दखल – समृद्ध भावविश्वाच्या वाटा

>>मनिषा कुलकर्णी-आष्टीकर

कथा किंवा गोष्टी हा साहित्यप्रकार आबालवृद्धांना आवडणारा. ‘कष्टाच्या वाटा’ हा लेखक अय्युब पठाण यांचा नुकताच प्रकाशित झालेला कथासंग्रह. या संग्रहात एकूण 19 कथांचा समावेश केला असून सरदार जाधव यांनी या पुस्तकाचं मुखपृष्ठ साकारलं आहे.

अपघातात आई-वडील गमावणाऱया राजू व त्याच्या परिस्थितीला ओळखून त्याला जिव्हाळा लावणाऱया पाटील सरांची ‘गुरूची ममता’ ही कथा गुरू-शिष्यातील नात्याला अधोरेखित करते. लहानपणीच वडिलांचं छत्र हरवलेल्या, शाळेत वृक्ष लावून त्यास आपल्या वडिलांचं नाव देणाऱया अनिलची ‘अनोखं वृक्षारोपण’ ही कथा अनोखी असली तरी मन हेलावणारी आहे. आज जातीपाती अधिक टोकदार होत असताना आपली व आपल्या पत्नीची एक-एक किडनी शाळेतील गुणवंत विद्यार्थी करीम याला दान करणाऱया माने गुरुजी व बाई यांची ‘दान’ ही कथा नवा आदर्श घालून देते. कॉलनीच्या जमीन मालकाने मैदानाची मोकळी जागा स्वार्थासाठी बिल्डरला विकल्यानंतर त्याविरूद्ध लढून न्याय मिळवणाऱया विनय, अनिल, अब्दुल व सुनील या मुलांची ‘मैदान वाचवूया’ ही कथा डोळय़ांत अंजन घालणारी आहे. काटय़ात राहणाऱया गुलाबाची आणि वनदेवीची ‘गुलाब अन् काटे’ ही कथा लहानग्यांना नक्कीच आवडेल. ‘जत्रा’, ‘नागपंचमीचा सण’, ‘सुगी’, ‘नदीकाठ’, ‘वाचन’, ‘झुमरी’ इत्यादी कथांमधून संस्काराची पेरणी होते. परंतु या कथांत पात्र आणि संवादाची गुंफण अधिक प्रभावी ठरली असती. ‘उपकाराची फेड’, ‘सत्कर्माचे फळ’ या कथाही छान जमून आल्या आहेत. लेखक स्वत: शिक्षक असल्याने ते बालकांमध्ये रमतात. त्यांच्या भावविश्वाची जाणीव त्यांना आहे. मुलांची भाषा त्यांना अवगत आहे. बालकांत संस्कार रूजवण्यासोबतच त्यांच्यात मानवी मूल्यांची पेरणी या कथा करतात. बाल, कुमार, किशोर तसेच सर्वच वयोगटांतील वाचकांनी या कथा नक्की वाचाव्यात.भविष्यात लेखकाच्या हातून अशा संस्कारक्षम कथांची निर्मिती व्हावी.

कष्टाच्या वाटा (बाल-किशोर-कुमार कथा)
लेखक : अय्युब पठाण लोहगावकर
प्रकाशन : ताई पब्लिकेशन, छत्रपती संभाजीनगर
किंमत : 100 रु.