लेख – मार्मिक आणि भेदक व्यंगचित्रकार!

>> अ‍ॅड. प्रतीक राजूरकर

दुसरे महायुद्ध हे संयुक्त राष्ट्र आणि नाझी सैन्य इतकेच मर्यादित नव्हते. या महायुद्धात डेविड लो हे ‘वन मॅन आर्मी’ म्हणून आपल्या कुंचल्याच्या माध्यमातून हिटलरच्या उन्मादाविरोधात लढत होते. या महायुद्धात तर डेविड लो यांनी आपल्या कुंचल्यातून मवाळ भूमिका घेणारे इंग्लंडचे पंतप्रधान चेंबरलीन, आक्रमक हिटलर, मुसोलिनी यांच्यावर आपल्या मार्मिक व्यंगचित्रांच्या माध्यमातून भेदक हल्ले चढवत इतिहास घडवला.

जगातले पहिले राजकीय व्यंगचित्रकार म्हणून डेविड लो यांची ओळख आहे. कृष्णधवल व्यंगचित्रांच्या काळात डेविड लो यांच्या व्यंगचित्रांनी राजकारणाचे, युद्धाचे अनेक अंतरंग रेखाटले. विन्स्टन चर्चिल यांचे आवडते आणि हिटलरला आपल्या कुंचल्याच्या फटक्यांनी घायाळ करणारे व्यंगचित्रकार अशी डेविड लो यांची ओळख. डेविड लो यांनी संयुक्त राष्ट्रांपेक्षा अधिक हिटलरला आपल्या व्यंगचित्रांतून घायाळ केले. दुसरे महायुद्ध हे संयुक्त राष्ट्र आणि नाझी सैन्य इतकेच मर्यादित नव्हते. महायुद्धात डेविड लो हे ‘वन मॅन आर्मी’ म्हणून आपल्या कुंचल्याच्या माध्यमातून हिटलरच्या उन्मादाविरोधात लढत होते. डेविड लो यांच्या मार्मिक, भेदक आणि प्रभावी व्यंगचित्रांच्या जखमा इतक्या तीव्र होत्या की, जर इंग्लंडवर ताबा मिळवला तर काही लोकांना अटक करण्याची एक यादी हिटलरने बनवली होती. त्यात डेविड लो यांचे नाव अग्रस्थानी होते. दुसऱया महायुद्धाने तंत्रज्ञान, शस्त्र याव्यतिरिक्त जगाला व्यंगचित्रकाराचे सामर्थ्य दाखवून दिले.

7 एप्रिल 1891 मध्ये न्यूझीलंडमध्ये डेविड लो यांचा जन्म झाला. वयाच्या 11 व्या वर्षी डेविड लो यांनी काढलेले चित्र प्रकाशित झाले. चित्र, अर्कचित्र, व्यंगचित्र असा डेविड लो यांच्यातील कलावंताचा प्रवास आहे. फारसे शिक्षण नसलेल्या डेविड लो यांनी आपल्या व्यंगचित्रांतून तत्कालीन राजकीय नेते आणि राजकारणाचे दिलेले धडे इंग्लंडच्या इतिहासाच्या शालेय अभ्यासक्रमात आजही वाचायला मिळतात. 1911 मध्ये डेविड लो हे न्यूझीलंड येथून ऑस्ट्रेलियाला स्थायिक झाले. ‘द बुलेटिन’ नामक माध्यमात डेविड लो अर्कचित्रे, व्यंगचित्रे काढत होते. 1916 मध्ये ऑस्ट्रेलियाचे तत्कालीन पंतप्रधान बिली ह्यूजेस यांच्यावर अनेक व्यंगचित्रे काढल्याने ह्यूजेस यांनी अतिशय अर्वाच्य भाषेत लो यांना शिवीगाळ केल्याची माहिती प्रकाशित आहे. डेविड लो यांनी ह्यूजेस यांच्या काढलेल्या व्यंगचित्राचे ‘द बिली बुक’ नावाने पुस्तक प्रकाशित केले. पुस्तकातील व्यंगचित्रे बघून प्रख्यात इंग्रज कादंबरीकार अर्नोल्ड बेनेट यांनी इंग्लंडच्या माध्यमांना डेविड लो यांना बोलावून आपल्याकडे काम द्यावे असे आवाहन केले. परिणामी लंडनस्थित ‘द स्टार’ सायंदैनिकाच्या मालकांनी डेविड लो यांना व्यंगचित्रकार म्हणून वर्तमानपत्रात काम करण्याची संधी दिली. 1919 पासून डेविड लो लंडनला स्थायिक झाले. दरम्यान दोन चेहऱयाचे गाढव, कर्नल ब्लिंप अशी अनेक काल्पनिक पात्रे डेविड लो यांच्या व्यंगचित्रांतून लोकप्रिय ठरली होती. 1922 सालच्या इंग्लंडच्या सार्वत्रिक निवडणुकीत सर डेविड लो यांची व्यंगचित्रे लिबरल पक्षाने प्रचारात वापरली.

