लेख – युवकांचे प्रेरणास्रोत

>> दिलीप देशपांडे

स्वामी विवेकानंदांना युवा शक्तीवर खूप मोठा विश्वास होता आणि तो त्यांनी आपल्या अनेक भाषणांतून व्यक्तही केला होता. युवकांमध्ये सकारात्मक ऊर्जा जागृत करून तिचा उपयोग केला, तर युवक निश्चितच त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतात हा विश्वास त्यांना होता. त्यांचा हा विश्वास सार्थ ठरावा, भारत हा एक सामर्थ्यशाली देश बनावा म्हणून 12 जानेवारी (स्वामी विवेकानंद यांची जयंती) हा दिवस राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने…

आपला भारत देश युवकांचा देश म्हणून ओळखला जातो. भारतात युवकांची संख्या बघितली तर ती जवळपास 65 टक्क्यांपर्यंत आहे आणि म्हणूनच युवा पिढीच्या क्षमता आणि ताकदीवर आपला देश जागतिक महासत्ता भरण्याचे स्वप्न पाहत आहे. देशाच्या विकासात युवकांचा मोठा सहभाग अपेक्षित आहे. मग तो देश कार्यात असेल, सामाजिक सुधारणांत असेल, शेतीच्या प्रगतीत असेल, शैक्षणिक विषयात असेल, औद्योगिक क्षेत्रात असेल, पण तो आवश्यक आहे, आणि त्यादृष्टीने खूप मोठे प्रयत्न आवश्यक आहेत. नुसताच युवकांचा मोठा देश म्हणून बिरुदावली मिरवून चालणार नाही, तर त्या युवा शक्तीला सर्व क्षेत्रांत चांगले, विधायक वळण देणे तितकेच आवश्यक आहे. देशाच्या सीमेवर लढणारा हा युवकच आहे.

एकीकडे नवीन तंत्रज्ञान आले आहे. जग जवळ आलंय, पण माणूस हरवलेला आहे. युवक इंटरनेट, मोबाईल, व्हॉट्सऍप, फेसबुक, इन्स्टाग्राम, सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेला आहे. हवा तेवढा उपयोग न करता नको तेवढा दुरुपयोग केला जातो. म्हणूनच या युवा शक्तीला विधायक वळण लावणे किंवा देणे आवश्यक आहे. स्वामी विवेकानंद यांच्या विचारांतून युवा पिढीला चांगला विचार मिळू शकतो आणि त्यादृष्टीनेच युवा पिढीनेही विवेकानंदांच्या विचारांचा अंगीकार करायला हवा आहे.

कृषी क्षेत्रातही आपण बघतो, अगदी तरुण तरुण मुले शेतीच्या व्यवसायात तोटा येतो म्हणून आत्महत्या करतात. अर्थातच त्यांची वैचारिक क्षमता संपल्यामुळेच हे सगळे होत आहेत. विचारांची क्षीणता घालवणे हा त्यावर मोठा उपाय आहे आणि ती सकारात्मक विचारांतूनच घालवता येईल. त्यादृष्टीने विवेकानंदांचे विचार प्रेरणादायी आहेत.

– सर्वोच्च आदर्श निवडा आणि त्याप्रमाणे आयुष्य जगा. लाटांकडे नाही, तर महासागराकडे पहा.
– दिवसातून एकदा तरी स्वतःशी बोला, नाहीतर तुम्ही जगातील सर्वोत्तम व्यक्तीला भेटायला मुकाल. ह काम, काम आणि काम हे तुमच्या जीवनाचे ध्येय असले पाहिजे.
– माझ्या भविष्यातील अशा तरुणांच्या चारित्र्यावर, बुद्धिमत्तेवर, त्यागावर आणि इतरांची सेवा करण्यासाठी सर्वांच्या आज्ञाधारकतेवर अवलंबून आहेत, जे स्वतःचे आणि देशासाठी चांगले करतात.
– आपल्या देशाला नायकांची गरज आहे. नायक बना. काम करणे तुमचे कर्तव्य आहे आणि मग सर्वजण तुमचे अनुकरण करतील.
– उठा, जागे व्हा आणि थांबू नका, जोपर्यंत तुमचे ध्येय साध्य होणार नाही.
– स्वतःला कमकुवत समजणे हे सर्वात मोठे पाप आहे.
– अनुभव हा आपला सर्वोत्तम शिक्षक आहे. जोपर्यंत जीवन आहे, तोपर्यंत शिकत रहा. n महान कार्यासाठी महान त्याग करावा लागतो.
– एकावेळी एक गोष्ट करा आणि असे करताना आपला संपूर्ण आत्मा त्यात घाला आणि बाकी सर्व विसरा.
– सत्यासाठी काही सोडून द्यावं, पण कोणासाठीही सत्य सोडू नये. n शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते तोच खरा कर्तृत्ववान होय.
– स्वतःचा हेतू प्रबळ ठेवा. लोकांना जे बोलायचं असेल ते बोलू द्या. एक दिवस हेच लोक तुमचं गुणगान करतील.
– आत्मविश्वास वाढवायचा असेल तर स्वतःविषयीच्या सकारात्मक बाबींचे चिंतन सतत केले पाहिजे.
– घर्षण केल्याशिवाय रत्न उजळत नाही, त्याचप्रमाणे सातत्याने प्रयत्न केल्याशिवाय व्यक्ती कुशल होत नाही.
– स्वतःला घडवण्यात आपला वेळ खर्च करा. म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही.
– कोणाची निंदा करू नका. जर तुम्ही कोणाच्या मदतीसाठी हात पुढे करू शकत असाल तर नक्की करा आणि जर शक्य नसेल तर हात जोडा आणि त्यांना आशीर्वाद द्या! त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या.
– असं कधीच म्हणू नका की, मी करू शकत नाही. कारण तुम्ही अनंत आहात. तुम्ही कोणतीही गोष्ट करू शकता.
– जे लोक नशिबावर विश्वास ठेवतात, ते भित्रे असतात. जे स्वतःचे भविष्य स्वतः घडवतात तेच खरे कणखर असतात.
– मनुष्यसेवा ही देवाची सेवा आहे.

स्वामी विवेकानंदांचे विचार, तत्त्वज्ञान आणि शिकवण ही भारतातील महान सांस्कृतिक आणि पारंपरिक संपत्ती आहे. या विचारांसोबतच एक संकल्पना असते. जसे – युवा शक्तीची जाणीव, युथ फॉर अ ड्रग फ्री वर्ल्ड, राष्ट्र उभारणीत युवा शक्तीचा वापर, युवक-नवीन भारताचा उत्साह आणि त्यानुसार युवकांसाठी काही कार्य केले जाते. अर्थातच त्यात युवकांचा सहभाग अपेक्षित असतो. तरुणांना स्फूर्ती आणि प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक वर्षी राष्ट्रीय युवा दिन साजरा करणे सुरू केले आहे. कार्यक्रम शाळा आणि महाविद्यालयांतून मोठय़ा प्रमाणात होणे आवश्यक आहे व हे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे.

[email protected]