साहित्य जगत- म.श्री. दीक्षित स्मृतिग्रंथ

>> रविप्रकाश कुलकर्णी

पुण्यातील सार्वजनिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील एक सेवाभावी व्यक्तिमत्त्व म्हणून म.श्री. दीक्षित यांची ओळख होती. त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने (जन्म 16 मे 1924, मृत्यू 16 फेब्रुवारी 2014) स्मृतिग्रंथ तयार करावा असे त्यांच्या अनेक चाहत्यांना वाटत होते. पण त्यासाठी सर्वबाबतीत पुढाकार घेतला  तो उत्कर्ष प्रकाशनच्या सु.वा. जोशी यांनी. त्यामुळेच ‘साहित्यिक काका म.श्री. दीक्षित’ हा स्मृतिग्रंथ वास्तवात येऊ शकला. ग्रंथाचे संपादक आहेत डॉ. मेधा सिधये व रवींद्र ठिपसे.

सदर ग्रंथात ‘म.श्री.’ यांना ओळखणाऱया 18 जणांनी त्यांची व्यक्ती म्हणून आणि त्यांच्या साहित्यकृतीबद्दल विशेष सांगितले आहे. साहित्य प्रेमापोटी त्यांनी मिलिटरी अकाउंट्समधील सुखाची आणि भरोशाची सरकारी नोकरी सोडून महाराष्ट्र साहित्य परिषदेत केवळ साहित्यानंद मिळतो म्हणून तुटपुंज्या पगाराची नोकरी स्वीकारली आणि जणू सारे आयुष्य परिषदेला वाहून घेतले. त्यांच्या या सेवावृत्तीची पावती म्हणजे त्यांच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पायरीला ‘म.श्री.ची पायरी’ असं नाव देऊन त्यांना मानवंदना दिलेली आहे. निखालस आणि निरपेक्ष कार्यकर्तेगिरी त्यांच्या रक्तातच भिनलेली होती. त्यामुळे पुण्यातील अनेक संस्थांशी कार्यशील सहभाग होता. मग ते पुणे नगर वाचन मंदिर असेल नाहीतर महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभा. पुणे ऐतिहासिक वास्तू स्मृती संस्था असेल नाहीतर थोरले बाजीराव पेशवे पुतळा समिती असेल, म.श्री.चा सहभाग नाही असं होऊच शकत नसे. अशा या आपल्या सार्वजनिक कार्याचा हिशेब त्यांनी आपल्या आत्मचरित्रात मांडला हेदेखील विशेष. एके काळचे पुणे काय होते आणि पुणेकरही कसे होते त्याचं लख्ख चित्र या आत्मचरित्रात पाहायला मिळते.

न. म. जोशी यांच्यासारख्या ज्येष्ठ लेखकांनी म.श्री. यांचा गुणगौरव करतानाच खास पुणेरी वानवळा दाखवायला कमी केलेले नाही. दीक्षित यांचा एकुलता एक मुलगा आणीबाणीत तुरुंगात गेला तेव्हा ते हबकले. पण नम यांनी त्यांना धीर दिला की, तुमचा मुलगा राजा आहे आणि राजाच होईल. त्यानंतर दोघे समोरच्या रामनाथमध्ये चहा प्यायला गेले. पुढे नम सांगतात, “एरवी बऱयाच वेळा चहाचे पैसे मी देत असे. पण या वेळी म.श्री. खिशातून पैसे काढत म्हणाले, तुमचं म्हणणं खरं व्हावं म्हणून चहाचे पैसे मीच देणार!’’

आपल्या वडिलांचा गुणगौरव करतानाच डॉ. राजा दीक्षित लिहितात, “एखाद्या सार्वजनिक कार्यकर्त्याच्या फकिरी वृत्तीमुळे त्याचे घर किती पोळते हे आम्ही साक्षात अनुभवले आहे. ‘इतिहास, समाज विचार आणि केशवसुत’ हा प्रबंध आई-वडिलांना अर्पण करताना मी लिहिले होते की, वडिलांच्या ‘सार्वजनिक काका’पणामुळे आमचे कौटुंबिक जीवन विलक्षण पोळलेले असले, तरी त्या चटक्यांनी आम्हाला वेगळी समृद्धीसुद्धा दिलीय. काकांच्या फाटक्या खिशाच्या जाकिटातून मिळालेला सांस्कृतिक ठेवा लाखमोलाचा आहे. अर्थात त्याला आईच्या अबोल त्यागाचे अस्तर आहे.’’

डॉ. मेधा सिधये यांनी म.श्री.चं माणूसपण स्पष्ट आणि परखडपणे मांडले हे विशेष. अटळपणे येणाऱया म्हातारपणाचे त्यांनी दर्शन घडवले आहे. त्यांनी एक प्रसंग सांगितला आहे, “म.श्रीं.ना आपल्या मुलाचा अभिमान होता. पोटात माया होती; पण व्यक्त होणं नाहीच.’’

आतल्या गोटातल्या अशा काही आठवणी या लेखात आहेत. त्यापैकी एक त्या लिहितात, “म.श्रीं.नी अनेक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने पाहिली. मागच्या फळीत राहून कामेही केली. कुसुमावती देशपांडे संमेलनाध्यक्ष झाल्या त्याच्या एक वर्ष आधी त्यांनी फॉर्मवर त्यांची संमतीदर्शक स्वाक्षरी घेऊन ठेवली होती. त्या नको नको म्हणत होत्या; पण कुसुमावतीना अध्यक्ष करायचंच असा म.श्रीं.चा निश्चय होता. त्या अध्यक्ष झाल्या.’’ त्याच लेखात त्यांनी म्हटलंय, “म.श्री.ची म.सा.प. मधली पायरी ही आता नामशेष झाली.’’

धक्कादायक आहे हे…

तसंच सदर ग्रंथात म.श्री. यांचे संक्षिप्त आत्मकथन, त्यांची ग्रंथसंपदा आणि लेखांची सूची दिल्याने ग्रंथाचे संदर्भ मोल वाढलेले आहे. सुरेश नावडकरकृत मुखपृष्ठदेखील देखणे झाले आहे.