साय-फाय – डिजिटल अरेस्ट

>> प्रसाद ताम्हनकर

सायबर क्राइमचा आलेख जगभरात जोमाने वाढत चाललेला आहे. नव्या तंत्रज्ञानाचा आणि तंत्राचा वापर करून सामान्य लोकांबरोबर, मोठय़ा कंपनीतले अधिकारी, खासगी महिला कर्मचारी अशा सर्व लोकांना लुबाडले जात आहे. आर्थिक तोटय़ाच्या सोबत मानसिक त्रासाचादेखील अनेकांना सामना करावा लागतो आहे. शहरी भागाच्या सोबत आता गाव आणि तालुक्यांच्या पातळीवरही या नव्या डिजिटल अरेस्टचे लोण पोहोचलेले आहे. यासंदर्भात काही माहिती नसलेले लोक अगदी सहजपणे सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात फसत आहेत आणि त्यांची आर्थिक लुबाडणूक होत आहे. एकटय़ा दिल्ली-एनसीआर या भागात गेल्या तीन महिन्यांत 400 कोटी रुपयांची फसवणूक या गुन्हेगारांनी केली आहे.

मुंबईत सुखाने निवृत्त जीवन जगणाऱया एका काकांना अचानक व्हॉट्सआपवर एक व्हिडीओ कॉल आला. समोरून पोलिसांचा गणवेश घातलेला एक इसम बोलत होता. त्याने आपण अमली पदार्थ विरोधी पथकातून बोलत असून काकांनी नुकत्याच पाठवलेल्या एका पार्सलमध्ये अमली पदार्थ आढळून आल्याचे त्यांना सांगितले. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेत राहणाऱया आपल्या मुलासाठी काकांनी काही खाद्यपदार्थ पाठवलेले होते. अधिकाऱयाचे बोलणे ऐकून ते घाबरले. समोरच्या अधिकाऱयाने संपूर्ण चौकशी संपेपर्यंत त्यांना डिजिटल अरेस्ट केले आहे असे सांगितले. डिजिटल अरेस्ट म्हणजे तुम्ही जिथे आहात तिथेच थांबून राहणे. अर्थात घराच्या बाहेर पडायचे नाही, कोणाला फोन करायचा नाही अथवा कोणाचा फोन उचलायचा नाही. शक्यतो तुम्हाला फोन बंद करून ठेवायला भाग पाडले जाते. अशा प्रकारे काकांना घाबरवून सोडल्यानंतर त्यांना अटक करण्याची, मुलाचा कंपनीत झाला प्रकार कळवण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून तब्बल 50 ते 60 हजार रुपये लुबाडण्यात आले.

काकांना जसे ड्रग्जच्या नावाखाली फसवण्यात आले, तसे अनेकांना तुमच्या मुलाचे अथवा मुलीचे नाव सेक्स रॅकेटमध्ये आले आहे. तुम्हाला आलेल्या पार्सलमध्ये ड्रग्ज किंवा बंदूक सापडली आहे. तुमच्या बँक खात्यातून आर्थिक गैरव्यवहार झाले आहेत. तुमच्या आधारकार्डवरून घेतलेल्या सिमकार्डचा गुह्यात वापर झाला आहे. अशी विविध कारणे सांगून फसवण्यात येत आहे. एखाद्या गुह्यात किंवा संशयात पोलीस येतात व पकडून नेतात अथवा चौकीत चौकशीला बोलावतात एवढेच ज्ञान असलेली सामान्य माणसे या डिजिटल अरेस्ट नावानेच भांबावून जातात आणि अशा गोंधळलेल्या लोकांना फसवणे गुन्हेगारांना अधिक सोपे होते.

सायबर गुन्हेगारीचा हा नवा प्रकार आता फक्त आर्थिक फसवणुकीपर्यंत मर्यादित राहिलेला नाही. काही दिवसांपूर्वी एका मुलीला असेच डिजिटल अरेस्ट करून तिच्याकडून नग्न फोटोंची आणि व्हिडीओचीदेखील मागणी करण्यात आली. एका मध्यमवर्गीय स्त्राrकडून तिच्या बँक खात्याचा तपशील मिळवून त्या खात्याच्या मदतीने काही आर्थिक गुन्हे करण्यात आले. अशाच जाळ्यात सापडलेल्या एका युवकाकडे बँक खात्यात पुरेसे पैसे नाहीत हे पाहून त्याला बळजबरीने त्वरित कर्ज उपलब्ध करून देणारे एक अॅप डाऊनलोड करण्यास भाग पाडण्यात आले आणि कर्जाचे मिळालेले पैसे लुबाडण्यात आले. काही वेळा तर अशी अटक टाळण्यासाठी गुन्हेगारांकडून ािढप्टो करन्सीचीदेखील मागणी करण्यात येते.

