दिल्ली डायरी – मोदी सरकार ते एनडीएचा ‘टेकू’

>> नीलेश कुलकर्णी

लोकशाही व्यवस्थेत जनता सार्वभौम असते. ती सुज्ञ असते. राजवट नकोशी झाली की ती जनता व्यवस्थित उलथवून लावते. इंदिरा गांधींचे सर्वशक्तिमान सरकार जनतेने पराभूत केले होते. त्यानंतर आलेली जनता पक्षाची सर्कसही जनतेने घालवली. वाजपेयींसारख्या दिग्गजालादेखील सत्तेतून बेदखल केले होते. आता मोदी सरकारलाही जमिनीवर आणले. मोदी सरकार ते एनडीएचा ‘टेकू’ हा अधोगतीचा प्रवास आहे. हा प्रवास किती दिवस सुरू राहतो, हेच आता पाहायचे!

सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच जन्माला आलेला नसतो. मात्र दोन वेळा प्रचंड बहुमताने जनतेने देशाच्या सत्तासिंहासनावर बसवले काय आणि भाजपच्या मंडळींनी ताळतंत्र सोडूनच दिले. फक्त ‘मी, मी, माझे, माझ्यामुळे.’ असेच चित्र होते. ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मोदी नावाचे नेतृत्व तयार केले त्या संघालाही ते खिजगणतीत धरायला तयार होईनात. आयातांना सत्तेची खुर्ची व निष्ठावंताच्या नशिबी सतरंज्या असा कार्यक्रम सुरू राहिला. या सगळय़ाविरोधात आवाज उठवायचा तरी कुठे? हा प्रश्न निष्ठावंतांच्या मनात होता. मात्र विचारायची हिंमत होत नव्हती. अर्थात हे सगळे प्रश्न ईव्हीएम मशीनचे बटन दाबताना विचारले गेले. राजकीय विरोधकांना संपवता येत नसेल तर त्यांचे पक्ष संपवा. हेच मागील दहा वर्षांत घडले. अर्थात हे सगळे बरे नाही असा विचार करणारी मंडळी अजूनही देशात आहेत. त्यांना याचा जाब विचारायचा होताच. माता-भगिनींना ‘अच्छे दिन’बद्दल तर तरुणांना बेरोजगारीबद्दल विचारायचे होते. मोदी सरकार विरोधात असे अनेक प्रश्न जनतेच्या मनात मागील दहा वर्षे होते. ते जनतेला विचारायचेदेखील होते. अखेर हा जाब मतदानाच्या दिवशी जनतेने ईव्हीएमच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना विचारला आणि मोदींच्या सत्तासिंहासनाखालचे जाजम खेचले गेले. दहा वर्षांत ज्या अहंकारात सत्ता गाजविली ती सोडून आता चंद्राबाबू व नितीशबाबूंच्या नाकदुऱ्या काढत महाशक्तीला फेर धरावा लागणार आहे. गर्वाचे घर खाली होतच असते. दिल्लीतील महाशक्तीला जनतेने या वेळी धडा शिकवला.

लोकसभेची निवडणूक सामान्य जनतेने हाती घेतली होती. सत्तेने मस्तवाल झालेले सत्ताधीश विरुद्ध सामान्य जनता असा हा संघर्ष होता. सामान्य जनतेचा आवाज बनण्याचे काम इंडिया आघाडीने केले. त्यामुळे इंडिया आघाडीची देशभरात चमकदार कामगिरी झाली. ‘चारसौ पार’च्या गर्विष्ठ घोषणा दिल्या गेल्या. प्रत्यक्षात 240 पार करता करता दमछाक झाली. मध्य प्रदेश, गुजरात, हिमाचल व उत्तराखंडने शतप्रतिशत यश दिले नसते आणि ओडिशाने अनपेक्षित यशाचा ‘जॅकपॉट’ दिला नसता तर नरेंद्र मोदींना खरोखरच ‘झोला’ उचलून हिमालयात जावे लागले असते. इश्यूला नॉन इश्यू व नॉन इश्यूला इश्यू बनविण्याचा आणि जनतेला मूर्खात काढण्याचा कार्यक्रम गेली दहा वर्षे बेमालुमपणे चालला. मात्र लोकशाही व्यवस्थेत जनता सार्वभौम असते. ती इतकी सुज्ञ आहे की, कोणतीही राजवट नकोशी झाली की तिला व्यवस्थित धक्क्याला लावते. इंदिरा गांधींचे सर्वशक्तिमान सरकार जनतेने पराभूत केले होते. त्यानंतर आलेली जनता पक्षाची सर्कसही याच जनतेने तातडीने सत्तेतून घालवली. वाजपेयींसारख्या दिग्गजालादेखील सत्तेतून बेदखल केले होते. ‘मोदी युग’ ते ‘एनडीएचा टेकू’ हा अधोगतीचा प्रवास आहे. अहंकार भल्याभल्यांना घेऊन डुबतो. मोदी सरकार ते एनडीए सरकार हा आता सुरू झालेला प्रवास ‘गर्वाचे घर खाली’ करणाराच आहे. तो किती दिवस सुरू राहतो, हेच आता पाहायचे!

