>> डॉ. मुकुंद कुळे
इतिहास म्हणजे उपलब्ध पुराव्यांनुसार भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची सुसंगतपणे केलेली मांडणी. ही मांडणी करताना जिथे पुरावे सापडत नाहीत, तिथे इतिहासकार आपल्या इतिहासविषयक ज्ञानाच्या आधारे काही कल्पनाबंध तयार करतो आणि इतिहासाच्या गाळलेल्या जागा भरण्याचा प्रयत्न करतो. जो खरा इतिहासकार असतो. त्याचा प्रयत्न फक्त भूतकाळात काय घडलं हेच सांगण्याचा असतो. जे घडलं त्याचा आधार घेऊन समाजात दुही माजवण्याचा नसतो. ही दुही माजवण्याचं काम कोणत्याही काळात त्या-त्या धर्माचे ठेकेदारच करत असतात, मग तो कोणताही धर्म असो.
काही वर्षांपूर्वीची गोष्ट. जेजुरीहून नगरला जात होतो. वाटेत अष्टविनायकांतील एक असलेलं मोरगावच्या गणपतीचं देवस्थान लागलं. दगडी आणि रेखीव बांधकाम असलेल्या या मोरगावच्या मंदिराविषयी खूप ऐकलं होतं. साहजिकच मुद्दाम थांबून मंदिरात गेलो. मंदिराचा परिसर खरोखरच प्रशस्त आणि सुंदर होता. एखादी भव्य गढी असावी असंच मंदिराचं बांधकाम होतं. मध्यभागी मुख्य मंदिर आणि बाजूला गढीच्या भिंतीलगत ओवऱया अशी रचना. मी मंदिरात गेलो आणि मयुरेश्वराचं दर्शन घेऊन बाहेर आलो. माझं मन कायमच प्रत्यक्ष मंदिरापेक्षा मंदिराच्या आवारात अधिक रमतं. कारण देव प्रत्यक्ष गाभाऱयात असला तरी त्याचे समाजात रुजलेले सामाजिक-सांस्कृतिक अवशेष खऱया अर्थाने मंदिराच्या आवारातच पाहायला मिळतात.
मंदिराच्या आवारात असलेल्या विविध छोटय़ा-मोठय़ा देवदेवतांच्या घुमटी पाहणं हा माझ्या अधिकच कुतूहलाचा विषय असतो. मोरगावच्या गणपतीचं दर्शन घेतल्यावरही मी तेच केलं. मंदिराच्या आवारात प्रदक्षिणा घातल्यासारखा फिरू लागलो. कुठल्या कोनाडय़ात कुठल्या देवाची मूर्ती आहे किंवा कुठे कुणाचा तांदळा आहे ते पाहत होतो. फिरता फिरता मी जमिनीवर उभ्या केलेल्या एक शिळेसमोर आलो. ती शिळा चारेक फुटांची असावी. दगडी पाटा असतो तशीच सपाट. त्या शिळेच्या वरच्या अंगाला मध्यभागी एक मुखवटेवजा शिल्प (उत्थित शिल्प) कोरलेलं होतं. शेंदूर थापल्यामुळे तो कोणत्या देवाचा मुखवटा आहे ते कळत नव्हतं. मी कुतूहलाने त्याकडे पाहत उभा होतो. येणारे-जाणारे मुद्दाम थांबून नमस्कार करत होते. त्यातल्याच एक-दोघांना विचारलं, पण कोणालाही तो मुखवटा कुणाचा आहे ते सांगता आलं नाही. शेवटी तिथून पुढे जाणार एवढय़ात मंदिराचे पुजारी येताना दिसले. (जे या मंदिराचे संस्थापक असलेल्या प्रसिद्ध गणेशभक्त मोरया गोसावी यांचे वंशज होते.) मग त्यांनाच थांबवलं आणि विचारलं, ‘हा मुखवटा कोणत्या देवाचा आहे?’ त्यावर ते हसले आणि अतिशय शांत स्वरात म्हणाले- ‘हा कोणत्याही देवाचा मुखवटा नाही, तर हा विजापूरच्या आदिलशहाचा मुखवटा आहे.’ त्यांनी हे सांगितलं मात्र… माझा माझ्याच कानांवर विश्वास बसला नाही. मी डोळे विस्फारून त्यांना ‘क्काय’ असं विचारलं. तेव्हाही त्यांनी पहिल्यासारखंच अतिशय शांतपणे उत्तर दिलं… होय, हा विजापूरच्या आदिलशहाचा मुखवटा आहे! आणि मग माझ्या डोळय़ांतील कुतूहल पाहून ते म्हणाले, ‘या मोरगावच्या गणपतीची दिवाबत्ती आणि पूजाअर्चेच्या खर्चाची सोय विजापूरच्या आदिलशहाने केलेली आहे. आदिलशहाने तेव्हा दिलेल्या सनदा आजही आमच्याकडे आहेत. मंदिरासाठी त्याने दिलेल्या या दानाबद्दल कृतज्ञता म्हणून आमच्या पूर्वजांनी त्याचा मुखवटा असलेली शिळा मंदिराच्या आवारात उभारली आहे…’
