लक्षवेधी –  ‘युगयात्रा’ 68 वर्षांनंतरचा हाऊसफुल्ल नाटय़प्रयोग

>> पंजाबराव मोरे

 मिलिंद कला महाविद्यालयाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सादर झालेल्या ‘युगयात्रा’ नाटकाला भरभरून प्रतिसाद लाभला. 68 वर्षांनंतर सादर झालेले हे नाटक प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे ‘हाऊसफुल्ल’ ठरले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1950 मध्ये स्थापन केलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील मिलिंद महाविद्यालयाच्या अमृत महोत्सवानिमित्त महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी 68 वर्षांनंतर धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य म. भि. चिटणीस लिखित ‘युगयात्रा’ नाटक सादर केले. नाटकातील महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी कलावंतांनी उच्च-नीचतेच्या दरीत खितपत पडलेल्या दलित चळवळीची स्थित्यंतरे प्रभावीपणे उभी केली. त्यामुळे हजारो वर्षांपासून अस्पृश्यांवर होणाऱ्या अत्याचारांना वाचा फोडणारे महानायक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापर्यंतचा दलित चळवळीचा  इतिहास रसिकांना चांगलाच भावला. त्यामुळेच खुद्द बाबासाहेबांच्या उपस्थितीत 14 ऑक्टोबर 1956 च्या ऐतिहासिक धम्मदीक्षा सोहळय़ात लाखो अनुयायांनी पाहिलेल्या या नाटकाला 68 वर्षांनंतरही तेवढाच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने नाटक हाऊसफुल्ल झाले.

मिलिंद कला महाविद्यालयाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली प्रधान यांच्या संकल्पनेतून व प्रा. अस्लम युनूस यांच्या दिग्दर्शनात ‘युगयात्रा’ नाटकाचा प्रयोग येथील तापडिया नाटय़ मंदिरात दणक्यात सादर झाला. प्रयोगाच्या पहिल्या प्रवेशापासूनच अस्पृश्यांनी सवर्णांच्या मानसिकतेला विरोध करणाऱ्या प्रत्येक दृश्याला रसिकांनी टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात प्रतिसाद दिला.

‘युगयात्रा’ या नाटकाच्या दहा दृश्यांतून स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंतच्या कालखंडात अस्पृश्यांवरील अत्याचारांचे दर्शन घडविले आहे. दृश्ये जसजशी काळाच्या पटलावरून पुढे सरकत जातात, तसतशी लेखक म. भि. चिटणीस यांनी त्या कालखंडातील अस्पृश्यांच्या दयनीय अवस्थांची स्थित्यंतरे तरलपणे दाखविली आहेत. पहिल्या प्रवेशात रामराज्यात अस्पृश्यांच्या दयनीय अवस्थेची ओळख, दुसऱ्या प्रवेशात रामाच्या हातून तपश्चर्या करणाऱ्या शंबुकाच्या वधाचे दर्शन, तिसऱ्या प्रवेशात बुद्धकालीन वैचारिक तत्त्वज्ञानाचा प्रभाव, चौथ्या प्रवेशात मनुकालीन चातुर्वर्ण्य व्यवस्थेत अस्पृश्यांचा छळ, पाचवा प्रवेश चौदाव्या-पंधराव्या शतकातील संत चोखोबांच्या विठ्ठलभक्तीला अधोरेखित करतो, सहाव्या प्रवेशात जात व्यवस्था गावगाडय़ाच्या आडून संत चोखोबाला कशी संपविते याचे हृदयस्पर्शी चित्रण, सातवा प्रवेश विठू महार दानशूर दामाजीपंताला सोडविण्यासाठी कसे जिवाचे रान करतो यावर भाष्य करतो, आठव्या प्रवेशात विठू महाराच्या कार्याची तत्कालीन जाती व्यवस्थेने केलेली हेटाळणी, नवव्या प्रवेशात स्वातंत्र्यानंतरही बळकट होत गेलेल्या जात व्यवस्थेच्या चौकटीचे चित्रण आणि नाटकातील शेवटचा दहावा प्रवेश महानायक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड मुक्तिसंग्रामानंतर आयुष्यभर स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय या चार मूलभूत मानवी हक्कांसाठी दिलेला लढा आणि त्याचा दूरगामी परिणाम याविषयीचे चित्रण केले आहे.

हे नाटक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्राचार्य म. भि. चिटणीस यांना लिहायला सांगितले होते. कलाकार मात्र महाविद्यालयातील विद्यार्थीच असतील अशी अट घातली होती. त्यानुसार त्या वेळीही विद्यार्थ्यांनी मिलिंद महाविद्यालय आणि नंतर डॉ. बाबासाहेबांच्या सूचनेवरून नागपूरच्या ऐतिहासिक धम्मदीक्षा सोहळय़ातही ‘युगयात्रा’ नाटक सादर केले होते. त्या वेळी ओपन थिएटरप्रमाणे लाखो नवबौद्धांनी हे नाटक बघितले होते. त्यानंतर तब्बल 68 वर्षांनी सादर झालेल्या या नाटकाने क्षणाक्षणाला रसिकांची उत्कंठा वाढविली. महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी कुठलीही रंगभूमीची पार्श्वभूमी नसताना आपापल्या भूमिकांना उत्तम न्याय दिला. त्यामुळे अडीच तास खचाखच भरलेले सभागृह, बाहेरील हॉल आणि मैदानातील प्रेक्षक डोळय़ांत प्राण आणून नाटक पाहत होते. मोबाइल आणि हजारो वाहिन्यांच्या काळात असे प्रेक्षक लाभलेले हे अनेक वर्षांमधील पहिले नाटक ठरले. नाटकात बॅकस्टेज टीममधील वाल्मीक जाधव (प्रकाश योजना), सुजितकुमार गायकवाड, शिवाजी डोळसे, कीर्ती सांगोले (वेशभूषा), भार्गवी कुलकर्णी, कविता दिवेकर (रंगभूषा), शिवाजी डोळसे, सचिन तायडे, प्रशिक अंभोरे, विशाल वाळके, कुणाल तायडे, विनोद आघाव (संगीत) आणि रामेश्वर देवरे, सुभाष वानखेडे (नेपथ्य) यांच्या सुयोग्य समन्वयामुळे रंगमंचावरील  प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या भूमिका फुलल्या आणि नाटक ‘न भूतो न भविष्यति’ असे हाऊसफुल्ल झाले एवढे मात्र नक्की.

[email protected]