सफरनामा – मुंबईची श्रीमंत बहीण अर्थात लंडन

>>निमिष पाटगावकर

लंडन हा जसा दोन दिवसांत बघण्याचा विषय नाही तसाच एका लेखात लिहायचाही विषय नाही. लंडनची विविधता ही लंडनच्या बदलत्या हवामानाप्रमाणेच अनेक छटा कायम दाखवत असते. फक्त तुम्हाला त्या टिपण्याची नजर असायला हवी. माझ्यासारख्या पक्क्या मुंबईकराला तर लंडनला गेल्यावर श्रीमंत, पण प्रेमळ मावशीच्या घरी गेल्यासारखे वाटते.

इंग्लंड म्हणजे क्रिकेटचा देश म्हणावा, तर एक दोन कपाळावर भस्माच्या पट्टय़ा ओढल्यासारखी क्रिकेटच्या खेळपट्टय़ा दाखवणारी मैदाने सोडली तर फुटबॉलचीच मैदाने जास्त दिसतात. लंडनचे जे दर्शन झाले ते विमानाच्या वेगामुळे काही क्षणच झाले, पण त्या काही क्षणांत मला लंडन आय, हाऊसेस ऑफ पार्लमेंट, बिग बेन आणि त्या सर्वांना जोडणारा वेस्ट मिनिस्टर ब्रिज या लंडनच्या दागिन्यांचे दर्शन झाले. ही साधारण पंचवीस वर्षांपूर्वी मी पहिल्यांदा लंडनला जाताना माझी जी लंडनबद्दल उत्सुकता होती ती इतक्या वेळा जाऊन आजही कायम आहे. लंडन, पॅरिस आणि न्यूयॉर्क ही शहरे पर्यटनाची, फॅशन आणि एकूणच ग्लॅमरची तीर्थक्षेत्रे असली तरी लंडन वेगळे आहे. पॅरिसला भाषेची अडचण आहे तर

न्यूयॉर्कच्या भव्यतेमुळे आपण स्वतला उगाच खुजे समजायला लागतो, पण लंडन शहर हे आपले वाटते. लंडनला टय़ूब स्टेशन्सची नावे लिहायची रंगसंगती, लालचुटुक डबलडेकर बसगाडय़ा बघितल्या की, मुंबईकराला मुंबईची जास्तच आठवण येते. लंडन काय किंवा मुंबई काय, ही कष्टकरी माणसांची शहरे. तेव्हा इथे स्थलदर्शन हे खरे तर माणसेच असतात. ज्या ट्रव्हल कंपन्या ‘लंडनची दोन दिवसांची टूर देताना आमच्यासारखे लंडन कुणीच दाखवत नाही’ अशी जाहिरात करतात त्यांची मजा वाटते. कारण लंडन हे शहर दोन दिवस काय, दोन वर्षे बघत बसलो तरी वेळ कमीच पडेल. मी जेव्हा पहिल्यांदा लंडनला गेलो तेव्हा कोहिनूर हिरा ठेवलेला

टॉवर ऑफ लंडन, मादाम तुसॉ मेणाचे म्युझियम, बिग बेन, ट्रफल्गर स्क्वेअर, हाऊसेस ऑफ पार्लमेंट, बकिंगहॅम पॅलेस, वेस्ट मिनिस्टर अॅबी, लंडन आय वगैरे पाहिले. तुम्ही पुन: पुन्हा लंडनला जाता तेव्हा तुम्हाला हे शहर जास्त कळायला लागते. युस्टन, व्हिक्टोरिया स्टेशनमधली गर्दी, टय़ूबच्या नकाशावरच्या रंगीबेरंगी लाइनच्या मार्गाची ओळख झाली की, तुम्ही सराईतपणे लंडनला फिरू शकता. लंडन हे मुख्यत पायी फिरण्याचे शहर आहे. दिवसाच्या प्रत्येक प्रहरी इथे वेगळा अनुभव येत असतो. कामाच्या किंवा क्रिकेट दौऱयाच्या मध्ये जेव्हा मोकळे दिवस मिळतात तेव्हा पायाचे तुकडे पडेपर्यंत लंडन फिरायचा आनंद मी अनेकदा घेतला आहे. इथे एक सोय सुंदर असते ती म्हणजे एकाच कार्डावर टय़ूब, बस आणि काही थेम्स नदीतल्या फेऱया तुम्ही करू शकता.

सकाळच्या वेळी निसर्गाच्या सान्निध्यात चालायला हाईड पार्कसारखी विस्तीर्ण उद्याने आहेत. संध्याकाळी लंडनचा झगमगाट आणि शॉपिंगचे वातावरण अनुभवायचे असेल तर ऑक्सफर्ड स्ट्रीटला पर्याय नाही. मला निसर्ग जसा खुणावतो तशीच विविधरंगी विविधढंगी माणसेही खुणावतात. तेव्हा संध्याकाळी ऑक्सफर्ड स्ट्रीटच्या एका टोकाहून चालायला सुरुवात करत थेट दुसरे टोक ओलांडून पिकॅडली सर्कसपर्यंतचा मार्ग मला फिरायला कायम खुणावतो. या मार्गावर जवळपास जगातील सर्वोत्तम ब्रॅण्डस्ची दुकाने आहेत. इथे एका टोकाला अवाढव्य सेल्जिससारखे खरेदीचे दुकान आहे. लंडन हे अतिमहाग शहर आहे असा एक उगाच गैरसमज आपल्याकडे आहे. आजकाल तर रास्त भावात एअर बी अँड बीचा उत्तम पर्याय असल्याने फिरायला जाणाऱयांचा राहायचा प्रश्नही सुटला आहे. मुंबईसारखेच अनेक जेवायचे पर्याय आहेत. तेव्हा लंडन जर नीट योजनाबद्ध रीतीने बघितले तर विशेष महाग वाटत नाही.

मुंबईसारखेच लंडननेही सगळ्यांना सामावून घेतले आहे, पण इथे पदोपदी असलेल्या इतिहासाच्या पाऊलखुणा त्यांनी कसोशीने जपल्या आहेत. यात इंग्लंडच्या इतिहासाच्या आहेतच, पण ज्यांनी ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला त्यांच्याही इतिहासाच्या खुणा इथे आहेत. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यलढय़ाच्या पाऊलखुणाही आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे, टिळकांचे, गांधीजींचे घर आज जरी नवीन मालक राहत असले तरी तिथे निळा फलक ठोकून या स्वातंत्र्यवीरांचा इतिहास जपला आहे. चॉक फार्म या स्टेशनजवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे घर काही वर्षांपूर्वी सरकारने विकत घेऊन त्याचे म्युझियम बनवले. भारतीय राज्यघटनेच्या शिल्पकाराच्या घरी जाताना एक वेगळीच कृतकृत्यतेची भावना जाणवते. मी तर एकदा मदनलाल धिंग्रा ज्या कॉलेजात शिकले आणि पुढे धिंग्रा आणि उधमसिंग यांना ज्या तुरुंगात फाशी दिले तिथेही भेट देऊन आलो. इंग्लंडने या पाऊलखुणा जपल्या आहेतच, लंडनजवळ राहणारे कै. वासुदेव गोडबोले यांनी त्या सर्व शोधून काढल्या म्हणून हे बघणे शक्य झाले.

[email protected]