हा बहुधा इब्राहिम आदिलशहा दुसरा असावा. परंतु तो दुसरा असो वा पहिला, तो एक मुस्लिम राजा होता आणि त्याने मोरगावच्या गणपती देवस्थानाला खर्चासाठी सनदा द्याव्यात हीच माझ्यासाठी गमतीची आणि महत्त्वाची बाब होती. कारण मुस्लिम म्हणजे आक्रमक, मुस्लिम म्हणजे मूर्तिभंजक, मुस्लिम म्हणजे हिंदूंचे कट्टर शत्रू हेच शिकवलं गेलेलं. अगदी आजही तेच सातत्याने सांगितलं जात आहे. जे शिकवलं गेलं, सातत्याने सांगितलं गेलं ते सगळंच खोटं होतं वा खोटं असेल असं नाही. किंबहुना मुस्लिम आक्रमकांनी मंदिरं उद्ध्वस्त करून त्या जागी मशिदी उभारल्याची उदाहरणं आपण पाहतोच आहोत… पण संधी मिळाली तर रोजच कुठल्या ना कुठल्या मशिदीच्या-दर्ग्याच्या पायाशी असलेलं शिवलिंग उघड केलं जाईल. नाही तरी ‘अयोध्या तो बस झांकी है, काशी-मथुरा बाकी है’ असं म्हणत असतानाच, आता काही दिवसांपूर्वी अजमेरच्या सुप्रसिद्ध सुफी संत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती दर्ग्याबाबतही सर्वेक्षणाची मागणी करण्यात आली आहेच की… काय तर म्हणे या दर्ग्याच्या मुळाशीही शिवमंदिर आहे! पण प्रश्न असा आहे की, केवळ तोच इतिहास आहे? केवळ तेच सत्य आहे? तर याचं उत्तर ‘नाही’ असंच द्यावं लागेल. ऊर बडवून सातत्याने सांगितल्या जाणाऱया या एकांगी इतिहासाच्या पल्याडही वेगळा ‘इतिहास’ दडलेला आहे. वेगळं सत्य दडलेलं आहे. फक्त ते शोधण्यासाठी प्रत्येकानेच आपापल्या धर्माचे चष्मे आधी काढून ठेवले पाहिजेत. निखळ दृष्टीने इतिहासाला सामोरं गेलं पाहिजे.
इतिहास म्हणजे उपलब्ध पुराव्यांनुसार भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची सुसंगतपणे केलेली मांडणी. ही मांडणी करताना जिथे पुरावे सापडत नाहीत, तिथे इतिहासकार आपल्या इतिहासविषयक ज्ञानाच्या आधारे काही कल्पनाबंध तयार करतो आणि इतिहासाच्या गाळलेल्या जागा भरण्याचा प्रयत्न करतो. जो खरा इतिहासकार असतो, त्याचा प्रयत्न फक्त भूतकाळात काय घडलं हेच सांगण्याचा असतो, जे घडलं त्याचा आधार घेऊन समाजात दुही माजवण्याचा नसतो. ही दुही माजवण्याचं काम कोणत्याही काळात त्या-त्या धर्माचे ठेकेदारच करत असतात, मग तो कोणताही धर्म असो. एवढंच कशाला, आज भारतात केवळ हिंदू आणि मुस्लिम या दोनच धर्मांना एकमेकांसमोर शत्रू म्हणून उभं केलं जातं; परंतु भारताचा इतिहास पाहिला तर, वैदिक (जे आज स्वतला हिंदू म्हणवतात) विरुद्ध बौद्ध विरुद्ध जैन अशा लढाया सातत्याने होत आल्या आहेत. भारताच्या प्राचीन इतिहासातील वेगवेगळय़ा कालखंडात वेगवेगळय़ा