पाऊलखुणा – बस्तरचे अद्भुत

>> आशुतोष बापट

कोटमसर, कैलाश आणि मांदरकोंटा या छत्तीसगडमधील लवणगुंफा पाहणं म्हणजे थरारक आणि देखणा अनुभव असतो. बस्तरच्या गुहांमधले हे थक्क करणारे निसर्गनवल अद्भुत असेच आहे.

विपुल निसर्गसंपदा लाभलेला छत्तीसगड प्रदेश आणि तिथे असलेली विविध ठिकाणे केवळ अवर्णनीय आहेत. या प्रदेशाबद्दल बोलण्यासारखे बरेच काही आहे. खरंतर बोलण्यापेक्षा इथे जाऊन इथले सगळे वैभव अनुभवायला हवे. जशी इथे प्राचीन देवळे आहेत तशीच मोठी निसर्गसंपदाही आहे. निसर्गात निर्माण झालेले नवलविशेषसुद्धा इथे बघायला मिळतात. लवणस्तंभांच्या गुहा हे त्याचेच उदाहरण. खरंतर हे जमिनीखालचे अद्भुत आहे. अशा गुहांची निर्मिती हे निसर्गाचे मोठे नवल आहे. छत्तीसगड राज्यातील बस्तर भागात या गुहा विशेषत्वाने आढळतात. जगदलपूरपासून 35 किलोमीटरवर वसले आहे ‘कांगेर घाटी राष्ट्रीय उद्यान’. कांगेर नदीच्या काठावर वसलेले हे नैसर्गिक आणि अत्यंत रमणीय स्थळ. जवळजवळ 200 वर्ग किलोमीटर क्षेत्रात विस्तारलेले हे ठिकाण. या राष्ट्रीय उद्यानात लवणगुंफा वसल्या आहेत. त्यातल्या कुटुमसर, कैलाश, मांदरकोंटा आणि दंडक या गुंफा केवळ अफलातून आहेत. कांगेर धबधबा आणि तीरथगड धबधबा हे दोन जलप्रपात याच राष्ट्रीय उद्यानात वसले आहेत. हा सगळा प्रदेश घनदाट जंगलाचा. वर उल्लेखलेल्या चारही गुहा प्रसिद्ध आहेत त्या इथे असलेल्या लवणस्तंभांसाठी. इंग्रजीत याला स्टॅलेक्टाईटच असे म्हणतात. इथला खडक कॅल्शियम कार्बोनेटयुक्त म्हणजे चुनखडीचा आहे. यातले क्षार पाण्यात विरघळतात आणि पाण्याच्या थेंबांबरोबर ते खाली झिरपतात. इथल्या उष्ण हवेने त्यातले पाणी उडून जाते आणि क्षार तसेच शिल्लक राहतात. पुढे त्याच्या अधोमुखी कांडय़ा, किंवा स्तंभ तयार होतात. हे सगळे व्हायला लाखो वर्षे जावी लागतात. कोटमसर इथल्या गुहेत स्टॅलेक्टाईटच्या नुसत्या कांडय़ा नव्हे, तर स्तंभ, भिंती तयार झाल्या आहेत, तर कैलाश गुहेत छतावर या कांडय़ांची झुंबरे तयार झाली आहेत.

जगदलपूरपासून नैऋत्य दिशेला 30 किलोमीटरवर हे ठिकाण वसले आहे ऐन जंगलात. तसाही हा सगळा प्रदेश डोंगर आणि झाडी यांनी वेढलेला. इथे येईपर्यंतचा रस्ता खूपच रमणीय आहे. एक छोटासा घाट उतरून आपण एकदम येऊन पोहोचतो ते कांगेर राष्ट्रीय अभयारण्याच्या प्रवेशद्वाराशी. इथून उजवीकडचा रस्ता जातो सुप्रसिद्ध तीरथगड धबधब्याकडे. तिकडे न जाता आपण या अभयारण्याच्या प्रवेशद्वारातून आत जायचे. इथे तुम्हाला कुटुमसर किंवा कैलाश कुठेही जायचे असले तरी नोंदणी करावी लागते. नोंदणी करून गाडी, गाईड, अभयारण्याचे प्रवेश शुल्क, गुहेमधली प्रकाशव्यवस्था या सगळ्याचे एकत्रित पैसे भरावे लागतात. प्रत्येकी 6 प्रवाशांसाठी एक गाडी दिली जाते. इथून पुढचे अंतर वनखात्याच्या उघडय़ा जिप्सी गाडीतून जावे लागते. हा रस्ता जंगलातून जातो. वाटेत बरेच जुने वृक्ष आणि त्यांच्याभोवती वाढलेली असंख्य वारुळे दिसून येतात. जंगलात वारुळे असणे म्हणजे अशा जंगलात मानवाचा पायरव अगदी कमी असल्याचे द्योतक असते. गाडीत आपल्यासोबत गाईड असतो. त्याच्या मदतीशिवाय या गुहा आणि त्यातले निसर्ग नवल समजणे केवळ अशक्य गोष्ट आहे. आपल्याला गाडी गुहेच्या जवळ आणून सोडते. इथे खडकांचे काही विशिष्ट आकार तयार झालेले आहेत. खडकांच्या दोन रांगांच्या मध्येच या गुहेचे पहिले प्रवेशद्वार केलेले आहे. दोन्ही बाजूंनी उंच खडक आणि त्याच्या पायथ्याशी असलेल्या दरवाजाशी आपण उभे असतो. इथून पुढे अगदी चिंचोळय़ा मार्गाने चालत जावे लागते. नक्की गुहा कशी असेल, तिथे जायचा मार्ग कसा असेल याचा इथून अंदाजच येत नाही.