डेविड लो समाजवादी विचारसरणीचे होते. 1927 साली परस्पर विरोधी विचारसरणीचे लॉर्ड बिअवरब्रुक यांच्या ‘इव्हनिंग स्टँडर्ड’ वर्तमानपत्रात सर डेविड लो रुजू झाले. इव्हनिंग स्टँडर्ड वर्तमानपत्रात डेविड लो यांच्यावर कुठलीच बंधने येणार नाहीत, त्यांना व्यंगचित्रांसाठी पूर्णतः मोकळीक दिली जाईल या अटीवर ते काम करण्यास तयार झाले. त्यासाठी ‘इव्हनिंग स्टँडर्ड’नेसुद्धा मनाचा मोठेपणा दाखवला. हिटलर, मुसोलिनी यांच्या अमर्याद राजकीय महत्त्वाकांक्षा डेविड लो यांनी 1930 सालीच ओळखल्या होत्या. हिटलर, मुसोलिनी त्यांच्या देशासाठी किती चांगले नेतृत्व आहेत अशी भावना आंतरराष्ट्रीय स्तरावर होती. अगदी चर्चिलसारखे पुढारीसुद्धा त्याच मताचे होते. डेविड लो यांनी सप्टेंबर 1930 साली हिटलरचे पहिल्यांदा व्यंगचित्र काढले. कालांतराने हिटलर, मुसोलिनी यांच्यावर डेविड लो यांनी काढलेल्या व्यंगचित्रांचा प्रभाव बघता 1933 मध्ये जर्मनी आणि इटलीत डेविड लो यांची व्यंगचित्रे प्रकाशित करण्यास बंदी घातली गेली. 1933 मध्ये स्वतः जर्मनीने अधिकृतपणाने इंग्लंडच्या परराष्ट्र सचिव लॉर्ड हॅलिफॅक्स यांच्याकडे तशी नाराजी व्यक्त केल्याचे संदर्भ उपलब्ध आहेत.

दुसऱ्या महायुद्धात तर डेविड लो यांनी आपल्या कुंचल्यातून मवाळ भूमिका घेणारे इंग्लंडचे पंतप्रधान चेंबरलीन, आक्रमक हिटलर, मुसोलिनी यांच्यावर आपल्या मार्मिक व्यंगचित्रांच्या माध्यमातून भेदक हल्ले चढवत इतिहास घडवला. चर्चिलच्या मते रशियाचे सर्वेसर्वा जोसेफ स्टॅलिन यांनी आपल्या कक्षात डेविड लो यांचे छायाचित्र लावले होते. लो यांच्या 50 वर्षांच्या कारकीर्दीत त्यांची 14 हजार व्यंगचित्रे जगातील 200 वर्तमानपत्रांत प्रकाशित झाली. 1961 मध्ये इंग्लंडमध्ये त्यांना नाईटहूड पदवी देऊन गौरविण्यात आले. जगाला आपल्या कलेतून अंतर्मुख व्हायला लावणारे सर डेविड लो हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आवडते व्यंगचित्रकार होते. 19 सप्टेंबर 1963 रोजी सर डेविड लो यांचे निधन झाले. डेविड लो यांच्या मृत्यूपश्चात त्यांची व्यंगचित्रे आज सहा दशकांनंतरसुद्धा जिवंतपणाची साक्ष देतात.