ठसा – मधुरा जसराज

>> प्रशांत गौतम

प्रख्यात लेखिका, दिग्दर्शिका मधुरा जसराज यांनी आपल्या कर्तबगारीने कार्यकर्तृत्वाची छाप संगीत, चित्रपट आणि नृत्य या क्षेत्रावर उमटवली होती. वयाच्या 86 व्या वर्षी मुंबईतील आपल्या निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. प्रख्यात दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या कन्या आणि प्रख्यात शास्त्राrय संगीतातील ज्येष्ठ गायक पं. जसराज यांची पत्नी अशी महत्त्वाची ओळख त्यांना लाभली होती. खरे तर अशी ओळख फार कमी लोकांना लाभते. ज्यांना लाभते त्यांचे व्यक्तिगत कर्तृत्व दुर्लक्षित राहते. मात्र काही जण दोन्ही दिग्गजांची ओळख कायम ठेवत आपली म्हणून वेगळी वाट निवडत असतात. मधुरा जसराज त्यापैकीच एक होत. उत्तम लेखिका असणे आणि दिग्दर्शनातील बाजू असणे, हे त्यांच्या बाबतीत पूरकच ठरले. मधुरा यांचा जन्म.6 ऑगस्ट 1937 साली झाला. चित्रपती व्ही. शांताराम यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या कलेचा प्रवास सुरू झाला. शांतारामबापूंनी आपल्या कन्येस बालपणीच विविध कलांची गोडी लावली. कथा लेखन, निबंध लेखन स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. हस्तलिखित, मासिकांतून मधुरा यांचा लेखन प्रवास सुरू झाला. पुढे मधुरा गायन क्षेत्राकडे वळल्या. गुरू विपीन सिंह यांच्याकडे मणिपुरी आणि कथ्थकचे प्रशिक्षण घेतले. ‘झनक झनक पायल बाजे’च्या निमित्ताने त्यांना नृत्यगुरू गोपीपृष्ण लाभले. त्यांचे नृत्यशिक्षण गोपीपृष्णांकडे झाले. संगीत क्षेत्रातील या प्रवेशातून त्यांचा 1954 साली पं. जसराज यांच्याशी परिचय झाला व त्याचे रूपांतर 1962 साली विवाह होण्यात झाले. एका बाजूला दिग्गज दिग्दर्शकाची कन्या आणि दुसऱ्या बाजूला पं.जसराज यांच्यासारखे अव्वल दर्जाचे गायक असा अनोखा योग मधुरा जसराज यांच्या बाबतीत जुळून आला. पुढील काळात मुलगा शारंगदेव आणि कन्या दुर्गा यांच्यावर कलेचे संस्कार त्यांनी केले. मधुरा या स्वतः दिग्दर्शिका, लेखिका, कोरिओग्राफर आणि प्रोडय़ुसर होत्या. त्यांनी अनेक वर्षे मराठी चित्रपटसृष्टीत काम केलं. भारतीय शास्त्राrय संगीताचे जतन आणि संवर्धन करण्यात मधुरा यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. 2009 साली मधुरा यांनी आपले पती, विख्यात गायक पंडित जसराज यांच्यावरील ‘संगीत मार्तंड पंडित जसराज’ या डॉक्युमेंटरीचे दिग्दर्शन केले. एक उत्तम लेखिका असणाऱ्या मधुरा जसराज यांनी त्यांचे वडील, भारतीय चित्रपट उद्योगाचे प्रणेते व्ही. शांताराम यांच्या चरित्राचे तसेच इतर अनेक कादंबऱ्यांचेही लेखन केले. वयाच्या 73 व्या वर्षी 2010 साली त्यांनी ‘आई तुझा आशीर्वाद’ हा मराठी चित्रपटही दिग्दर्शित केला. लिम्का बुक ऑफ रेका@र्डस्नुसार फिचर फिल्ममध्ये त्यांनी सर्वात ज्येष्ठ दिग्दर्शिका म्हणून पदार्पण करत इतिहास रचला. चारेक वर्षांपूर्वी पं. जसराज चिरंतनाच्या प्रवासाला निघून गेले. चारेक वर्षांनी मधुरा यांनी दि. 25 सप्टेंबर 2024 रोजी वयाच्या 86व्या वर्षी जगाचा निरोप घेतला.