क्लासिक – हमरस्ता नाकारताना

>> सौरभ उद्योजात 

सुसंस्कृत शहरं आणि समाज एखाद्या घनदाट जंगलासारखा वाटणाऱया फ्रान्समधील एक अफाट प्रतिभेचा कवी आणि तितकंच कल्पनातीत आयुष्य जगलेल्या बेबंद माणसाबद्दल व्यक्त होताना हेनरी मिलर यांनी वरील ओळी लिहिल्या आहेत. The Time of The Assasins : A Study of Rimbaud या ग्रंथात प्रख्यात अमेरिकी लेखक हेन्री मिलर यांनी आर्थर रॅम्बो या कवीची साहित्यिक आणि जीवन प्रेरणा मांडली असून यात मिलर यांचं चिंतन प्रामुख्यानं व्यक्त झाल्याचं दिसतं. रॅम्बो या फ्रेंच कवीचं मर्यादित, परंतु बंडखोर आणि प्रभावी लेखन, त्याने त्याला हव्या असलेल्या सुखाचा घेतलेला शोध, त्यात झालेली त्याची भयाण वाताहत अशा काही घटकांभवताल या ग्रंथाची निर्मिती झालेली आहे.

मिलर यांना त्यांच्या वयाच्या छत्तीसाव्या वर्षी हा कवी गवसला. आधी काहीशा नकारात्मक दृष्टीनं ते रॅम्बोच्या नावाला आणि लेखनालाही झटकत होते. रॅम्बोने बंडखोर आणि भाषेची मोडतोड करत कविता लिहिल्या, एक वेगळं वळण दाखवून दिलं, परंतु एकविसाव्या वर्षी लेखन अचानकपणे सोडूनही दिलं. त्यामुळं अगदीच लहान वयात लिहिलेल्या त्याच्या कवितांबाबत मिलर साशंक होते. त्यामुळे या कवितांमध्ये त्यांनी आधी रस दाखवला नसल्याचं या ग्रंथात नमूद केलं आहे. पण पुढे पॅरिसमधल्या त्यांच्या मुक्कामात या कवितांनी त्यांना भुरळ पाडल्याचं दिसून येतं. रॅम्बोचं निधन झालं त्या वर्षी (साल 1891) मिलर यांचा जन्म झाला आणि पुढे 1946 मध्ये म्हणजे रॅम्बोच्या मृत्यूनंतर 55 वर्षांनी हे पुस्तक प्रकाशित झालं. वयाच्या एकोणिसाव्या वर्षापर्यंत ज्याच्या लेखनाने कवितेच्या जगांत उलथापालथ घडवून आणली होती, त्या कवीने एकाएकी लेखन सोडून आफ्रिकेतील वाळवंट गाठावं ही अगदी असामान्य बाब होती. त्याकडे मिलर यांचं लक्ष वेधलं गेलं. रॅम्बोने असं एकाएकी कवितेच्या जगाचा त्याग करून अनिश्चिततेच्या वाळवंटी प्रदेशात उडी घेण्यामागे कुठली कारणे असावीत याचा शोध या ग्रंथात मिलर यांनी घेतला आहे, पण हे काही पूर्णपणे चरित्र लेखन नाही. मिलर यांच्या तात्त्विक विचारांचं मंथन यात मोठी भूमिका बजावत असल्याचं वाचणाऱयाच्या लक्षात येतं. रॅम्बो आणि त्यांच्या जीवनातील साम्यस्थळे, वेगळेपण आणि अर्थात आयुष्यात दोघांनी निवडलेले वेगवेगळे मार्ग यांबद्दलचं चिंतन हे फार वाचनीय आहे. त्यातून कलावंताच्या निर्मितीक्षम मनाचा आणि लेखनातील प्रेरणेचा पैस व कल लक्षात येण्यासाठी अधिक मदत होते. रॅम्बो यांच्या लेखनात असणारी बंडखोरी आणि दुःखाने कुरतडून गेलेलं मन असे दोन आवाज असल्याचं मिलर मांडतात. एखाद्या कवीचं, कलावंताचं मन असं दोन काठांवर तरंगत असतं आणि त्यामागे त्याची दृष्टी व कसब असावं असं वाटत राहतं.

