मुद्दा – सिंगापूर दुर्घटनेचा धडा

>> कॅप्टन नीलेश गायकवाड

लंडनहून सिंगापूरला जाणाऱया सिंगापूर एअरलाईन्सची ही घटना आहे. उड्डाणानंतर सिंगापूर एअरलाईन्सचे विमान हजारो फूट उंचीवर असताना अचानक जोरात हादरा (टर्ब्युलन्स) बसला व त्यामुळे 73 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आणि 70 हून अधिक प्रवासी जखमी झाले. विशेष म्हणजे आकाशात कोणतेही ढग नव्हते, वादळ नव्हते, विजा चमकत नव्हत्या, दृश्यमानताही कमी झालेली नव्हती, इशाराही दिलेला नव्हता. मग आकाश स्वच्छ असताना टर्ब्युलन्स कसा झाला? प्रवासात प्रवासी जखमी कसे झाले?

विमानांचे उड्डाण होण्यापूर्वी कर्मचारी सुरक्षा पाळण्याबाबत सूचना देतात. त्याचे पालन केले जातेच. उड्डाण करताना आणि विमान उतरताना सीट बेल्ट लावणे अनिवार्य असते. मात्र आता संपूर्ण प्रवासातच सीट बेल्ट वापरण्याची वेळ आली आहे. वाढत्या ‘टर्ब्युलन्स’मुळे प्रवाशांना अधिक सजग राहावे लागणार आहे. याचे कारण अलीकडेच एका विमानातील धक्कादायक प्रकाराने प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. लंडनहून सिंगापूरला जाणाऱया सिंगापूर एअरलाईन्सचे विमान हजारो फूट उंचीवर असताना अचानक एअर टर्ब्युलन्समुळे विमानाला धक्का बसल्याने एका 73 वर्षीय प्रवाशाचा मृत्यू झाला आणि 70 हून अधिक प्रवासी जखमी झाले. विशेष म्हणजे आकाशात कोणतेही ढग नव्हते, वादळ नव्हते, विजा चमकत नव्हत्या, दृश्यमानताही कमी झालेली नव्हती, इशाराही दिलेला नव्हता. मग आकाश स्वच्छ असताना टर्ब्युलन्स कसा झाला? यामध्ये प्रवासी जखमी कसे झाले? आता यावर हवाई क्षेत्रातील तज्ञ काथ्याकूट करत आहेत. यादरम्यान, 22 मेच्या नेचर मासिकेत एक अहवाल प्रकाशित झाला आहे. यात हवामान बदल हा विमानातील टर्ब्युलन्सची तीव्रता वाढवू शकतो आणि त्यामुळे प्रवाशांचा जीव जोखमीत राहू शकतो, असे म्हटले आहे.

20 मे रोजी उड्डाण घेणारे सिंगापूर एअरलाईन्सचे विमान एका धक्याने 1800 मीटर खाली अतिशय वेगाने आले. त्यामुळे प्रवासी आणि त्यांचे सामान विमानाच्या छताला धडकले. एअरलाईन्सच्या 24 वर्षांच्या इतिहासात ही पहिलीच घटना होती. ब्रिटनच्या रीडिंग युनिर्व्हसिटीतील वातावरणाचे अभ्यासक पॉल विलियम्स यांच्या मते, ही टर्ब्युलन्सची घटना विमान प्रवाशांना एखाद्या प्रोजेटाईलमध्ये परावर्तित करते. सीट बेल्ट न घालणाऱया कोणत्याही व्यक्तीसाठी ही स्थिती कोणतेही नियम न पाळणाऱया रोलरकोस्टरमध्ये बसण्यासारखा भयावह अनुभव देते.

विमान प्रवासातील टर्ब्युलन्स नवीन नाही. बहुतांश विमानांना टर्ब्युलन्सचा अनुभव येतोच. जमिनीजवळ, विमानतळाजवळ वेगाने वाहणारे वारे, उड्डाणाच्या वेळी किंवा उतरताना असे हादरे बसू शकतात. अधिक उंचीवर आणि वादळी पावसात हवेचा दोन्ही बाजूंकडील प्रवाह हा विमानाजवळून जाताता टर्ब्युलन्स किंवा गंभीर टर्ब्युलन्स निर्माण करू शकतो. म्हणून चक्रीवादळाची सूचना असेल तर उड्डाणे स्थगित केली जातात. पर्वतरांगावरून जाणारे वारेदेखील टर्ब्युलन्स निर्माण करतात, पण या घटना वारंवार घडत नाहीत. अशा प्रकारच्या हवामानाच्या परिस्थितीचा विमान प्रवासात अपवादात्मक परिस्थितीत सामना करावा लागतो. वेगाने भ्रमंती करणारे वारे विमानाला धक्के देऊन जातात. मात्र कोणत्याही पावसाशिवाय होणाऱया टर्ब्युलन्सला लिअर एअर टर्ब्युलन्स म्हटले जाते. ताज्या घटनेमध्ये कदाचित तेथे वादळ येऊन गेले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हवामान बदलामुळे टर्ब्युलन्सच्या घटना अधिक गंभीर होत आहेत. मागील एका अभ्यासात 1979 आणि 2020 या काळात स्वच्छ हवा असताना टर्ब्युलन्स वाढल्याचे दिसून आले होते. उत्तर अटलांटिकच्या वरच्या दिशेने स्वच्छ हवेतही झालेले टर्ब्युलन्स हे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापेक्षा अधिक शक्तिशाली होते असे या अभ्यासात म्हटले होते. सदर अभ्यास करणाऱया संशोधकांच्या मते, संपूर्ण वातावरणात टर्ब्युलन्सची वाढ झाली आहे. ही वाढ हवामान बदलाचा परिणाम आहे. हे हवामान बदल टर्ब्युलन्स निर्माण करणाऱया वेगवान वाऱयांना अधिक बळकटी देत आहेत. जसजसे वातावरण उष्ण होईल तसतसे स्वच्छ हवेत टर्ब्युलन्सच्या घटना आणखी गंभीर रूप धारण करत राहतील. हवामान बदलासह पडणारा पाऊस आणि पर्वतरांगांच्या परिसरात स्वच्छ हवेतही अनेकदा उलथापालथ होऊ शकते. बहुतेक जेट विमाने सहसा अशा हवेच्या प्रवाहातील चढ-उतार क्षेत्राच्या बरीच वरून उड्डाणे करतात, पण हवेच्या, वाऱयाच्या दिशेमध्ये कधीही बदल होऊ शकतो. त्यामुळे विमानाला कोणत्याही बाजूने दाबाचा सामना करावा लागू शकतो आणि उड्डाणात बाधा येऊ शकते. अर्थात, टर्ब्युलन्सच्या प्रमाणात वाढ झाली तरी उड्डाणे सुरूच राहतील, उड्डाणे थांबवता येणार नाहीत किंवा विमाने आकाशातून पडतील असे नाही. पण सध्या टर्ब्युलन्सचा कालावधी दहा मिनटांचा असला तरी तो भविष्यात वीस ते तीस मिनिटांचा राहू शकतो, असे तज्ञांचे म्हणणे आहे.