मुद्दा – अहंकार आणि हुकूमशाहीला चपराक!

>> सुनील कुवरे

अब  की बार चारसौ पार’ आणि ‘महाराष्ट्रात 45  पेक्षा अधिक’ अशी घोषणा देत लोकसभा निवडणुकीत प्रचाराची राळ उठविणाऱ्या भाजपचा लोकसभा निवडणुकीत फडशा पडला. या निवडणुकीत विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीला 234  जागा मिळाल्या. त्याहून महत्त्वाचे म्हणजे भाजपला चारशे जागा जिंकणे दूरच, पण बहुमताचा 272 आकडासुद्धा गाठता आला नाही. हा जनादेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आहे. गेल्या वेळी भाजपला 303 जागा मिळाल्या होत्या. या वेळी योगेंद्र यादव यांचा अपवाद वगळता इतर सर्व एक्झिट पोल, ओपिनियन पोल करणाऱ्या वृत्तवाहिन्या आणि संस्था निष्प्रभ ठरल्या. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीने भारतीय मतदारांचा विवेक जागृत आहे, आम्हाला गृहीत धरू नका हे दाखवून दिले.

मोदी हे भारतातील एकमेव राष्ट्रपुरुष आहेत असेच  वातावरण भाजपचे नेते देशभर करीत होते. मोदींशिवाय देशाला चेहरा नाही असे भासवत होते. आता सलग तिसऱ्यांदा भाजपचे सरकार सत्तेवर आले असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेला तडा गेला आहे. 2014 आणि  2019 मध्ये खूप विश्वासाने देशातील मतदारांनी अभूतपूर्व अशा पाठिंब्यावर मोदी सरकार निवडून दिले. कारण दीर्घकाळ सत्तेत राहिलेल्या काँग्रेसप्रणित सरकारच्या अनेक गोष्टी भाजपच्या पथ्यावर पडल्या आणि भाजपने केंद्रात स्वबळावर सत्ता आणली. मात्र दोन वेळा सत्ता मिळाल्यानंतर मोदींनी जनतेला दिलेली आश्वासने पाळली नाहीत. जगातला सगळय़ात मोठा पक्ष म्हणून मिरवणाऱ्या भाजपने भारतात विरोधक शिल्लकच ठेवायचे नाही, या अहंकारात राजकारण सुरू केले होते. पुढे पुढे मोदी-शहा यांचा अहंकार इतका वाढला की, ते विरोधी पक्षाला तुच्छतेने वागवू लागले. आता विरोधी पक्षाचे नेते प्रेक्षक म्हणून गॅलरीत बसलेले दिसतील, असे म्हणू लागले. विरोधी पक्षांच्या नेत्यांवर सरकारी यंत्रणांचा वाटेल तसा दुरुपयोग केला गेला. प्रत्येक वेळी विरोधकांची बदनामी करण्यासाठी जाणीवपूर्वक खोटी कारस्थाने रचली गेली. तसेच गेल्या दहा वर्षांत मोदी सरकारने देशात प्रत्येक गोष्टीचा अतिरेक केला. तसेच भाजपने कांदा प्रश्न, बेरोजगार, महागाई असे मूलभूत प्रश्न बाजूला ठेवून मंगळसूत्र, मुस्लिम अशा मुद्दय़ांवर भर दिला. विरोधकांनी संविधान बदल, महागाई, बेरोजगार अशा प्रश्नांवर भर दिला. त्याचा परिणाम 2024 चा निकाल आहे. भाजपच्या हातून महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, प. बंगाल अशा  काही  राज्यांतून पकड निसटली हेही निकालातून दिसून आले.

सत्तेचा गैरवापर फारकाळ सामान्य माणूस सहन करीत नाही आणि वेळ आल्यावर त्याचे उत्तर देतो. अगदी रामाचे राजकारण करण्याचा अतिरेक अयोध्येलादेखील पटला नाही. यातच सारे काही आले. भाजपच्या अहंकाराला आणि हुकूमशाहीला मतदारांनी जबरदस्त चपराक दिली त्याबद्दल मतदारांचे अभिनंदन करायला हवे. तसेच विरोधकांचे ऐक्य असेल आणि थोडे सामंजस्यपणाने घेतले तर काय होऊ शकते, हे महाराष्ट्रात मविआने दाखवून दिले आहे. विरोधी पक्षांनीसुद्धा हुरळून न जाता अजून मोठा पल्ला गाठायचा आहे. परंतु देशाचा श्वास असलेली लोकशाही आणि राज्यघटनेचे महत्त्वही यानिमित्ताने अधोरेखित झाले आहे. महाराष्ट्रापुरते बोलायचे तर विरोधकांना राजकीय लढाईत पराभूत करण्याऐवजी त्यांना राजकीय आयुष्यातूनच उठविण्याचे अतिशय घृणास्पद राजकारण करण्यात आले. त्याचा फटका 45 जागा जिंकून येणार अशी फुशारकी मारणाऱ्या महायुतीला दारुण पराभव पत्करावा लागला. याचे सर्व श्रेय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना द्यावे  लागेल. ज्या हिमतीने यांनी लढा दिला त्याला तोड नाही. महायुतीला केवळ 17 जागांवर समाधान मानावे लागले. कारण भाजपचे चाणक्य आणि अहंकारी नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन मोठे पक्ष फोडले. तसेच राज्यात मराठा आणि ओबीसी भांडण लावून जातीय धृवीकरण करून भाजपला लाभ उठवायचा होता, पण तसे झाले नाही. असे उद्योग या भाजपने केले ते महाराष्ट्रातील जनतेला आवडलेले नाही. त्या जनतेने ही चीड मतपेटीतून व्यक्त केली. सुडाच्या राजकारणाला महाराष्ट्राच्या मतदारांनी आपल्या विवेक बुद्धीने धडा शिकवला आणि असली शिवसेना व असली राष्ट्रवादी कोणती यावर मतदारांनी आपले निर्णायक मत देऊन आपला महाराष्ट्र धर्म जपला.

आताच्या निकालाने रालोआला बहुमत मिळाले. त्यामुळे पुन्हा रालोआचे सरकार बनले. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले, पण यापुढील सत्ताकाळात केवळ मोदी-शहा यांचे चालणार नाही. आपल्या मनात येईल तसे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य या वेळी या दोघांना नसणार. त्यामुळे नवे सरकार  ते कसे चालवतात ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.