साहित्य जगत – सुरिली मैफिल

>> रविप्रकाश कुलकर्णी

चित्रपट ही एक अशी मायानगरी आहे की, तिच्या पोटात काय दडले आहे हे सांगणे कठीण! चित्रपटसृष्टीसंदर्भात वेगवेगळी पुस्तके वाचताना हे तर प्रकर्षाने जाणवते. शिवाय त्यातल्या माणसा माणसातील संबंध पाहिले तर कधी थक्क व्हायला होते, तर कधी विषण्णही. त्यात जर ते चित्रपट संगीतविषयक पुस्तक असेल तर ते वाचून काय काय आठवेल आणि कळेल हे सांगणे कठीण.

आता गाण्याचीच गोष्ट घ्या. पडद्यावरचे गाणे पाहताना पडद्यावरचे नायक-नायिका पाहायचे, गाण्याकडे लक्ष द्यायचे, गाण्याच्या शब्दांकडे लक्ष द्यायचे की हे त्याच्या संगीताकडे लक्ष द्यायचे? त्यात पुन्हा त्या गाण्यातला तबला सामता प्रसादने वाजवलाय किंवा अॅकॉर्डियन केरसी लॉर्ड यांनी वाजवलाय असे केणीतरी सांगितलेलं असतं. त्यामुळे ज्ञानात (?) भर पडते ती वेगळीच. हे आणि अशा प्रकारचे नाना विचार परत एकदा मनात आले ते राजहंस प्रकाशनने सुहास किर्लोस्कर लिखित ‘गाता रहे…’ मुळे.

त्यांच्याच शब्दात सांगायचे तर ‘नवी जुनी गाणी ऐकताना त्यामधील उमजलेल्या बारकाव्यांची आस्वादकाच्या भूमिकेतून केलेली मांडणी म्हणजे चित्रपट संगीताची अन् वाद्य संगीताची सुरिली मैफिल!

या पुस्तकाला ‘चार शब्द’ लिहिताना संगीतकार कौशल इनामदार ‘गाता रहे’चं नेमकेपण टिपतात. संदर्भासहित संगीत आणि पुढे या पुस्तकाचे मर्म सांगतात. गाण्याचे घटक, गाण्याचे प्रकार, वाद्यांची माहिती, त्या अनुषंगाने येणारी आणि जी सहसा आपल्याला आढळत नाही, अशी वादकांची माहिती ते विविध गाण्यांचे रसग्रहण असा एक फार मोठा पल्ला हे पुस्तक गाठते. विशेषत गेल्या सात एक दशकांचा हिंदी-मराठी सिने आणि भावसंगीताचा काळ ज्यांना समजून घ्यायचा असेल त्यांनी हे पुस्तक जरूर त्यांच्या संदर्भ ग्रंथांच्या शेल्फमध्ये ठेवावे. बहुतांश प्रमाणात संगणकीय संगीत निर्माण होणाऱया या काळामध्ये अकुस्टिक – अॅनलॉग संगीत जगात कसे होते याची अतिशय परिणामकारक तोंडओळख म्हणजे सुहास किर्लोस्कर लिखित ‘गाता रहे…’ हे पुस्तक आहे. पुस्तकाची सुरुवात संगीताची ओळख प्रकरणाने होते. त्यात मुखडा, अंतरा, संचारीबद्दल सांगताना नेमकेपणाने म्हटले आहे, चित्रपट संगीतातील गाण्यातील काव्याचे दोन प्रमुख भाग असतात. रूढ अर्थाने मुखडा म्हणजे गाण्याचा चेहरा, गाण्याची सुरुवात आणि अंतरा म्हणजे गाण्याचे कडवे. मुखडय़ाच्या ओळी अंतऱयानंतर पुनश्च गायल्या जातात. त्यानंतर लेखक अंतऱयाने सुरू होणाऱया गाण्याचे उदाहरण देतो. ‘गाईड‘ चित्रपटातील ‘कांटो से खींच के ये आंचल…’ हा अंतरा आधी येतो आणि मग ‘आज फिर जीने की तमन्ना है…’हा मुखडा येतो.

तर मुखडा नसेलले गाणे म्हणून ‘नया दौर’मधील ‘उडे जब जब जुल्फे तेरी’चा दाखला देतो. अशा एकेक गोष्टीकडे लेखक लक्ष वेधतो. उदाहरणार्थ तो म्हणतो, चित्रपटातील प्रसंग समजून घेऊन त्याप्रमाणे गाणी सर्वच संगीतकारांना तयार करावी लागतात; परंतु काही संगीतकार या प्रसंगाचे तपशील जाणून घेतात. प्रत्येक कडव्यामध्ये काय होणार आहे, चित्रिकरण कुठे करणार आहे, याची माहिती घेतात आणि त्यानुसार कडव्यातील संगीत (M1, M2) तयार करतात. प्रसंगाला अनुसरून वाद्यांचा वापर करतात. यांचे स्पष्टीकरण देण्यासाठी लेखक उदाहरण देतो, ‘आप की कसम’ चित्रपटातील ‘जिंदगी के सफर मे गुजर जाते है जो मकाम’ त्यातले तपशील तो बारकाईने समजावून सांगतो. तेव्हा किती बारीकसारीक गोष्टी गाण्यात दडलेल्या असतात ते उमगते. ज्याने आस्वादात नक्कीच भर पडते.

एकूण ‘आवाज की दुनिया’मध्ये ज्या-ज्या गोष्टी येतात मग त्यात यॉडलिंग असेल, तालवाद्य संयोजन असेल तसेच वाद्य संगीताच्या अनुषंगाने वेगवेगळ्या वाद्यांचा गाण्यात कसा उपयोग केला आहे असेल, किर्लोस्कर यांनी उत्तमरीत्या उलगडून दाखवले आहे. इसराज म्हणजे सारंगी आणि सतारीची वैशिष्टय़े एकत्र करून तयार केलेले वाद्य. त्याला पूर्व आणि मध्य भारतात पूर्वी रावणहत्था म्हणत असत. या भारतीय नावाची उत्पत्ती कशी झाली? अशा अनेक कुतूहल जागृत करणाऱया गोष्टी या पुस्तकात आहेत.

एरवी चित्रपटातील गाणी म्हणजे उडत उडत ऐकायची किंवा त्याच्या चालींवर खुश होऊन जायचे. पण त्याच्या पलीकडे जाऊन गाण्याचा अधिक आनंद कसा मिळू शकतो हे सुहास किर्लोस्कर यांनी उत्तमरीत्या दाखवून दिले आहे.