प्लेलिस्ट – गुजर जाये दिन

>> हर्षवर्धन दातार 

पूर्वेला असलेल्या बंगालने हिंदुस्थानी संगीताला अचाट, अफाट बुद्धिमत्ता लाभलेली अनेक दिग्गज संगीतरत्ने दिली. कवी, लेखक, संगीतकार, संगीत संयोजक अशा बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे अष्टपैलू सलील चौधरी यांचे नाव त्यात अग्रक्रमी होते. अनेक भाषांतून सलीलदांनी हिंदुस्थानी संगीत समृद्ध केलं.

प्राचीन काळापासून विविधतेने भरलेली आणि भारलेली अशी श्रेष्ठ परंपरा हिंदुस्थानी संगीताला लाभलेली आहे. पूर्वेला असलेल्या बंगालने हिंदुस्थानी संगीताला रायचंद बोराल, अनिल बिस्वास, हेमंत कुमार, बर्मन पिता-पुत्र, बप्पी लाहिरी अशी अचाट, अफाट बुद्धिमत्ता लाभलेली अनेक दिग्गज संगीतरत्ने दिली. कवी, लेखक, संगीतकार, संगीत संयोजक अशा बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे अष्टपैलू सलील चौधरी त्याच रांगेत अग्रक्रमी होते. येत्या 25 नोव्हेंबरपासून सलीलदांचं जन्मशताब्दी वर्ष प्रारंभ होईल.

1925 ते 1995 या आपल्या सत्तर वर्षांच्या ऐहिक जीवनात ते सुरुवातीपासून संगीताशी जोडले गेले होते. शास्त्राrय, सुगम आणि लोकसंगीत तसेच पाश्चात्त्य सिम्फनी संगीताचा अभ्यास केलेल्या सलीलदांच्या संगीतात या शैलींचे मिश्रण आढळते. बासरी त्यांचे प्रिय वाद्य आणि त्यामुळे त्यांच्या संगीत रचनेत बासरीच्या सुरावटी ऐकू येतात. सुरुवातीच्या काळातच डाव्या आणि साम्यवादी विचारसरणीने प्रभावित सलीलदा IPTAशी संलग्न झाले. तिथेच त्यांचा संगीतकार आणि संयोजक म्हणून प्रवास सुरू झाला. प्रसिद्ध संगीतकार हेमंत कुमार यांच्या पुढाकाराने सलीलदांना संगीतकार या नात्याने पहिला चित्रपट ‘पोरीबोरतोन’ मिळाला. पण त्यांना खरी प्रसिद्धी मिळाली 1953 च्या बिमल रॉय दिग्दर्शित ‘दो बिघा जमीन’ चित्रपटाने. साम्यवादी पार्श्वभूमी असलेला हा चित्रपट त्या काळात समांतर सिनेमा या श्रेणीतील एक मैलाचा दगड ठरला. सलीलदांनी कोरस या आपल्या बलस्थानाचा उपयोग ‘धरती कहे पुकार के’ आणि ‘हरियाला सावन ढोल बजाता आया’ या समूह गीतात अत्यंत प्रभावीरीत्या केला. पुढील काळात शंकर-जयकिशन, सचिन देव बर्मन, नौशाद अशा दिग्गजांच्या स्पर्धेत सलीलदांनी वेळोवेळी आपलं वेगळेपण सिद्ध केलं. त्यांच्या संगीतात माधुर्य तर होतंच, त्याचबरोबर आपल्या मातीशी, संस्कृतीशी, साध्या माणसांशी जवळीक होती. सुरावटींच्या नेहमीच्या परंपरेला भेद देणाऱया संगीत रचनेच्या प्रक्रियेमुळे जाणकार संगीत अभ्यासकांनी सलीलदांना ‘सृजनशील बंडखोर’ हे बिरूद प्रदान केलं.

अर्थपूर्ण गीत, त्याला समर्पक अशी चाल देणारं संगीत आणि भावनाप्रधान गायकी हे गाण्याचे तीन प्रवाह एकत्र येतात तो सांगितिक त्रिवेणी संगम. हिंदुस्थानी चित्रपटात असे निवडक त्रिवेणी संगम आहेत. त्यातील एक म्हणजे कविराज शैलेंद्र, सृजनशील सलीलदा आणि स्वर्गीय गायिका लतादीदी. ‘मधुमती’मध्ये (1958) गूढरम्य कथानकाला अधिक गहिरं करण्यासाठी त्याच प्रकारचं संगीत आणि गाणी सलीलदांनी केली. ‘आजा रे परदेसी’ किंवा लोक संगीतप्रधान ‘जुलमी संग आंख लडी’ आणि ‘बिछुआ’ आणि अशाच प्रकारची 11 वैविध्यपूर्ण गाणी, शिवाय झुमर ठेक्यावर आधारित ‘मिला है किसी का झुमका’ आणि या सगळ्यावर कळस म्हणजे ‘जागते रहो’ (1956) यातलं लोभस नर्गीसवर चित्रित ‘जागो मोहन प्यारे’ ही या त्रिवेणी संगमाचे काही ठळक उदाहरणे.