रॅम्बोच्या व्यक्तिमत्त्वात असणारं दुहेरी वर्तन मिलर यांनी काही उदाहरणं देऊन मांडलं आहे. त्याच्या पत्रांची समीक्षा करताना मिलर यांनी रॅम्बोच्या व्यक्तिमत्त्वातील मर्यादाही अगदी तात्त्विक भाषेत मांडल्या आहेत. मिलर यांची लेखनशैली आणि भाषेच्या वापरातील चपखलता हा तर वेगळय़ा लेखनाचा विषय होऊ शकेल.

मुळात मिलर आणि रॅम्बो यांच्यात काही साम्यस्थळे आहेत. त्या अनुषंगाने काही जीवनानुभव त्यांनी सारखे घेतले असं मिलर लिहितात. परंतु रॅम्बो हा साहित्याच्या प्रांतातून जीवनाकडे वळला आणि मिलर यांनी जीवनाचे कडूगोड घोट घेत आपली ऊर्जा साहित्याकडे वळवली हा फरक आहे. रॅम्बोची भाषा आणि विचार हा तत्कालीन समाजाला हादरवून टाकणारा होता. शिष्टाचाराचं अनावश्यक आणि कोंदट वसन त्याच्या कवितांनी फेकून दिलं. मिलर यांच्या लेखनाने वेगळं काय केलं? लैंगिकता आणि मानवी स्वभावाचं अस्सल चित्र आपल्या मोकळ्या लेखन शैलीतून मांडल्यानं त्यांच्या लेखनावरही बंदी घालण्यात आली होती. दोघांच्याही निडर लेखनाने, त्यातील प्रयोगाने साहित्याच्या आणि अभिव्यक्तीच्या कक्षा विस्तारल्या. 1955 साली लिहिलेल्या याच ग्रंथाच्या प्रस्तावनेत व्यक्त होताना,

रॅम्बोचं पृथ्वीवरील आगमन हे गौतम बुद्धांना ज्ञानाचा बोध होणं, ख्रिस्तानं ाtढसावर जाण्याचं स्वीकारणं आणि जोन ऑफ आर्कने एक अविश्वसनीय मोहीम आखणं यांच्या इतकंच चमत्कारिक असावं असं मिलर लिहितात. रॅम्बो हा Surrealism या चळवळीचा जनक मानला जातो. त्याचा प्रभाव पुढील पिढीतल्या अनेक फ्रेंच आणि इंग्रजी साहित्यिकांच्या लेखनावर होता. त्याची वादळी कविता, आजार आणि आयुष्याचा नरकवास असं सगळं मूळ वास्तवाच्या पल्याड जाणारं आहे. मिलर यांच्या या ग्रंथाचा अत्यंत उत्कृष्ट अनुवाद, प्रसिद्ध नाटककार आणि लेखक महेश एलकुंचवार यांनी ‘विनाशवेळा’ अशा शीर्षकाखाली केला असून तो एक अर्थगर्भ अनुभव आहे. मराठीतील दुर्मिळ आणि उच्च दर्जाच्या अनुवादांत याचा वरचा ाढमांक लागतो हे निश्चित!

रॅम्बो आणि मिलर यांचं आकलन एका ओळीतून करून घ्यायचं झाल्यास एलकुंचवारांच्या ‘पश्चिमप्रभा’त डोकावायला हवं. ते लिहितात, ‘ज्ञानेश्वरांच्या सावलीला आपला थकला भागला जीव आपण नेऊ, पण आपले सुख-दुःख भडाभडा वाटून घ्यायचे, तर रॅम्बो आणि मिलरकडेच आपण जाणार. ते सहोदरच वाटतात कुठल्याही कलावंताला.’ त्यामुळे मूळ इंग्रजी ग्रंथ आणि ‘विनाशवेळा’ हा त्याचा अनुवाद, या दोहोंचा आस्वाद घ्यायला हवा. दोन्ही ग्रंथ रॅम्बो आणि मिलर यांच्या भवताल फिरत असले तरीही दोघांचा नाद आणि बाज यांत देखणं वेगळेपण आहे. ती अनुभूती वाचकाने सोडता कामा नये!

 [email protected]

 (लेखक  इंग्रजी साहित्याचे अभ्यासक आहेत.)