लेख – मराठवाड्यातील बालकुमार साहित्य संमेलने

>> प्रशांत गौतम

मराठवाडा साहित्य परिषदेचे पहिले एक दिवशीय बालकुमार साहित्य संमेलन आज पैठण येथे होत आहे. पहिल्या संमेलनाचा बहुमान नांदेड येथील शिक्षक, कार्यकर्ता व लेखक डॉ. सुरेश सावंत यांना देऊन शिक्षण, साहित्य आणि कार्यकर्त्यांचा सन्मानच केला आहे. पहिल्या संमेलनासाठी पैठणची मसाप शाखा आणि विशाल बहुउद्देशीय प्रतिष्ठान यांचे सहकार्य लाभले आहे. मसापचे हे पहिले संमेलन असले तरी काही बालकुमार साहित्य संमेलने मराठवाडय़ात विविध ठिकाणी झाली आहेत. यानिमित्ताने संमेलन चळवळीचा आढावा घेणारा लेख…

साधारणतः 30-35 वर्षांपूर्वी आणि त्याआधीही मराठवाडय़ात बालसाहित्य क्षेत्रात कथा, कविता, कादंबरी, बालनाटय़, लेखन करणारी मंडळी होती, आजही आहेत. तसेच बालसाहित्य चळवळीत काम करणारे कार्यकर्तेही तेव्हा होते आणि आजही आहेत. लेखकांना लिहिण्यासाठी दैनिकांच्या रविवार पुरवण्या, मुलांची मासिके, दिवाळी अंक असे व्यासपीठ उपलब्ध होते. शिवाय आकाशवाणीसारखे प्रसार माध्यम तेव्हा होते. आजच्या काळात दैनिकांच्या पुरवणीत बालसाहित्याला मर्यादित जागा प्राप्त झाली. मासिक दिवाळी अंक आहेत. आकाशवाणीलाही मर्यादा आल्या. 30-35 वर्षांपूर्वी आजच्या एवढा संमेलनाचा सुकाळ नव्हता. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, मराठवाडा साहित्य संमेलन होत असली तरी त्यात बालमेळाव्यास अत्यल्प स्थान होते. नाही म्हणायला पुण्याची अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था नियमित संमेलने आयोजित करीत असे, पण त्यातही मराठवाडय़ास नगण्य स्थान होते. अशा काळात म्हणजे 1991 च्या सुमारास लेखक प्रकाशक बाबा भांड आणि दत्ता डांगे यांना मराठवाडय़ाचे स्वतंत्र बालकुमार साहित्य संमेलन असावे, असे वाटले. त्या संकल्पनेनुसार किनवट येथे पहिले एक दिवशीय मराठवाडा बालकुमार साहित्य संमेलन ठरले. आयोजक म्हणून स्थानिक नेत्याच्या सेवाभावी संस्थेने जबाबदारी स्वीकारली. अध्यक्षपदाचा सन्मान ज्येष्ठ बालसाहित्यकार, संपादक महावीर जोंधळे यांना लाभला. यात पुस्तक प्रकाशन, कथाकथन, परिसंवाद, कवी संमेलन, चित्र-काव्य सादरीकरण आणि समारोप असे आटोपशीर संमेलन पार पडले. संमेलनाच्या आधी व नंतर उदंड प्रसिद्धी पहिल्या संमेलनास लाभली. त्यानंतर 2000 वर्षापर्यंत ही सहा संमेलने नायगाव बाजार, उदगीर, अंबाजोगाई भालगाव, बिडकीन येथे सातत्याने होत गेली. या संमेलनाचे अध्यक्षपद अनुक्रमे बाबा भांड, प्राचार्य दत्ता ससे, प्राचार्य सुभाष वसेकर, शिक्षण तज्ञ भा. दो. पाटील आणि सूर्यकांत सराफ यांना लाभले. यातील ससे, वसेकर, पाटील हे माजी अध्यक्ष आज हयात नाहीत, पण उर्वरित तीन माजी अध्यक्ष या संमेलनाचे साक्षीदार आहेत. नंतरच्या काळात ही संमेलने सहकार्य, पाठबळाअभावी कायमची बंद पडली. यामुळे लेखन आणि वाचन कार्यकर्ता चळवळ काही ठप्प झाली नाही.

