मुद्दा – बेछूट तरुणाईचे गंभीर प्रश्न

आपले आर्थिक मान वाढल्याने सर्वच समाजवर्गात सुबत्ता आली. भारतातील गरिबी आता नव्याने तपासावी लागेल इतका चंगळवाद बोकाळला आहे. कुणाचेच कुणावर नियंत्रण नाही अशी परिस्थिती आहे. विद्यार्थी शिक्षकाचे ऐकत नाहीत, घरी मुलं पालकांचे ऐकत नाहीत, नागरिक कायद्याला जुमानत नाहीत, पोलीसच नियमानुसार वागत नाहीत. मंत्री, अधिकारी, राजकारणी यांच्याबद्दल तर बोलायलाच नको. सत्तेपोटी आपण काहीही करू शकतो, आपल्या हाती अनिर्बंध सत्तेने मोकळे रान दिले आहे धुडगूस घालायला, अशी या लोकप्रतिनिधींची धारणा आहे.

एकूणच समाज व्यवस्थेत अनागोंदी आहे. एकीकडे तंत्रज्ञानाची झेप, मूलभूत सुधारणा, जनहिताची कामे, शिक्षण व्यवस्थेत सुधारणा याचे नगारे पिटले जात असले तरी समाजाचे आरोग्य मात्र पार बिघडले आहे. न्याय, नीतिमत्तेच्या,चारित्र्य संवर्धनाच्या बाबतीत चक्क काळोख आहे.

काळानुसार सगळे काही बदलत असताना कायदे का बदलत नाहीत? अल्पवयीन, नाबालिग कुणाला म्हणायचे? दोन-तीन महिने कमी असणाऱया अल्पवयीन बाळाने म्हणजे सोळा-सतरा वर्षांच्या मुलाने दारू पिऊन, नशापाणी करून जर दोन-तीन तरुणींवर बलात्कार केला, नंतर त्यांचा खून केला हे सारे सिद्ध झाले तरी अल्पवयीन म्हणून त्याला बालसुधारगृहात पाठवून वर पिझ्झा, बर्गर खाऊ घालायचे का? हे सारेच संतापजनक आहे. केवळ पैशांच्या जोरावर आपण काहीही करू शकतो हा माज अन् पैशांची देवघेव करून त्यांना मदत करणाऱया राजकीय पुढाऱयांचा सत्तेचा पैफ उतरविण्याची गरज आहे. यासाठी आता सुजाण समाजाने रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. एरवी साध्यासुध्या फालतू गोष्टीसाठी रस्त्यावर उतरणारे राजकीय पक्षांचे युवा नेते म्हणा किंवा महिला मोर्चा म्हणा, त्यांनी सरकारला, तपास यंत्रणेला, न्यायव्यवस्थेला जाब विचारणे गरजेचे आहे.

हे प्रश्न राष्ट्राच्या सुरक्षिततेइतकेच सामाजिक आरोग्यासाठी महत्त्वाचे आहेत. समाज अशा विषाणूंनी रोगी असेल अन् दुबळा असेल तर राष्ट्र बलाढय़ कसे होणार?

अर्थात वयात येणाऱ्या या मुलामुलींना समजवायचे कसे, त्यांचे फालतू लाड नियंत्रित करायचे कसे, त्यांना शिस्तीत वाढवायचे कसे हे खरे प्रश्न पालकांपुढे, शिक्षकांपुढे आज ‘आ’ वासून उभे आहेत. केवळ पदव्या मिळवून कुणी शिक्षित होत नाहीत. संस्कार, उत्तम चारित्र्य, भल्याबुऱयाची विवेकी समज जास्त महत्त्वाची आहे. आपापल्या कमाईच्या विश्वात रममाण असलेल्या पालकांचे तर त्याकडे दुर्लक्ष होतेच आहे किंवा समजून उमजूनही ते पावले उचलण्यास असमर्थ आहेत. शिक्षकांची वृत्ती तर ‘मला काय त्याचे!’ अशी बेपर्वाईची आहे. शिक्षण पद्धतीत होणारे बदल या काwटुंबिक नीतिशास्त्राची, संस्कार संवर्धनाची दखलदेखील घेत नाहीत हे दुर्दैव म्हटले पाहिजे.

याआधी आपण पाश्चात्त्य संस्कृतीला नावे ठेवीत होतो. वाहवत चाललेल्या तिकडच्या हिप्पी विचारसरणीकडे पाहून बोटे मोडत होतो. आजचे आपले चित्र काय सांगते? आपण त्यांच्यावरही मात करतो की काय? अशी भीती वाटते. हे अतिशय गंभीर होत चालले आहे. सीरियलमधील ईशा काय किंवा पुण्याचा गर्भश्रीमंत बाप, आजोबांचा बाळ काय, त्यांची संख्या कोरोनाच्या विषाणूसारखी वेगाने वाढताना दिसते आहे. आपण कोरोनाची लढाई यशस्वीरीत्या लढलो. आता या नव्या तरुणाईत शिरलेल्या, वेगाने वाढणाऱया अपप्रवृत्तीच्या विषाणूचा सामना करायचा आहे.

हे एकटय़ादुकटय़ाचे काम नाही. त्यासाठी सामूहिक प्रयत्न करावे लागतील. मुलांना किती पर्सेंट गुण मिळतात, कुठे प्रवेश मिळतो/ मिळत नाही याची चिंता करीत बसण्यापेक्षा त्याचे घरीदारी वागणे बोलणे कसे आहे, तो किंवा ती कुठे जातात, काय करतात, कुणाशी कसे बोलतात यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. लक्ष ठेवणे याचा अर्थ पोलिसी नजर नाही. नको ती दखलदेखील नाही, पण मुले तुम्हाला उत्तरदायी असायला हवीत. आमचे आयुष्य आहे, आम्ही वाटेल तसे वागू हे घरातून बाहेर पडल्यावर…मोठे, कमावते, स्वतंत्र झाल्यावर. आपण जेव्हा कुटुंब म्हणून एकत्र राहतो तेव्हा घराच्या शिस्तीचे काही नियम असतात. खाण्यापिण्याच्या वेळा पाळणे, कुठे जातो, कशाला जातो हे खरे सांगणे, दररोज घरात एकमेकांशी सर्वांनी संवाद साधणे, परस्परांच्या अडचणी समजून घेणे, तारस्वरात न बोलता, समंजसपणे संवाद साधणे, एकमेकांच्या चुका शोधीत बसण्यापेक्षा आहे त्या समस्येवर सर्वमान्य तोडगा, सोल्युशन शोधण्याचा प्रयत्न करणे, एकमेकांचे अधूनमधून कौतुक करणे, पण फालतू लाड न करणे या अशा छोटय़ा छोटय़ा गोष्टी ( छोटी छोटी बाते) आहेत, ज्या आपण अमलात आणू शकतो. परिस्थिती हाताबाहेर गेलीय असे मुळीच नाही. समस्या कोणतीही असो, त्यावर उत्तर हे असतेच. आपण समस्येचा भाग न होता उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला तर एक नव्हे, अनेक उत्तरे सापडतील, पण समस्याच नाही म्हणून दुर्लक्ष केले तर काही खरे नाही. वेळेतच सावध झाले पाहिजे.
– विजय पांढरीपांडे