वंशाचे राजे वेगवेगळय़ा धर्माचं पालन करीत आले आहेत आणि प्रसंगी एकमेकांशी घनघोर युद्ध करीत आले आहेत. एवढंच नाही तर, जेत्यांनी कायमच आपली संस्कृती जितांवर लादण्याचा प्रयत्न केला आहे. कारण ही संस्कृतीच जिवट आणि चिवट असते. ती जोपर्यंत मोडत नाही, तोपर्यंत ताब्यात आलेल्या नव्या प्रदेशावर राज्य करणं सोपं नसतं. केवळ मुस्लिम आक्रमकांनीच हे केलं असं नाही, तर ब्रिटिशांनीही तेच केलं. ब्रिटिशांनी भारतीयांना इंग्रजी शिकवायला सुरुवात करून आणि त्याआधारे व्हिक्टोरियन नीतिमत्तेचे (मोरालिटी) धडे देऊन भारतातील कला-संस्कृती नासवलीच की! … आणि ती नासवण्यात इंग्रजी शिक्षण घेऊन बाहेर पडलेला तत्कालीन उच्च वर्गच आघाडीवर होता. ब्रिटिशांना पक्कं ठाऊक होतं, जोपर्यंत आपण भारतीयांचा कला-संस्कृतीचा अभिमान मोडून काढत नाही, तोपर्यंत त्यांच्यावर राज्य करता येणं कठीण आहे. अगदी वैदिक संस्कृतीचे पाईक म्हणवणाऱया राजांनीदेखील हेच केलं. भारतातून बौद्ध धर्माची पिछेहाट होण्यामागचं तेच तर कारण होतं आणि आहे. फक्त वैदिक म्हणजेच हिंदू काय? बौद्ध काय किंवा जैन काय हे धर्म भारतातच जन्माला आलेले असल्यामुळे त्या वेळच्या आक्रमणांत-युद्धांत झालेल्या नृशंस हत्यांची-अत्याचारांची चर्चा होत नाही. अन्यथा परकीय आक्रमकांनी मंदिरं उद्ध्वस्त करण्याआधी बौद्ध मठ-गुंफा कुणी उद्ध्वस्त केल्या, बौद्ध भिक्खुंची कुणी हत्या केली याचाही एकदा शोध घेणं गरजेचं आहे. पण काही झालं तरी ते स्वकीय असतात. स्वकीयांनी आपल्या भूमीत केलेले अत्याचार चालतात, नव्हे ते सोयिस्करपणे विसरले जातात आणि परकीयांनी केलेले अत्याचार किंवा त्यांनी आपली संस्कृती लादण्याचा केलेला प्रयत्न पुन्हा पुन्हा देशासमोर मांडला जातो. कारण यात सोयीचं राजकारण असतं.
पण इथे एक लक्षात घ्यायला हवं, की मुस्लिम आक्रमक होते तरी ते इथेच राहिले. इथल्याच मातीत मिसळले आणि भारतीय स्वातंत्र्यासाठी तेही हिंदूंच्या बरोबरीने लढले. काही कडव्या धर्मनिष्ठांनी प्राचीन मंदिरं-वास्तू पाडल्या असतील. तरी त्याचं भूत वर्तमानाच्या मानगुटीवर बसवणं योग्य नाही… आणि भारतीय मुस्लिमांचा इतिहास काय केवळ विध्वंसाचाच आहे? भारताच्या मध्ययुगीन सामाजिक-सांस्कृतिक इतिहासाकडे डोळसपणे नजर टाकली तर मुस्लिम प्रशासकांनी कितीतरी समाजोपयोगी कामं केलेली दिसतील. आपली प्रजा केवळ मुस्लिम नाही, तर मोठय़ा प्रमाणावर हिंदू आहे हे उमगून केवळ सामाजिक नाही, तर धार्मिक-सांस्कृतिक अंगानेदेखील मुस्लिम शासकांनी बहुमोल कामगिरी बजावलेली आहे. फक्त ती लोकांसमोर आणण्याचं काम आजवर कुणी केलेलं नाही. मोरगावचं देवस्थान हे तर एक उदाहरण झालं, महाराष्ट्रातील कित्येक देवस्थानांना मुस्लिम शासकांनी मदत केलेली आहे. अगदी पंढरपूरच्या रुक्मिणी मंदिराच्या खर्चासाठीही आदिलशहानेच उत्पातांच्या नावे सनदपत्रं लिहून दिलेली आहेत.
… तेव्हा, जर संवाद साधता येत नसेल, तर तो विसंवादाचा इतिहास हवा कशाला?