1992च्या सुमारास मराठवाडय़ात 10 वे अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन परभणी जिह्यात सेलू येथे निश्चित झाले. स्थानिक आयोजक म्हणून सेलूच्या नूतन महाविद्यालयाने जबाबदारी स्वीकारली. अध्यक्षपदाचा सन्मान अर्थातच महावीर जोंधळे यांना लाभला. बालसाहित्य क्षेत्रातील दिग्गज लेखक मंडळी फास्टर फेणेकार भा. रा. भागवत, लीलावती भागवत, यदुनाथ थत्ते, राजाभाऊ मंगळवेढेकर, लीला दीक्षित, सुधाकर प्रभू, शंकर सारडा, दत्ता टोळ या संमेलनास हजर होते. दोन दिवसांचे संमेलन भव्य आयोजनामुळे कायम लक्षात राहिले. संमेलननिमित्ताने ‘दशपदी’ ही स्मरणिका प्रा. विश्वास वसेकर यांनी संपादित केली. ही स्मरणिका आजही संदर्भग्रंथ म्हणून अभ्यासला जाते. जोंधळे ज्या दैनिकाचे संपादक होते, त्या दैनिकानेही खास संमेलन विशेषांक प्रसिद्ध केला होता. मराठवाडय़ातील पहिल्या अ. भा. बालकुमार साहित्य संमेलनाच्या आठवणी आज अनेकांकडे आहेत. त्यानंतर 2006 साली परभणीच्या शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणावर 19 वे बालकुमार संमेलन पार पडले होते. अध्यक्षपदाचा सन्मान लीला दीक्षित यांना लाभला होता. या संमेलनासाठी सुधाकर प्रभू, शंकर सारडा, दत्ता टोळ, श्रीधर राजगुरू हजर होते. दोन दिवसांचे हेही संमेलन उत्स्फूर्त प्रतिसादाने संस्मरणीय ठरले.

नंतरच्या काळात श्री व सौ. भागवत, राजाभाऊ, प्रभू, दीक्षित, राजगुरू, सारडा ही दिग्गज मंडळी चिरंतनाच्या प्रवासास गेली. या संस्थेचे नावही अमरेंद्र-भास्कर बालकुमार साहित्य संस्था असे झाले. या संस्थेची दोन विभागीय संमेलने उदगीर व परभणी येथे अनुक्रमे 2018 व 2019 साली होऊन गेली. ज्याचे अध्यक्षपद स्वाती राजे आणि एकनाथ आव्हाड यांना लाभले. ही दोन्ही संमेलने लेखक आणि कार्यकर्त्यांना मोठी प्रेरणा देऊन गेली. अमरेंद्र-भास्कर संस्थेचे 30 वे अ. भा. बालकुमार संमेलन दि. 20/21 जानेवारी 2024 रोजी बारामती येथे होणार आहे.

महाबळेश्वरच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनापासून बालमेळाव्यास महत्त्वाचे स्थान मिळू लागले. अगदी अंमळनेरच्या नियोजित साहित्य संमेलनातही बालमेळावा होणार आहे, पण यंदा संमेलनाच्या पूर्वसंध्येला. मराठवाडय़ात आजपर्यंत सहा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने झाली. या सर्वच संमेलनांत बालमेळावा हा विक्रमी गर्दी खेचणारा ठरला. यात स्थानिक व राज्यातील लेखकांना प्राधान्य मिळाल्याने त्यांना व्यासपीठ लाभले.

साहित्य महामंडळाची घटक संस्था असणाऱया मराठवाडा साहित्य परिषदेने आजपर्यंत 42 संमेलने आयोजित केली. परिषदेची युवक आणि महिलांसाठी स्वतंत्र संमेलनही होत असतात. मसाप आपल्या संमेलनातून आधीपासून बालमेळाव्यास प्राधान्य देत होतीच. आता परिषदेचे दरवर्षी बालकुमार संमेलन होत राहील आणि यासाठी परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील, कार्यवाह डॉ. दादा गोरे, मसापचे स्थानिक अध्यक्ष व स्वागताध्यक्ष प्रा. संतोष तांबे यांनी पुढाकार घेतला. पहिल्या संमेलनाचा शुभारंभ नाथांच्या पैठण नगरीत होतो आहे. ही बाब भविष्यात लेखक आणि कार्यकर्ता या दोघांसाठी प्रेरणा देणारी ठरेल यात शंका नाही.