ठसा – अतुल परचुरे

>> दिलीप ठाकूर

क्रिकेट सामन्या वेळी अतुल परचुरेची होणारी भेट त्याच्यातील क्रिकेटप्रेमीबरोबरच त्याच्यातील क्रिकेट विश्लेषकाचा प्रत्यय देई. त्याच्या स्वभावात अखेरपर्यंत राहिलेला खेळकरपणा हा त्याच्या क्रिकेटवरील निस्सीम प्रेमाचाही प्रत्यय होता. साठच्या दशकात जन्माला आलेली पिढी कसोटी क्रिकेट, मराठी व हिंदी चित्रपट, त्यातील संगीत आणि भरभरून वाचन यात रमत त्याचा आनंद घेत वाढलेली. अतुल परचुरेही तसाच. त्याला खरं तर क्रिकेटपटू व्हायचे होते. दादर येथील शिवाजी पार्कचा तो रहिवासी असल्याने ते स्वाभाविक होतेच. आपण क्रिकेटपटू न बनल्याची त्याची खंत कायम राहिली. मात्र त्याने संधी मिळेल तेव्हा व तसे क्रिकेटवर लेखन केले. त्यातून त्याला क्रिकेटमधील बारकावे उत्तमरित्या माहीत असल्याचे दिसून येई. अतुल परचुरेच्या निधनाचे वृत्त समजताच कलाकार म्हणून त्याच्या अष्टपैलुत्वाबरोबरच त्याचे क्रिकेट प्रेम, दांडगे वाचन, शिवाजी पार्क कट्टय़ावरचा त्याचा अनेक वर्षांचा सहभाग, त्याचे शिरीष कणेकर यांच्यावरचे प्रेम, अभिनयाशी असलेली एकरूपता आणि जपलेले माणूसपण अशा अनेक गोष्टींसह त्याचे प्रसन्न व्यक्तिमत्त्व डोळ्यांसमोर आले. आपल्या लग्नाच्या पंचवीसाव्या वाढदिवसानिमित 2020 मध्ये ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडला मनसोक्त, मनमुराद भटपंतीसाठी जाऊन आल्यावरच्या तब्येतीच्या तक्रारी आणि मग वैद्यकीय उपचारादरम्यान झालेले कर्करोगाचे निदान या सगळ्यातून जाताना त्याने त्यावर मात करण्याचा केलेला कडवट निर्धार, त्यात त्याला मिळालेले यश हे सगळेच अचंबित करणारे होते. त्यातून तो पुन्हा उभा राहिला. आपली आई, आपली पत्नी सोनिया आणि आपली मुलगी या आपल्या सपोर्ट सिस्टिम आहेत असे तो मनोमन मानत होता.

बालकलाकार म्हणून वयाच्या दहाव्या-अकराव्या वर्षी अभिनयातील कारकीर्दीला सुरुवात केलेल्या अतुल परचुरेने अनेक नाटके, चित्रपट व मालिका या तिन्ही माध्यमांतून त्या प्रत्येक माध्यमाची वैशिष्टय़े, शैली, गरजा जाणून घेत त्याने काम केले. वंदना विटणकर लिखित व सुलभा देशपांडे दिग्दर्शित ‘बजरबट्टू’ या बालनाटय़ात त्याने भूमिका साकारली तेव्हा तो पाचवी इयत्तेत होता. विश्राम बेडेकर लिखित व दिग्दर्शित ‘टिळक आणि आगरकर’ या नाटकात त्याने नाना आगरकर ही व्यक्तिरेखा साकारली. शाळा, अभ्यास, नाटकाच्या तालमी, प्रयोग व दौरे हे सगळे सांभाळत त्याने कलाकार म्हणून प्रवास सुरू केला. आत्मविश्वास, गुणवत्ता, मेहनत आणि सर्वांशी मिळून मिसळून वागणे यातून तो घडत गेला. भरपूर वाचन, जुने चित्रपट व संगीत ऐकणे, आपल्या मित्रपरिवारांत रमणे ही त्याची वैशिष्टय़े. विशेषतः शिवाजी पार्कवरील अनेक वर्षे जन्मलेल्या कट्टय़ावरचा तो अनेकांचा मित्र. अभिनयात त्याने केवढी तरी विविधता दाखवली. एकदा का रंगमंचावर आला की, तो त्या भूमिकेचा होई आणि प्रयोग संपला की, अतिशय सर्वसाधारण माणसासारखा तो असे. त्यामुळेच त्याने ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ नाटकातला ‘(मु)पुंदा’ थोडासा बायकी वागणारा, बोलणारा मुलगा असो आणि ‘नातीगोती’ नाटकातला ‘बच्चू’ हा गतीमंद मुलगा ही दोन अत्यंत वेगळी पात्रे परस्पर भिन्न स्वरूपाची, भिन्न स्वभावांची साकारली. नाटकात तो दिलीप प्रभावळकर व रिमा लागू यांच्यासोबत अतिशय विश्वासाने रंगभूमीवर वावरला, याचे कायमच काwतुक झाले. अतुल परचुरेने पु. ल. देशपांडे यांच्या समोर त्यांचीच व्यक्तिरेखा ‘व्यक्ती आणि वल्ली’ या नाटकातील भूमिका साकारत खुद्द त्यांचीच दाद मिळवली. हा त्याच्या अष्टपैलू कारकीर्दीतील सर्वोत्तम क्षण ठरावा.

अलीकडच्या काळात ‘पप्पू की पगदंडी’ या चित्रपटात त्याने भूमिका साकारलीय. त्यासाठी मनाली येथे 20 दिवसांच्या चित्रीकरणासाठी तो रमला असल्याचा पह्टो या चित्रपटाच्या निर्मितीत सहभागी असलेल्या पराग देसाई यांनी सोशल मीडियात पोस्ट केला. अनेक वर्षांपूर्वी ‘अंजाने द अननोन’ या चित्रपटात त्याने हेलनसोबत छोटीशी भूमिका साकारली. ठाणे जिह्यातील चायना क्रिक येथे त्या चित्रपटाचे चित्रीकरण झाले. ‘जागो मोहन प्यारे’ आणि ‘भागो मोहन प्यारे’ या मालिकांनी तो घराघरात पोहोचला. अनेकांना तो आपल्यातीलच एक वाटला. ‘कापूस काsंडय़ाची गोष्ट’ या नाटकातील त्याच्या अभिनयाला रसिकांची मनसोक्त मनमुराद दाद मिळाली. ‘खिचडी’, ‘पार्टनर’, ‘प्रियतमा’ यांसारख्या चित्रपटांतून त्याचा प्रवास सुरू राहिला. विनोदाचे उत्तम टायमिंग साधणाऱया अतुल परचुरेने ‘माझा होशील ना’ या मालिकेत चक्क खलनायक साकारला.
शिवाजी पार्कमध्ये जडणघडण झालेल्या अतुल परचुरेवर शिवाजी पार्क संस्कृतीचा कायमच प्रभाव होता. ठाणे शहरात राहायला गेला तरी मनाने, वृत्तीने तो कायमच शिवाजी पार्कला असे. मूळचा तो कोकणातील गुहागरचा. त्यामुळे कोकणाविषयीचे त्याचे प्रेम होतेच. यशस्वी अभिनेता म्हणून नावारूपास येत गेल्यावर त्याच्याभोवतीचे वलय वाढत वाढत गेले तरी त्याच्यातील मूळ हजरजबाबी, मिश्कील स्वभाव कायमच राहिला. त्याचा मनस्वी तितकाच दिलदार स्वभाव कायमच लक्षात राहील.

[email protected]