अयोध्या निकालाचा बोध

अयोध्येत श्रीरामाचे मंदिर बांधण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर भाजपने ज्या पद्धतीने या श्रद्धेच्या मुद्दय़ाचे राजकारण केले ते चीड आणणारे होते. शेकडो वर्षांपासूनचा राम मंदिराचा तिढा जणू नरेंद्र मोदींनीच बसल्या जागी सोडवला असे चित्र निर्माण करण्यात आले. वास्तविक, राम मंदिरासाठी अनेकांनी आपले बलिदान दिले. शरयू नदीतून रक्ताचे पाट पाहिले. त्या वेळी मोदी कुठेही नव्हते. मात्र राम मंदिराचे भव्यदिव्य भूमिपूजन, प्राणप्रतिष्ठा त्यात मोदीमय वातावरण, नरेंद्र मोदीमय झालेले कॅमरे या सगळय़ांचा सामान्य जनतेला वीट आला. श्रद्धा हा व्यक्तिगत विषय आहे. मात्र त्याचे व्यापारीकरण करण्यात आले. राम मंदिराचा मुद्दा निवडणुकीत तारून नेईल या उद्देशाने रामाचा प्रसाद घरोघरी वाटण्यात आला. अर्धवट राम मंदिराचे भूमिपूजन व प्राणप्रतिष्ठा करू नका, असे शंकराचार्य सांगत होते. मात्र मोदी शंकराचार्यांपेक्षाही श्रेष्ठ होऊन बसले. काशी कॉरिडॉरच्या नावाखाली अनेक पुरातन मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली. जुन्या काशीचे वैभव धुळीस मिळविले गेले. कॉरिडॉरच्या माध्यमातून व्यापारी दुकाने थाटली गेली. देव, देश आणि धर्माच्या श्रद्धेला नख लावले गेले. त्याचाच परिणाम म्हणून अयोध्येत तिथल्या जनतेने भाजपच्या लल्लूसिंग नावाच्या उमेदवाराचा दारुण पराभव केला. अयोध्येत श्रीराम आपल्यामुळेच आले या अहंगंडाला दस्तरखुद्द मर्यादापुरुषोत्तम श्रीरामांनीच दुरुस्त केले आहे. त्यातून योग्य तो बोध वेळीच घेतलेला बरा!

कंगना, स्मृती आणि महुआ

लोकसभेच्या निवडणुकीत तीन महिला उमेदवारांचे काय होणार? याकडे देशाचे लक्ष लागले होते. त्यात मुंबईला ‘मिनी पाकिस्तान’ संबोधणाऱ्या कंगना राणावतच्या विजयाची गॅरंटी दस्तरखुद्द देशाच्या पंतप्रधानांनीच घेतल्याने कंगनाचे घोडे कसेबसे गंगेत न्हाले. मात्र अमेठीतून स्मृती इराणींना जनतेने पराभूत केले. गेल्या वेळी राहुल गांधी यांचा पराभव केल्यामुळे स्मृती इराणींना त्या जागतिक वगैरे नेत्या आहेत, असा भास झाला होता. त्याच आविर्भावात त्या पाच वर्षे वावरल्या. मात्र जनतेने गांधी घराण्याचे विश्वासू किशोरीलाल शर्मांना कौल देत स्मृती इराणींना गुड बाय केला. पाच वर्षे मतदारसंघात कसलाही संपर्क नसलेल्या स्मृती इराणी अमेठीत अरेरावीने वागायच्या. जनतेने त्यांच्या अरेरावीला चोख उत्तर दिले. दुसरीकडे अदानींच्या घोटाळय़ासंदर्भात प्रश्न विचारले म्हणून संसदेतून निलंबित करण्यात आलेल्या मार्शल करवी लोकसभेतून बाहेर काढण्यात आलेल्या तृणमूल काँगेसच्या फायरब्रँड नेत्या महुआ मोएत्रा महाशक्तीच्या नाकावर टिच्चून प्रचंड मतांनी पुन्हा लोकसभेत परतल्या आहेत. अदानी घोटाळा बाहेर येऊ नये यासाठी भाजपने त्यांच्या वैयक्तिक चारित्र्यालादेखील हात घातला. मात्र महुआ या सगळय़ांना पुरून उरल्या. देशाला स्मृती इराणींपेक्षा लढणाऱ्या महुआची गरज आहे हे या निकालांनी दाखवून दिले.