री किशोरी शहाणे मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. मराठीबरोबरच हिंदी सिनेसृष्टीतदेखील त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली असून त्या ‘फिटनेस क्वीन’ आहेत. जाणून घेऊया त्यांचे फिटनेस गुपित.

किशोरी शहाणे फिटनेसची काटेकोरपणे काळजी घेतातच, पण त्यासाठी कोणत्याही प्रकारची खाण्यापिण्याची बंधने स्वतःवर लादत नाहीत, त्या फार फूडी आहेत. घरासमोरच जुहू बीच असल्याकारणाने चालायला जाणे, रोजच्या आहारात भाकऱयांचा समावेश, सकाळी उठल्या उठल्या चहा, कॉफीऐवजी पौष्टिक काढे, ज्यामध्ये गरम पाण्यासोबत हळद, आले, जिरा पावडर, काळी मिरी, लवंग असणे… साखर नसलेली ग्रीन टी किंवा नुसते गरम पाणी पिणे अशा छोटय़ा छोटय़ा गोष्टी शरीरासाठी फार उपयुक्त ठरतात आणि त्या या गोष्टींचे सेवन करतात.

सकाळी नाश्त्यामध्ये किशोरी वाटीभर काजू, बदाम, पिस्ता, अंजीर, अक्रोड अशा ड्रायफ्रूट्ससोबत टोमॅटो, बीट, गाजर, पालकचा सूप पसंत करतात. किमान सकाळचा नाश्ता हलका असावा. इडली, उपम्यासारखे पदार्थ असावे जे पौष्टिक आणि पोटसुद्धा भरतात, त्याला त्या प्राधान्य देतात. गोड पदार्थ किशोरींना प्रचंड आवडतात. किशोरी म्हणतात, ‘माझ्यासमोर तर फारच मोठे आव्हान आहे, गोड पदार्थांच्या विरुद्ध लढणे.’ चॉकलेट केक, करंजी, लाडू, उकडीचे मोदक, पुरणपोळी असे सर्वच गोड पदार्थ त्यांना आवडतात. त्याचबरोबर हायजेनिक स्ट्रीट फूड, शेवपुरी अन् दही-बटाटा-पुरीवर त्यांचे विशेष प्रेम.

त्यांना व्हेज, नॉनव्हेज अन् पंजाबी फूड प्रचंड आवडते. सरसोंका साग, मक्की की रोटी, दाल मखनी, पनीर मखनी, पंजाबी स्टाइल चिकन, मटण (जे किशोरी स्वतः फार चविष्ट बनवतात), नागपूरचे सावजी चिकन… त्यांची यादी मोठी आहे. किशोरी म्हणतात, स्वादिष्ट मटण खायचे झाले तर कोल्हापूर, राजस्थान, कश्मीर या ठिकाणचे. या ठिकाणाच्या मटणाची चव विसरणे अशक्यच.

आवडीचे सगळे खा, पण मज्जा म्हणून. प्रत्येक गोष्टीला प्रमाण असते. त्यामुळे खाण्यापिण्याच्या बाबतीतसुद्धा योग्य असे प्रमाण असलेच पाहिजे. त्यामुळे स्वस्त खा, मस्त रहा, असे सांगायला त्या विसरत नाहीत.
एक आठवण अशीही…

एकदा किशोरी यांच्या मुळशी येथील फार्महाऊसवर ‘ऐका दाजिबा’ चित्रपटाचे शूट सुरू होते. मल्टिस्टार कास्ट होती. किशोरी स्वतः फुडी असल्याने त्यावेळी त्यांनी स्वतःसोबत इतरांनाही चविष्ट जेवण खाता यावे म्हणून अप्रतिम जेवण बनवणारे आचारी शोधले. शूटिंग सुरू झाल्यानंतर दोन-तीन दिवसांनी त्यांना फोन आला की, ते शेफ अक्षरशः पळून गेले. जवळपास 500 जण शूटिंग युनिटमध्ये असल्याने सर्वांनाच सुंदर, चविष्ट जेवण मिळावे म्हणून शेवटी फाइव्ह स्टार हॉटेलचा शेफ आणि टीम बोलवली गेली. सगळय़ांसाठी पंचतारांकित हॉटेलच्या जेवणाची व्यवस्थाच जणू करण्यात आली.