‘मुसाफिर’मध्ये (1957) सलीलदांनी दीदींबरोबर चक्क दिलीप कुमारला गायला लावलं. ‘लागे नाही छुटे रामा’मध्ये दिलीपसाब अगदी सुरात गायले आहेत, तर ‘हनीमून’ (1960) यातील मुकेशनी गायलेल्या ‘मेरे ख्वाबो मे खयालो मे’ यात तर लताजींना चक्क कोरसमध्ये गाऊन घेतलं. ‘माया’मध्ये (1961) द्विजेन मुखर्जी यांच्या ‘ए दिल कहाँ तेरी मंझिल’मध्ये लताजींचा फक्त लाजवाब आलाप आहे. याच चित्रपटातील ‘तसवीर तेरी दिल मे’ हे सुरांचा उतार-चढाव असलेलं एक रोलर कोस्टर गाणं. तलत मेहमूदच्या तलम मखमली आवाजाचा उपयोग त्यांनी ‘प्रेमपत्र’मध्ये (1962) ‘ये मेरे अंधेरे उजाले’, ‘छाया’ (1961) यात ‘इतना न मुझसे तू प्यार बढा’ (हे गाणं मोझार्टच्या सिम्फनीवर आधारित), ‘एक गाव की कहानी’ (1957) मधील ‘रात ने क्या क्या ख्वाब दिखाये’ या गाण्यांत केला.

किशोर कुमारची हरहुन्नरी अवखळ गायकी सलीलदांनी ‘हाफ टिकीट’ (1962) यातील ‘आके सीधी लगे दिल पें’ या धमाल गाण्यात वापरून श्रोत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. लताजी परदेशी असल्यामुळे इथे किशोरने पुरुष आणि स्त्राr असे दोन्ही आवाज बेमालूमपणे मिक्स केलेत. याच किशोर कुमारने ‘मेरे अपने’ (1971) यात ‘कोई होता जिसको अपना’ हे धीरगंभीर आणि ‘अन्नदाता’ (1972) या अवघड ‘गुजर जाये दिन’ ही दोन्ही गाणी तितक्याच ताकदीने गायली आणि ती तशी गाऊन घेण्याचे श्रेय अर्थात सलीलदांचे. ‘चाँद और सूरज’ (1965) यातील ‘बाग़ में कली खिली’ हे आशाबाईंच्या आवाजातलं आणि तनुजावर चित्रित गाणं. हीच चाल एक गूढरम्य गाणं म्हणून सलीलदांनी ‘पूनम की रात’मध्ये (1965) ‘तुझ बिन जिया उदास रे’ सादर करतात, तर ‘आजा रे परदेसी’मध्ये आपल्याला ‘घडी घडी मोरा दिल धडके’चा कनेक्ट मिळतो.

पाश्चात्त्य संगीताचा प्रभाव सलीलदांच्या काही चालीत प्रकर्षाने जाणवतो. ‘धरती कहे पुकार के’ हे रशियन मार्चिंग गाण्यावरून प्रेरित तर ‘धितांग धितांग बोले’ काहीसं पोर्तुगीज वळणाचं. ‘अपराधी कौन’ यातील ‘फिर वही रात है’ हे रॉक अँड रोल नृत्य आधारित गीत. ‘मेरे मन के दिये’ (चर्च कॉयर) आणि देशप्रेमाचे उत्कट सादरीकरण ‘ए मेरे प्यारे वतन’ (अफगाणी अरेबिक) ही काही प्रातिनिधिक उदाहरणं.

सुरुवातीच्या काळात जशी शैलेंद्र-सलीलदा ही जोडी जमली तशीच पुढे सिद्धहस्त गीतकार योगेश गौड यांच्याबरोबर सलीलदांचे सूर जुळले. या दोघांनी एकापेक्षा एक सरस आणि भावपूर्ण गाणी दिली. ‘अन्नदाता’ (1972) यातील सुरांचे उतार-चढाव असलेल ‘निसदिन निसदिन मेरा’, ‘रजनीगंधा’ (1992) यातील हळुवार शीर्षक गीत आणि भरपूर वाद्यमेळ असलेलं मुकेशचं ‘कई बार युंही देखा है’, ‘छोटी सी बात’ (1972)…‘न जाने क्यूं’ आणि हृषिदांच्या ‘आनंद’ (1971) या अमर कलाकृतीतील ‘जिंदगी कैसी है पहेली’ व ‘कहीं दूर जब दिन ढल जाये’ ही अविस्मरणीय गाणी. सलीलदांनी अनेक गाणी बंगालीमध्ये केली आणि त्याच चाली हिंदीमध्येही वापरल्या. www.salilda.com या संकेतस्थळावर सलीलदांबद्दल संपूर्ण माहिती, त्यांच्या सर्व भाषांतील चित्रपट तसेच इतर गाण्यांची विस्तृत आणि विपुल नोंद आहे. अनेक भाषांतून सलीलदांनी हिंदुस्थानी संगीत समृद्ध केलं. सध्याची नवोदित आणि होतकरू पिढी त्यातून प्रेरणा घेऊन बरंच काही करू शकते.
z [email protected]
(लेखक संगीत अभ्यासक आहेत.)