लेख – मुक्तापूर आणि 58 गावांचा स्वातंत्र्य लढा

>> उल्हास सोनार

निजामशाहीच्या जोखडातून सोलापूर जिल्ह्यातील 58 गावे 17 सप्टेंबर 1948 रोजी स्वतंत्र झाली. माढा तालुक्यातील मुक्तापूर ही या गावांच्या स्वातंत्र्य लढ्याची राजधानी होती. देश स्वतंत्र झाल्यावर 13 महिने हा भाग पारतंत्र्यात होता. या लढ्याची स्मृती म्हणून 17 सप्टेंबर हा दिवस जामगाव येथे तिरंगा फडकवून साजरा केला जातो. या लढ्याचा केंद्रबिंदू असलेला स्वातंत्र्यसैनिक विठ्ठलराव पाटील यांचा वाडा हे शासनाने स्मारक म्हणून जतन करावे.

सोलापूर जिल्ह्यातील काही गावं, जी निजाम राजवटीत होती, ती 17 सप्टेंबर 1948 रोजी स्वतंत्र झाली होती. 1947 ला भारत स्वतंत्र झाला तरी निजाम राजवटीतील काही गावे अजूनही पारतंत्र्यात होती. रझाकार आणि निजाम यांच्या क्रूर अत्याचारांचा सामना करीत होती. ही जुलमी राजवट उलथवून टाकण्यासाठी सोलापूर जिह्यातील 58 गावे संघर्ष करू लागली आणि 17 सप्टेंबर 1948ला स्वतंत्र झाली. ही 58 गावे आजच्या माढा, मोहोळ, बार्शी, उत्तर सोलापूर तालुक्यांत आहेत. देश स्वतंत्र झाला तरी 13 महिने हा प्रांत पारतंत्र्यात होता. एक वर्ष झाले तरी निजाम हिंदुस्थानात विलीन होण्यास तयार नव्हता. निजाम संस्थानातील लोकांनी निजामाच्या विरोधात जो लढा दिला त्याला हैदराबाद मुक्ती संग्राम असे म्हणतात माढा तालुक्यातील जामगाव ही मुक्तापूर स्वराज्याची राजधानी होती. जामगावचे विठ्ठलराव पाटील यांनी स्वतःचा चिरेबंदी वाडा राजधानीसाठी दिला. आजही त्याच्या पाऊलखुणा आपल्याला वाडय़ात दिसतात. हे गाव स्वातंत्र्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदले गेले. याच वाडय़ात मंत्रिमंडळ स्थापन झाले. जामगावला अनन्यसाधारण महत्त्व आले. राजधानी असल्याने रझाकार आणि निजामाच्या हल्ल्याची टांगती तलवार गावावर असायची; पण लोकांनी दिलेले सहकार्य आणि देशासाठी प्राण देण्याची प्रत्येकाची तयारी यामुळे हे शक्य झाले. हे स्वातंत्र्य तीनच महिने टिकले असले तरी या तीन महिन्यांत लोकांनी खऱया अर्थाने रामराज्य अनुभवले. निजामाच्या जोखडातून मुक्त झाल्यानंतर ते स्वतंत्र भारतात विलीन झाले. निजाम व रझाकाराच्या अनन्वित अत्याचारांच्या घटना घडत होत्या गावंच्या गावं पेटवून दिली जात होती. एकाच गावातील 15 ते 20 लोकांना मारून टाकलं जात होतं. अशातच नाना पाटलांचे प्रतिसरकार स्थापन झाले. फुलचंद गांधी यांच्या नेतृत्वाखाली मुक्तापूर स्वराज्याची वाटचाल सुरू होती. माढा, मोहोळ, परांडा, बार्शी तालुक्यातील 62 गावे 225 वर्षांनंतर स्वतःचा कारभार स्वतः करीत होती.

मुक्तापूर स्वराज्याची शासन पद्धती स्वतंत्र भारतीय सरकारप्रमाणेच राहिली. मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात आली. यामध्ये संरक्षण खाते, पुरवठा खाते, अर्थ खाते, न्याय खाते, आरोग्य खाते, शिक्षण खाते, सामान्य प्रशासन खाते, हेर खाते, टपाल खाते, प्रसिद्धी खाते नेमण्यात आले. निजाम राजवटीला उलथवून लोकाभिमुख शासन देण्याची जबाबदारी या मंत्रिमंडळावर येऊन पडली. ती प्रत्येकाने चोख पार पाडली. या मंत्रिमंडळात विठ्ठलराव पाटलांनी पुरवठा मंत्री म्हणून काम पाहिले. या शासनात मुख्य प्रशासक व मंत्री यांना एक घोडा व सायकल दिली जायची. इतर सवलती दिल्या जात नव्हत्या हे विशेष !

