>> नागेश शेवाळकर
प्रबोधनकार ठाकरे यांच्या लहानपणी घरातील परिस्थिती सामान्य असली तरी उत्तमोत्तम गुणांची सुसंस्कारयुक्त शिदोरी सर्वोत्तम होती. ‘बय’ या नावाने संबोधित होणाऱ्या आजीकडून समाजसेवेचे उत्तुंग संस्कार प्रबोधनकार यांच्यावर लहानपणीच झाले. प्रबोधनकार म्हणजे कुशाग्र बुद्धीचे धनी! प्रबोधनकार यांच्याजवळ नानाविध कला होत्या. प्रखर स्वाभिमान हा गुण त्यांचे आभूषण होते तसेच ती कवचकुंडलेही होती. समाज सुधारणा करण्यासाठी, स्वतःचे विचार समाजापुढे मांडता यावेत या हेतूने त्यांनी ‘प्रबोधन’ नावाचे पाक्षिक सुरू केले. सडेतोड विचार, अपार देशप्रेम, अन्यायाविरुद्ध पेटून उठण्यासाठी केलेले प्रामाणिक आवाहन यामुळे हे पाक्षिक प्रचंड लोकप्रिय ठरले. पाक्षिकाच्या माध्यमातून प्रबोधनकारांनी प्रस्थापित समाजरचनेवर आसूड ओढले. स्त्रियांना समाज व्यवहारात स्थान मिळावे यासाठी त्यांनी आवाज उठवला. जातपात, अंधश्रद्धा, धार्मिकता, पिळवणूक, उच्च-नीच अशा प्रथांच्या विरोधात प्रचंड लिखाण करून जन चळवळ उभारली. दादासाहेबांची समाज सुधारणा नुसती शाब्दिक नव्हती. केवळ उपदेश करून ते वाट पाहत नसत, तर परिसरातील एखाद्या मुलाने हुंडा घेतल्याचे समजताच गाढवाच्या गळ्यात ‘हुंडाविरोधी’ फलक बांधून त्याची चाळीतून मिरवणूक काढत. त्यामुळे त्या नवरदेवाची आणि त्याच्या कुटुंबाची मान शरमेने झुकत असे. प्रबोधनकारांची समाज सुधारणा, तळमळ, धडपड पाहून जनतेने त्यांना ‘प्रबोधनकार’ ही पदवी बहाल केली. प्रबोधनकारांच्या लेखणीस आक्रमकतेची धार होती. लिखाणासाठी लेखन हा त्यांचा प्रांत नव्हता. मिळमिळीत लेखन त्यांना आवडत नसे. अन्यायाविरुद्धची चीड हा त्यांच्या लेखणीचा आत्मा होता. जातपात त्यांना मान्य नव्हती. अनिष्ट रूढी, परंपरा, प्रवृत्ती यांच्या विरोधात त्यांचा लढा होता. त्यामुळे बहुजन चळवळीचे प्रणेते, नायक म्हणून सर्वदूर त्यांची ओळख झाली. प्रवाहाविरुद्ध लढणारे व्यक्तिमत्त्व अशी त्यांची ख्याती झाली. धारदार लेखणीच्या माध्यमातून विचारांचे लोळ त्यांनी उठविले. केलेला निश्चय तडीस नेणे हा त्यांचा गुण होता. त्यामुळे हाती घेतलेले कार्य पूर्णत्वास जाईपर्यंत त्यांना चैन पडायची नाही. गरिबी असली तरी त्यांनी अनेक छोटे-मोठे उद्योग सुरू केले. जिद्द आणि कष्टाने ते विकसित केले. त्यांचे वाचन अफाट होते. वेळ काढून त्यांनी वाचनाचा व्यासंग जोपासला होता. स्वतःच्या या सवयीला ते ‘बुकबाजीचे व्यसन’ असे म्हणायचे. मासिक, पाक्षिकाचे काम करताना त्यासाठी लागणाऱया सर्व जबाबदाऱया ते निष्ठेने पार पाडत. समाज सुधारक तर ते होतेच, परंतु त्याचबरोबर ते उत्कृष्ट वादविवादपटू होते. स्वतःचे प्रामाणिक, योग्य आणि मुद्देसूद विचार समोरच्या व्यक्तीस पटवून देण्यात त्यांचा हातखंडा होता. लेखन, वाचन आणि भाषेवर प्रभुत्व असल्यामुळे रंगलेल्या चर्चेच्या फडामध्ये ते अनेकांना निरुत्तर करीत असत. संपादक, पटकथाकार, छायाचित्रकार, शिक्षक, नट, टंकलेखक, उद्योजक अशा अनेकानेक भूमिका ते यशस्वीपणे पार पाडत असत. त्यामुळे दादांच्या भरपूर ओळखी होत्या, त्यांचा जनसंपर्क दांडगा होता. मोठमोठ्या व्यक्तींशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. अनेक सामाजिक संघटना उभारून त्यांनी चळवळी उभ्या केल्या.
परंतु प्रत्येक वेळी लढाऊ बाण्याने त्यांनी संकटांचा सामना केला. संकटे आली की प्रबोधनकार म्हणत, ‘‘मानवाने संकटांना घाबरू नये, त्यांचा सामना करून त्यावर विजय प्राप्त करावा. हाच खरा पुरुषार्थ आहे. संकटे माणसाची परीक्षा घेण्यासाठीच येतात.’’ अशा विचारसरणीमागे त्यांचा स्वतःवर, स्वतःच्या कामावर विश्वास होता. प्रचंड आत्मविश्वासाने ते कोणत्याही परिस्थितीला सामोरे जात. प्रतिकू ल परिस्थितीच माणसाला यश मिळवून देण्यासाठी अनुकूल ठरते यावर त्यांचा ठाम विश्वास होता. म्हणूनच प्रबोधनकार सर्वार्थाने एक यशस्वी लढवय्ये होते. आपण आपल्या व्यवहारामध्ये प्रामाणिक असू तर तुम्हाला कुणालाही भ्यायची गरज नाही हा विचार त्यांच्यासाठी जणू एक मंत्रच होता. चांगले काम करताना टीका सहन करणारा माणूस यशस्वी होतो अशा विचारसरणीने प्रेरित होऊन प्रबोधनकार यशस्वितेच्या वाटेवर मार्गक्रमण करीत राहिले. प्रतिकूल परिस्थितीमध्ये प्रबोधनकारांच्या लेखणीस वेगळीच धार चढली. त्यांच्या लेखणीतून ‘ध्रुवाचे अढळपद’, ‘काळाचा काळ’, ‘टाकलेलं पोर’ या नाटकांनंतर ‘खरा ब्राह्मण’ हे नाटक अवतरले आणि पुण्यातील ब्राह्मण वर्गाने असहकाराचे शस्त्र उचलले, परंतु त्यामुळे प्रबोधनकार ठाकरे डगमगले नाहीत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे प्रबोधनकारांचे सुपुत्र! संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी सर्वस्व पणाला लावणारे, प्रभावी वक्ते, लेखक, समाज सुधारक, चतुरस्र व्यक्तिमत्त्व, नाटककार इत्यादी विविध भूमिकांतून समाजसेवा करणारे प्रबोधनकार ठाकरे आजही त्यांच्या लढवय्या कार्यकर्तृत्वामुळे आपल्यातच आहेत.