कमालीचा फिटनेस

>> मानसी पिंगळे

मराठी अभिनेता, डॉक्टर, गायक, संगीतकार आणि गीतकार डॉ. उत्कर्ष शिंदे हा बहुप्रतिभावान कलावंत आहे. उत्कर्षचा कमालीचा फिटनेस चाहत्यांना नेहमीच आकर्षित करतो. तो खूप फुडी आहे, पण खाण्यापिण्याच्या बाबतीत काटेकोरपणे काळजी घेतो.

उत्कर्षने शूटिंगचा एक किस्सा सांगितला, ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान चित्रपटाचे दिग्दर्शक महेश मांजरेकर सर्वांना जे आवडेल ते सगळे खाऊपिऊ घालत. डोंगरात, खडकात शूटिंग करत असताना भयंकर ऊन होते आणि घोडा चालवणे, तलवारी, ढाल चालवायला लागत असे. एकदा शूटिंगदरम्यान उत्कर्षची तब्येत बिघडली, पण तरीही त्याने न थांबता त्याचे काम पूर्ण केले. त्यानंतर महेश मांजरेकर यांनी त्याचे भरभरून काwतुक केलेच, पण भरपूर खाऊपिऊ घालून औषधसुद्धा ते स्वतःच द्यायचे.

काजू, बदाम, अक्रोड अशा ड्रायप्रूटसोबत वेगवेगळी कडधान्ये मूग, मटकी, चवळी… त्याचबरोबर विविध भाज्या अन् फळांचा सलाड शरीरासाठी फार उपयुक्त आहे. उत्कर्ष म्हणतो, ‘‘दररोजच्या आहारात किमान एक तरी भाकरी असावी. भाकरीमुळे वजन वाढत नाही. त्याचसोबत त्यात फायबरसुद्धा असतात ज्याची शरीराला जास्तीत जास्त गरज असते.’’ त्यामुळे उत्कर्ष रोजच्या आहारात भाकरीला सर्वात जास्त प्राधान्य देतो. बाजरी, ज्वारी, नाचणीची भाकरी अन् पालेभाज्या शरीरासाठी उत्तम. जिमला जाऊ नये असे नाही, पण फिटनेससाठी प्रत्येक वेळेस महागडय़ा जिममध्ये जाणे गरजेचे नसते. त्याचबरोबर व्हिटॅमिन, प्रोटिन्सची औषधे खाऊन फिटनेस नव्हे तर बऱयाचदा त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. पुणे, नाशिकला जाणे झाले तर उत्कर्ष मोकळय़ा हवेत, वातावरणात डोंगरावर ट्रेकिंसाठी जातो. ज्यामुळे शरीराचा व्यायामसुद्धा होतो अन् निसर्गाच्या सान्निध्यात जगता येते. त्याचबरोबर लिंबू पाणी, सकाळी लवकर उठून चालायला जाणे, आहारात पालेभाज्यांचा समावेश अशा छोटय़ा छोटय़ा गोष्टी शरीराला योग्य असे व्हिटॅमिन आणि प्रोटिन्स पुरवतात.

उत्कर्षला चुलीवरचे जेवण फार आवडते. चिकन जरी खायचे झाले तरी तो घरगुती पद्धतीने बनवले जाणारे चिकन, मटण पसंत करतो. बाहेरचे चायनीज, चिकन चिली, वेगवेगळे सॉस व चटण्यांमध्ये बनवलेले चिकन, मटण शक्यतो टाळतो. मुंबईतील पाणीपुरी, कोल्हापूरमधील तांबडा-पांढरा रस्सा, दादरमधील बाबा फालुदा, नागपूरचे सावजी चिकन, नाशिकमधील मिसळ हे पदार्थ म्हणजे ऑल टाइम फेवरेट. उत्कर्ष म्हणतो, माझ्यासोबत संपूर्ण शिंदे कुटुंबच फार फुडी आहे.

उत्कर्ष खवय्या आहेच, पण त्याला नवनवीन पदार्थ बनवायला आवडतात. गावी जाणे झाले की, तेथे बार्बेक्यूचे नियोजन स्वतः उत्कर्ष करतो अन् सहकुटुंब त्यात सहभागी होत जेवणाचा आनंद लुटतात. आईच्या हातचे चमचमीत मासे, चिकन अन् वडिलांच्या हातची कांद्याची भाजी म्हणजे जणू सुख. पण आवडीचे पदार्थ खात असताना आरोग्याचीदेखील काळजी उत्कर्ष घेत असतो. उत्कर्षकडून प्रेरित होऊन त्याच्या घरीसुद्धा सर्वांनी फिटनेस काळजी घेत सकाळी चालायला जाणे, जिमला जाणे सुरू केले आहे. इतकेच नसून उत्कर्षच्या चाहत्यांनी काही ठिकाणी चक्क त्याच्या नावाने जिमसुद्धा सुरू केली आहे.
आवडेल ते सगळे खा. फक्त योग्य वेळेत, योग्य प्रमाणात आणि जास्तीत जास्त घरचे खा. जितक्या प्रमाणात खाल त्याहून दुप्पट व्यायाम झालाच पाहिजे, हे सांगायला तो विसरत नाही.