>> अभिराम भडकमकर
सत्यदेव त्रिपाठी हे हिंदी भाषिक नाटय़प्रेमींना, साहित्यप्रेमींना नवीन नाही. सत्यदेव त्रिपाठींनी लिहिलेलं व्यक्तिचित्रांचं पुस्तक ‘रंग यात्रियों के राहे गुजर’ नुकतंच प्रकाशित झालं. आपल्या पूर्व सुरींना जाणून घेण्यासाठी, अगदी नाकारायचं असेल तरीसुद्धा समजून घेऊन नाकारण्यासाठी अशी पुस्तकं खूप महत्त्वाची ठरतात. म्हणून जिथे रंगभूमी आहे तिथे असे सत्यदेव महत्त्वाचे ठरतात, गरजेचे ठरतात.
सत्यदेव त्रिपाठी हे हिंदी भाषिक नाटय़प्रेमींना, साहित्यप्रेमींना नवीन नाहीत. ते गेली अनेक वर्षे पत्रकारिता आणि समीक्षण करत आलेले आहेत. आधी एक प्रेक्षक म्हणून आणि नंतर एक समीक्षक म्हणून नाटक पाहत असतानाच ते नाटकवाल्यांच्याही खूप जवळ आले. नाटकवाल्यांना भेटणं, त्यांच्या निर्मितीची प्रक्रिया समजून घेणं याचा त्यांना जणू छंदच जडला. त्या छंदातून त्यांना अनेक लोक भेटले. त्यांच्याशी त्यांचं मैत्र जडलं. मग हिंदीमध्ये ‘संस्मरण’ या नावाने अत्यंत प्रसिद्ध असलेला फॉर्म त्यांनी हाताळायला सुरुवात केली.
आपल्याकडे व्यक्तिचित्रण खूप लिहिलं जातं. हा तसाच काहीसा फॉर्म असलेलं सत्यदेव त्रिपाठींनी लिहिलेलं व्यक्तिचित्रांचं पुस्तक ‘रंग यात्रियों के राहे गुजर’ नुकतंच प्रकाशित झालं. एक वक्ता म्हणून मी त्याला उपस्थित होतो. मुळात व्यक्तिचित्रण म्हटलं की आपल्याकडे दोन प्रकार दिसतात. एक सगळय़ात लोकप्रिय म्हणजे प्रचंड स्तुती. ज्याला महिमामंडन असं आपण म्हणू शकतो. किंवा त्या व्यक्तीबद्दलचा आपल्या मनातला आकस व्यक्त करण्याचं एक साधन. पण माणसं निरखण्याची आणि समजून घेण्याची ओढ असलेली माणसं या दोन्ही वाटांनी जात नाहीत.
सत्यदेव त्रिपाठींनी महिमामंडनाचा रस्ता टाळलेला आहे. हबीब तन्वीर, ए. के. हंगल, सत्यदेव दुबे, बन्सी कौल, दिनेश ठाकूर, अरुण पांडे यांच्यासोबत तुलनेने तरुण असलेल्या विजयकुमार या रंगकर्मीबद्दल लिहिलेलं आहे.
या पुस्तकाचे वैशिष्टय़ म्हणजे एका प्रेक्षकाच्या आणि एका समीक्षकाच्याही दृष्टीने ते या सर्वांच्या रंगभूमीवरील योगदानाचं चित्रण करतात. हबीब तनवीरांच्या नाटकातलं भारतीयत्व पाश्चात्य नाटक शिकायची संधी मिळाल्यानंतरही कसं कायम राहिलं, याची प्रक्रिया ते खूप सुंदर पद्धतीने उलगडून दाखवतात. ए. के. हंगल यांच्या चित्रपटातल्या झगमगाटी आयुष्याच्या पलीकडे असलेलं इपटा आणि नाटक याचं ते वर्णन करतात. रंगभूमीवर हा माणूस शेवटपर्यंत कसा ऊर्जेने काम करत राहिला आणि कसं वेगवेगळं काम करत राहिला याची मांडणी ते करतात. बन्सी कौल यांच्या रंगभूमीविषयीच्या चिंतनाचा ते आढावा घेतात.
दिनेश ठाकूर हे मुंबईसारख्या ठिकाणी वास्तव्य करून हिंदी मालिका आणि चित्रपटांमध्ये मोठमोठय़ा संधी स्वीकारत असतानाच मुंबईमध्ये हिंदी नाटक जिवंत ठेवण्यासाठी कसे अथक प्रयत्न करत असतात हेही त्यांनी दाखवून दिलं आहे. तर अरुण पांडे जबलपूरसारख्या ठिकाणी राहून कसं निष्ठेने नाटक करत राहतात याचं वर्णन करतात.
हे करत असताना या मंडळींच्या थोरपणाला ते मनमोकळी दाद देतात. विपरीत परिस्थितीमध्ये नाटक करण्याचा प्रयत्न करणाऱया मंडळींच्या मानसिक आंदोलनांचाही धांडोळा घेतात. पण तरीही हे पुस्तक केवळ या सात व्यक्तींच्यापुरतं मर्यादित राहत नाही तर हिंदी रंगभूमीवरील विविध गावांमध्ये, विविध प्रदेशांमध्ये राहून काम करणाऱया या लोकांच्या निमित्ताने हिंदी रंगभूमीचा ते सांस्कृतिक इतिहासच आपल्यासमोर मांडत असतात. ही माणसं ज्या काळामध्ये काम करत होती त्या काळाचा एक विस्तीर्ण पट ते आपल्यासमोर यातून उभे करतात.
