दखल- बालमनाचे भावविश्व

 

>> प्रा. डॉ. नरसिंग कदम बनवसकर

बालकविता या बालकांच्या जीवनाभूती मांडत असतात. बालकांच्या जरी कविता असल्या तरी त्या लिहिणे कठीणप्राय प्रांत असतो. कारण कविता लिहिताना अगोदर त्यांच्या बालमनाच्या जाणिवांपर्यंत पोहोचावे लागले. प्रसंगी आपल्यालाच बालक व्हावे लागते, तेव्हाच त्यांच्या अनुभूती साकारता येतात. डॉ. कैलास दौंड यांनी बालकांच्या अनुभूती अतिशय बारकाव्यानिशी ‘आई, मी पुस्तक होईन‘ या बालकवितासंग्रहातून चित्रित केल्या आहेत.

साहित्यविश्वामध्ये अतिशय रुळलेले नाव म्हणजे डॉ. कैलास दौंड हे होय. ग्रामीण जीवनाशी नाळ असलेला हा साहित्यिक वास्तव जीवन रेखाटतो. त्यांचे स्वतचे बालपण खेडय़ामध्ये गेल्यामुळे ग्रामजीवनातील अस्मानी आणि सुलतानी संकटाने त्रस्त झालेले चित्रणाचे प्रतिबिंब त्यांच्या साहित्यामधून अधोरेखीत झाले. जीवनामध्ये प्रत्येकाने असे काही करावे, असे काही व्हावे की आपल्यामुळे इतरांच्या जीवनाला कलाटणी मिळावी. ही कलाटणी पुस्तकातून मिळते. म्हणून ते बालक पुस्तक होऊ इच्छिते. ते म्हणते,

‘आई, मी पुस्तक होईन, हसत खेळत ज्ञान देईल

धरतील जे मैत्री माझी, जगण्याचे मी भान देईल’

ज्याच्या हातामध्ये पुस्तक आले त्याला कसे जगायचे, कसे वागायचे याचे सर्व ज्ञान आणि भान मिळते. त्यामुळे ते पुस्तक बनू इच्छिते. पक्षी मनाला आनंद देतात हे वास्तव कवी रेखाटतात. मोर हा पिसारा फुलवतो, थुईथुई नाचतो. म्हणून तर कवी म्हणतात,

‘आभाळातले इंद्रधनू, त्याच्यासाठी आले जणू!

थेंब पडती ओली भूई, मोर नाचतो थुईथुई !’

सावित्रीबाईने छळ सहन करून शिक्षणाची फळे स्रियांना दिली म्हणूनच आजच्या स्रिया उच्चशिक्षित होत आहेत. त्या सावित्रीचा कृतज्ञतापूर्वक आदर करताना म्हणतात, ‘साऊ शिकली जिद्दीने जोतिबाने शिकवले, देशातल्या लेकींसाठी आभाळ तिने झुकविले’

पुस्तक नवी स्वप्नं, नवी उमेद, नव्या आशा निर्माण करतात. प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रकाशाचा किरण होऊन येतात म्हणून ‘वाचाल तर वाचाल’ हा संदेश देणारी दौंड यांची कविता आहे. दौंड यांची कविता संविधानाची जागृती करते, जि. प. शाळेचे महत्त्व, अधोरेखित करते. नदीचा पूर, तळ्याचे पाणी, सणवार, मजूर, नाव, वृक्षारोपण, सकाळ-संध्याकाळ, ऋतू कवी अशा विविध विषयाचे महत्त्व मुलांच्या बोबडय़ा बोलातून सर्व समावेशक कसे आहे त्याची काळजी सर्वांनी घ्यावी हा भाव रुजवते.