गुलदस्ता – एकलव्याचे द्रोणाचार्य

>> अनिल हर्डीकर

वळणावळणावर माणसं भेटतच राहतात. पहिल्यांदा… दुसऱयांदा… पुन: पुन्हा. ओळख होते अन् नातेबंध निर्माण होतो. कधी मैत्रीचा, कधी प्रेमाचा, कधी त्याही पलीकडचा… युगायुगांचा! या प्रदीर्घ नात्यात महत्त्वाची असते ती घटना म्हणजे त्या दोघांची पहिली भेट! अशाच काही लक्षात राहाव्यात अशा भेटींचा हा गुलदस्ता!

लहानपणापासून म्हातारपणापर्यंत आपल्याला आयुष्यात कितीतरी माणसं भेटतात… अगणित! काहींची नावंदेखील माहीत नसतात. कुणी लहान वयात भेटतं, सोबत खेळतं, भांडतं. कुणी शाळकरी वयात भेटतं. मग कॉलेज, नोकरी, संसाराचा गाडा… या सगळ्या प्रवासात अखेरपर्यंत माणसं भेटतच राहतात.

आयुष्याचे सांधे, फाटे, वळणं बदलतात. उत्कर्ष होतो, प्रगती होते, कधी उलटही होतं. त्याला कारणीभूत असतात, ठरतात काही माणसांच्या भेटी! वळणावळणावर माणसं भेटतच राहतात. कुणाशी जमतं, कुणाशी नाही जमत. कुणी का आवडावं ते कळत नाही, तर कुणी का नावडावं ते कळत नाही. काही माणसं भेटतात. पहिल्यांदा… दुसऱयांदा… पुन: पुन्हा. ओळख होते, नातेबंध निर्माण होतो. कधी मैत्रीचा, कधी प्रेमाचा, कधी त्याही पलीकडचा… युगायुगांचा! या प्रदीर्घ नात्यात फार महत्त्वाची असते ती घटना म्हणजे त्या दोघांची पहिली भेट! कधी कधी असंही होतं. कुणीतरी एकदाच भेटतो, पण ती भेट विसरायची म्हटलं तरी विसरता येत नाही. अशाच काही भेटींचा हा गुलदस्ता!

सध्या आचार्य अत्रे यांचे शतकोत्तर रजत जयंती वर्ष सुरू आहे.आचार्य प्रल्हाद केशव अत्रे माहीत नाही असा माणूस मागच्या पिढीत मिळणार नाही. संपादक, कवी, नाटककार, विडंबनकार, राजकारणी, चित्रपट निर्माता, शिक्षक, व्याख्याता अशा अनेक भूमिका त्यांनी यशस्वीपणे निभावल्या. ‘ब्रह्मचारी’, ‘ब्रँडीची बाटली’, ‘श्यामची आई’, ‘वसंतसेना’, ‘महात्मा फुले’ असे यशस्वी चित्रपट त्यांनी काढले. ‘मराठा’ हे दैनिक आपल्या लेखनाच्या जोरावर लोकप्रियतेच्या शिखरावर ठेवलं. ‘नवयुग’ साप्ताहिक चालवलं. अनेक नाटकं लिहिली. ‘साष्टांग नमस्कार’, ‘प्रीतिसंगम’, ‘लग्नाची बेडी’, ‘उद्याचा संसार’, ‘तो मी नव्हेच’, ‘मोरूची मावशी’, ‘कवडीचुंबक’, ‘बुवा तेथे बाया’ अशी नाटकं त्यांनी लिहिली. ‘झेंडूची फुले’ या विडंबन काव्याच्या पुस्तकाने विडंबनकार अशी वेगळी ओळख त्यांनी मिळवली. हे सारं कमी म्हणून की काय, ‘कऱहेचे पाणी’ आणि ‘मी कसा झालो’ ही खंडात्मक आत्मचरित्रे लिहिली.

‘केशवकुमार’ या नावाने कविता लिहिल्या. इतके विपुल आणि विविध प्रकारचे साहित्य लिहिणारे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे हे शब्दप्रभू राम गणेश गडकरी यांना गुरू मानत. त्यांच्या लिखाणावर अत्र्यांचं विशेष प्रेम होतं. ‘कावळ्याला सपाटून निसर्गसौंदर्य पाहायला मिळतं म्हणून तो काय कवी होऊ शकत नाही’ किंवा ‘प्रेम, स्फूर्ती आणि खोकला या तीन गोष्टी कालत्रयीदेखील दाबून ठेवता येणार नाहीत.’ किंवा ‘उत्तम कल्पना म्हणजे निव्वळ फुलपाखरे. एकदा हातातून निसटली की, पुन्हा सापडणे कठीण’ असं नेमक्या शब्दांत लिहिणारे अत्रे. राम गणेश गडकरी यांनी ‘एकच प्याला’, ‘पुण्यप्रभाव’, ‘प्रेमसंन्यास’, ‘वेड्यांचा बाजार’, ‘राजसंन्यास’ अशी सुंदर नाटके लिहिली होती. पात्रांच्या तोंडी पल्लेदार आणि अर्थपूर्ण वाक्ये लिहिणारे राम गणेश गडकरी ‘शब्दप्रभू’ या गौरवाला प्राप्त झाले ते उगाच नाही.

वयाने तरुण असलेले अत्रे गडकरी यांच्या लेखणीतून पडणारा शब्द मुखोद्गत करीत. गडकरी अत्र्यांच्या गुरुस्थानी होते. एकलव्याने द्रोणाचार्य यांना जसं गुरू मानलं होतं, तसंच अत्र्यांचीही गडकरी यांच्याशी भेट झालेली नव्हती. त्यांना भेटावं असं त्यांच्या मनात खूप होतं… आणि तो योग लवकरच अत्र्यांच्या तारुण्यात आला. अत्रे किर्लोस्कर थिएटरमध्ये कोणतं तरी नाटक बघण्यासाठी गेले होते. नाटक संपल्यावर जवळ असलेल्या जोगळेकरांच्या हॉटेलात चहा प्यायला गेले. तिथे त्यांचे स्नेही भालचंद्र धडफळे हे राम गणेश गडकरी यांच्यासोबत चहा घेत असताना त्यांनी अत्र्यांना पाहिलं. अत्र्यांची गडकरींवर असलेली भक्ती त्यांना माहीत होती.त्यांनी अत्र्यांच्या दंडाला धरून त्यांना थेट गडकरींसमोर उभे केले आणि म्हणाले, “मास्तर, हा मुलगा तुमचा मोठा भक्त आहे बरं का! आणि याला कविता करण्याचा फार नाद आहे.”

गडकरी तरुण अत्र्यांकडे बघून हसले आणि म्हणाले, “आम्हाला आणून दाखवा तुमच्या कविता.” पडत्या फळाची आज्ञा! दुसऱयाच दिवशी अत्रे त्यांच्या कवितेची वही घेऊन गडकरींच्या घरी गेले. अत्र्यांनी त्यांच्या कवितेच्या वहीत सगळ्या कविता लिहून ठेवल्या होत्या आणि त्या वहीवर मोठ्या अक्षरांत ‘फुलबाग’ असं लिहिलं होतं. त्या वहीचा पुठ्ठा थोडासा निसटला होता. वही हातात घेतल्यावर गडकरी लगेच म्हणाले, “अत्रे, तुमच्या ‘फुलबागे’ला कुंपण जरा नीट घाला की!”

[email protected]