…आणि म्हणून हे औपचारिक इतिहास लेखन नसलं तरीसुद्धा तत्कालीन हिंदी रंगभूमीचा कलात्मक इतिहासच ते मांडून जातात. या दृष्टीने या पुस्तकाचं महत्त्व खूप मोठं आहे. आपल्याकडे अशा पद्धतीच्या
डॉक्युमेंटेशनची संग्रहीकरणाची परंपरा फारच क्षीण आहे.
दुसरं मोठेपण आणि वेगळेपण हे की, ते या व्यक्तींच्या कर्तृत्वाचा म्हणजे रंगमंचीय कर्तृत्वाचा जसा आढावा घेतात तसंच माणूस म्हणून असलेलं त्यांचं वर्तन व त्याची समीक्षा करण्याचा प्रयत्न करतात. या सर्वांच्या अतिशय जवळ गेल्यामुळे माणूस म्हणून असणाऱया त्रिपाठींना दिसलेल्या, जाणवलेल्या उणीवा आणि त्रुटींवर इथे भाष्य करायला ते डगमगत नाही. सत्यदेव दुबे यांची फकिरी ही सन्माननीय असली तरीसुद्धा दुसऱयाचा अनेकदा सन्मान त्यांना राखता येत नसे हे ते बिनधास्तपणे लिहून जातात. ए.के हंगल यांची रंगभूमीवरील निष्ठा वादातीत असली तरी त्यांच्या संस्थेतील उलथापालथीवर त्रिपाठींनी केलेले विश्लेषण त्यांना अजिबात रुचत नाही. त्यावर संवाद आत्मपरीक्षण न करता ते त्रिपाठींशी संबंधच तोडू पाहतात, हेही त्यांनी त्यात नमूद केलं आहे. दिनेश ठाकूरांच्या नाटकात येत गेलेली मोनोटोनी साचलेपण ते दर्शवतात. विजयकुमार या तरुण रंगकर्मीच्या कामाबद्दल ते खूप आपलेपणाने लिहितात. ही व्यक्तिचित्रं म्हणजे केवळ गौरव, कर्तृत्व, स्तुती यापलीकडे जाऊन एकाच वेळी सर्जनशीलतेच्या शिखरावरती असलेली माणसं त्यांना व्यक्तिगत जीवनामध्ये कशी दिसली हेही दाखवण्याचाही त्यांनी प्रयत्न केला आहे.
डॉ. लागू यांचे ते विलक्षण चाहते. पण त्यांच्याशी काही वैयक्तिक क्षण त्यांना घालवता आले नाहीत, पण डॉ. लागूंची जवळजवळ 15-16 तासांची एक मुलाखत त्यांना घेता आली. किंबहुना डॉक्टरांनी मोठय़ा मनाने मला ती घेऊ दिली असं ते म्हणतात. या मुलाखतीमध्ये डॉक्टर आपला संपूर्ण प्रवास मांडत जातात. सकस अभिनय आणि वैचारिक स्पष्टता असलेला एक अभिनेता म्हणून ते त्यांच्याकडे पाहतात. आपल्यालाही डॉक्टरांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक नवे पैलू कळत जातात.
ही सात व्यक्तिचित्रणे आणि एक मुलाखत नाटय़कर्मींना पाठय़पुस्तकासारखं नाटक आणि जगणं या दोघांचं एक प्रशिक्षण देऊन जातं. या पुस्तकाच्या प्रकाशनाला सुरेंद्र वर्मा या हिंदीतील ज्येष्ठ नाटककाराची उपस्थिती होती. वर्माजींचं नाटय़ आणि साहित्य कर्तृत्व सर्वच जाणतात. त्यांना विचारलं की तुम्ही आत्मचरित्र का लिहित नाही, तर ते हसून म्हणतात, ‘इस से त्रिपाठी जी का नुकसान हो जायेगा। ये काम मैने उनके लिये छोडा है।’
लवकरच वर्माजींवरचं गेली अनेक वर्षं तयार करत असलेलं संस्करण आपल्याला वाचायला मिळेल अशी घोषणाही त्या दिवशी झाली. एकूणच हा कार्यक्रम केवळ एका पुस्तक प्रकाशनापुरता मर्यादित नव्हता तर हिंदी रंगभूमीवरील चढ-उतार निर्माण झालेलं मास्टरपीस, त्या पाठीमागची प्रक्रिया, हिंदीतील ज्येष्ठ रंगकर्मींचं रंग चिंतन या सगळय़ाचा आढावा घेणारा ठरला. अशा प्रकारची अधिकाधिक पुस्तकं मराठीतही लिहिली जायला हवीत. याला इतिहास म्हणायचा की बखर म्हणायची यावर विद्वान खूप वाद घालू शकतील. पण आपल्या पूर्वसुरींना जाणून घेण्यासाठी, अगदी नाकारायचं असेल तरीसुद्धा समजून घेत नाकारण्यासाठी अशी पुस्तकं खूप महत्त्वाची ठरतात. म्हणून जिथे रंगभूमी आहे तिथे असे सत्यदेव महत्त्वाचे ठरतात, गरजेचे ठरतात.
– [email protected]
(लेखक नाटय़कर्मी असून नाटय़क्षेत्राचे अभ्यासक आहेत)