सायबर सुरक्षा तज्ञांनी लोकांना यासंदर्भात सावध राहण्याचे आवाहन केले आहे. कायद्यानुसार डिजिटल अरेस्ट असा कोणताही प्रकार अस्तित्वात नाही. लोकांनी विनाकारण घाबरण्याची गरज नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणतीही सरकारी न्याय संस्था कोणत्याही गुह्यासंदर्भात ऑनलाइन चौकशी करत नाही. अनोळखी व्हॉट्सआप कॉल, व्हिडीओ कॉल घेणे टाळावे. कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये. अनोळखी अॅप डाऊनलोड करू नयेत. अशा प्रकारचा कोणताही फोन अथवा व्हिडीओ कॉल आल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा अथवा सायबर ाढाइमच्या हेल्पलाइनवर संपर्क साधावा. ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून अनेकदा हे गुन्हेगार आपली शिकार मिळवत असतात. त्यामुळे कोणताही ऑनलाइन खेळ खेळताना सावधगिरी बाळगावी. शक्यतो स्वतचे नाव, इतर वैयक्तिक माहिती ही अनोळखी लोकांना देणे टाळावे. केंद्र सरकारने यासंदर्भात तातडीने लक्ष घालून तपास यंत्रणांच्या मदतीने सामान्य माणसाला अशा गुह्यांच्या संदर्भात तत्काळ सावध करणे आवश्यक आहे.

अनेकांना रेडिओ ऐकावासा वाटतोय  

आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल वातावरणात कदाचित अनेकांना माहीत नसेल साधारण ऐंशीच्या दशकापर्यंत इराणी हॉटेलमधील ज्युक बॉक्समध्ये आठ आण्याचे नाणे टाकून आपल्या आवडते चित्रपट गीत ऐकावयास श्रोते विलक्षण उत्सुक असत. पानी कम चहा आणि बन मस्काचा आनंद घेत घेत आपले व इतरांनीही नाणे टाकलेले गाणे ऐकण्यात मौज होती. त्याही मागे जाऊन सांगायचे तर साठच्या दशकात मध्यमवर्गीय कुटुंबात घरी रेडिओ विकत आणला तरी तो पाहायला अख्खी चाळ जमे आणि यजमान चिमूटभर साखर वाटत. सत्तरच्या दशकात टेपरेकॉर्डरला महत्त्व आले आणि आपल्याला आवडलेली अनेक गाणी ध्वनिफितीत भरून घेतली जात.

हे का सांगतोय, तर आजच्या यूटय़ूब युगातही पुन्हा रेडिओला महत्त्व आले आहे. सतत उपग्रह वाहिनीवर अथवा यूटय़ूबवर नजर ठेवू शकत नाहीत. घरात असो, कार्यालयात असो, प्रवासात असो, एखाद्या पार्टीत असो  ‘ऐकणे’ शक्य आहे आणि हेच लक्षात घेऊन आता अनेक खासगी रेडिओ स्टेशन कार्यरत आहेत. त्यात ‘म्युझिक मंकी’ या संस्थेचे सर्वेसर्वा सचिन चव्हाण यांनी चित्रपट निर्मिती, व्हिडीओ अल्बम (एकेका गाण्याचे इंग्लंडमधील विविध स्थळांवरचे चित्रीकरण), याबरोबरच ऑडियो गीत यालाही महत्त्व दिले आहे.त्यात नृत्य दिग्दर्शक रेमो फर्नांडिस मुख्य सहकारी आहेत. आता रेमो फर्नांडिस म्हटले की, पटकन त्यांची ‘धूम’, ‘गुड बॉय बॅड बॉय’, ‘जस्ट मॅरिड’, ‘प्यार का पंचनामा’ अशा अनेक चित्रपटांतील नृत्ये डोळ्यांसमोर येतात. आपण नृत्य दिग्दर्शक आहोत याचे भान ठेवून त्यांनी गीत संगीत व नृत्य यांना भरपूर स्कोप मिळेल अशा ‘एनी बडी कॅन डान्स’ ( पहिला व दुसरा), ‘फालतू’, ‘स्ट्रीट डान्सर’ इत्यादी चित्रपटांचे दिग्दर्शन केले. त्यांनी नृत्य दिग्दर्शन केलेली गाणी पुन्हा स्वतंत्रपणे रेडिओवरही ऐकावयास मिळणार हे याचे वैशिष्टय़ आहे.

म्हणजेच दृश्य माध्यमाकडून पुन्हा श्रोत्यांपर्यंत गाणे पोहोचवणे अशी ही कल्पना आणि आज मोठय़ा शहरापासून काही जिह्यांत स्थानिक रेडिओ स्टेशन कार्यरत आहेत. जे तीन-चार जिह्यांतील रसिकांपर्यंत पोहोचते तसेच माळरानावरही ऐकले जाते. रेडिओ माध्यमाकडे मधल्या काळात बरेच दुर्लक्ष झाले होते. घरातील दूरचित्रवाणीवर, उपग्रह वाहिन्या आणि ओटीटीवर मोठय़ा प्रमाणावर दर्शक रमल्याचा व्यावसायिक समज होता. आजच्या काळात कोणतीही नवीन गोष्ट करण्यापूर्वी ‘मार्केट सर्व्हे’ केला जातो. चित्रपट गीते, अनेक वेगवेगळी गाण्यांचा ‘श्रोता’ वाढतोय. ‘म्युझिक मंकी’च्या निमित्ताने हे ‘ऐकायला’ मिळाले म्हणून तुम्हाला सांगितले.

 [email protected]

(लेखक सिनेपत्रकार व समीक्षक आहेत.)