रझाकार आणि निजामाच्या हल्ल्यांपासून येथील जनतेचं संरक्षण करण्याचे काम संरक्षण मंत्र्यांवर होते. संरक्षण खाते राजेंद्र देशमुख, शेषराव वाघमारे आणि रामचंद्र मंत्री यांनी पाहिले. मुक्तापूर स्वातंत्र्याचे सहा प्रशासकीय विभाग करण्यात आले. प्रत्येक विभागात स्वतंत्र पोलीस ठाणे नेमण्यात आले. यामध्ये मसले चौधरी (उत्तर सोलापूर), वाळूज (उत्तर सोलापूर), कारंबा (उत्तर सोलापूर), भोयरे (मोहोळ), मानेगाव (माढा), सासुरे (बार्शी). प्रत्येक पोलीस ठाण्यात एक पोलीस निरीक्षक, महसूलसाठी महसूल अधिकारी नेमण्यात आला. पोलीस निरीक्षकाच्या हाताखाली 15 पोलिसांचे पथक दिले. तीन पोलिसांचा एक गट नेमण्यात आला. या गटाने दररोज दोन गावांत जाऊन तिथल्या संरक्षणाचा आढावा घ्यायचा आणि तिसऱया गावात आपला मुक्काम करायचा. या गावातील बंदोबस्ताचा अहवाल पोलीस ठाण्याला कळविला जात असे आणि तेथूनच तो राजधानी जामगावला पाठविला जायचा. नवीन पोलीस पाटलाच्या नियुक्त्या करण्यात आल्या. जमिनीचे खटले महसूल अधिकारी जागेवर निपटून काढी. अवैध धंदे बंद करण्यात आले. चोर, सावकार, डापू यांच्यापासून संरक्षण देण्यात आले. खऱया अर्थाने मुक्तापूर स्वराज्य म्हणजे रामराज्य होते.

पुरवठा मंत्री म्हणून विठ्ठलराव पाटील आणि रामभाऊ जाधव होते. पुरवठा विभागाने तत्परता दाखवली. ज्यांनी आर्थिक सहभाग नोंदवला, त्यातून स्वराज्यासाठी वस्तू खरेदी केल्या जात होत्या. स्वराज्याचे काम करणाऱयांना दोनवेळचे जेवण, ग्लासभर दूध वेळेवर देण्यात येत असे. वेळेवर आणि सकस अन्नधान्य पुरविण्याची जबाबदारी पुरवठा विभागाने पार पाडली. सर्व खर्चाची नोंद शासन दरबारी नोंदविली जायची.

आरोग्य विभाग आचार्य व्यासाचार्य संदीकर हे मंत्री होते. स्वतः आरोग्य मंत्री आजारी लोकांवर उपचार करीत होते, तर शिक्षण मंत्री म्हणून शिवरकर गुरुजी होते. शाळेत उर्दूची सक्ती तसेच निजामाबद्दल प्रार्थना म्हणावी लागत असे. मुक्तापूर स्वराज्याने यात बदल केला. नीतिमत्तेचे धडे दिले जायचे. भारताची प्रार्थना, स्वातंत्र्य गीत म्हटले जाऊ लागले. वंदे मातरम् म्हटले जात होते. आझाद मुक्तापूर स्वराज्य हे आदर्श स्वराज्य म्हणून पुढे आले. सोलापूर जिह्यातील उत्तर सोलापूर तालुका, दक्षिण सोलापूर तालुका, मोहोळ तालुका, बार्शी तालुका, माढा तालुका यामधील 58 गावे निजामशाहीत होती. माढा तालुक्यातील अंजनगाव, जामगाव, केवड, चव्हाणवाडी, हटकरवाडी, कापसेवाडी, धानोरा, बुद्रुकवाडी, पंचपुलवाडी, खैराव, रिधोरे, उपळाई, सुलतानपूर अशी गावे निजामशाहीमध्ये होती.

स्मारक उभारावे

निजामशाहीच्या जोखडातून माढा तालुक्यातील गावे 17 सप्टेंबर 1948 ला स्वतंत्र झाली. मुक्तापूर स्वराज्याची राजधानी म्हणून जामगाव येथे आम्ही 17 सप्टेंबर हा हैदराबाद मुक्ती संग्राम दिवस तिरंगा फडकवून साजरा करतो आहोत. तालुक्यातील जी गावे त्या काळात निजामशाहीत होती, त्या त्या गावांमध्येही हा दिवस साजरा व्हावा तसेच माझ्या आजोबांनी या वेळी राहता वाडा राजधानीसाठी दिला, त्याचे जतन व स्मरण शासन दरबारी होऊन या ठिकाणी त्यांचे स्मारक उभारले जावे, अशी मागणी सरकारकडे आहे.

– सुहास (काका) पाटील-जामगावकर (उपसभापती, पृषी उत्पन्न बाजार समिती, माढा तथा स्वातंत्र्य सैनिक विठ्ठलराव पांडुरंग पाटील यांचे नातू)