तसेच पुढे गेल्यावर आपण एका खडकाच्या पायथ्याशी येतो. इथे गुहेचे दुसरे प्रवेशद्वार आहे. कोटमसर गुहेचा थरार इथून सुरू होतो. या दरवाजातून आतमध्ये वाकून जावे लागते. आत गेल्यावर एका बाजूला उंच खडक आणि त्याला लागून असलेल्या जिन्यावरून आपण काही अंतर खाली उतरतो. इथून पुढे आपल्याला काही पायऱया उतरून जायचे असते. इथून पुढचा मार्ग अजून चिंचोळा होतो. एक माणूस जेमतेम जाईल अशी ती वाट आहे. इथून पुढे लोखंडी गोल गोल उतरणाऱया जिन्यावरून अजून खाली उतरून जावे लागते. आपण आता जमिनीखाली जवळजवळ 70 फूट उतरलेलो असतो. आपल्या सोबत विजेरी असणे आवश्यक आहे. आपल्याकडे नसली तरी सोबतच्या मार्गदर्शकाकडे मोठय़ा उजेडाची विजेरी असते. या विजेरीच्या प्रकाशात पुढची वाटचाल करायची असते. इथून पुढे खडकाचे काही टप्पे आहेत. त्यावर पायऱया केलेल्या आहेत. त्या पायऱयांवरून अजून थोडे उतरून खाली गेल्यावर आपण सपाटीला येतो. आता इथे मात्र आपल्यासमोर एक मोठा खजिना उघडून ठेवलेला असतो. अंदाजे 20 फूट उंचीच्या एका मोठय़ा गुहेत आपण उभे असतो. आणि आपल्या समोर स्टालेक्टाईटचे भलेमोठे स्तंभ गुहेच्या छतापासून खालीपर्यंत आलेले दिसतात. या गुहेची लांबी जवळजवळ 200 मीटर इतकी आहे. गुहेच्या आतल्या भागात चालण्यासाठी सिमेंटचे रस्ते तयार केलेले आहेत. हातातल्या विजेरीच्या उजेडात आपण हे एकेक स्तंभ, भिंती, तर काही ठिकाणी आपल्या डोक्यावर लोंबणारे झुंबर असे बघताना आश्चर्याने थक्क होऊन जातो. काही काही ठिकाणी छतावर जी झुंबरासारखी नक्षी तयार झाली आहे ती जणू काही माणसानेच तयार केल्यासारखी वाटते.

या लवणस्तंभांमध्ये निरनिराळे आकार तयार झालेले दिसतात. काही प्राण्यांचे तर काही मानवी चेहऱयासारखे. आपल्यासोबतचा मार्गदर्शक विजेरीच्या प्रकाशात हे निरनिराळे आकार दाखवतो. विजेरीच्या प्रकाशात काही स्तंभ चमकतात. जणू काही एखादे स्फटिकाचे झुंबर असल्यासारखे इथे दिसते. हा सगळा नजरा अद्भुत आहे. अजून एक निसर्गनवल म्हणजे, या गुंफांमध्ये अंध बेडूक आढळतो. बेडकाची एक विशिष्ट जात, ज्याला दिसत नाही असे सांगतात. तो या गुंफामध्ये आढळणे हा कमालीचा योग म्हणावा लागेल.

असाच सगळा नजारा कैलाश किंवा दंडक या गुहांमध्ये दिसतो. स्टॅलेक्टाईटचे स्तंभ तयार व्हायला अक्षरश लाखो वर्षे जावी लागतात. आपण लाखो वर्षांपूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या या गुहेत आलेलो आहोत ही भावना फार वेगळी असते. काही ठिकाणी या गुहेच्या भिंतींवर निरनिराळय़ा रेषांनी काही आकृत्या तयार झालेल्या आहेत. आतमध्ये गुहेत तुलनेने ऑक्सिजनचे प्रमाण कमी असते. आतमध्ये आपण अचंबित होऊन अनेक गोष्टी बघत असतो तेव्हा तिथे जाणवत नाही. याबद्दल कितीही सांगितले-ऐकले तरीही मुळात हे सगळे अद्भुत तिथे जाऊन अनुभवायला हवे. नुसते वाचून ती जादू कशी काय समजणार. हा सगळा थरारक आणि देखणा अनुभव तिथे जाऊन प्रत्यक्ष घ्यायला हवा. कोटमसर, कैलाश आणि मांदरकोंटा या गुहा छत्तीसगडला जाऊन आवर्जून बघायला हव्यात. या तीनमध्ये सगळय़ात मोठी गुहा जरी कुटुमसर असली तरी इतर गुहांची प्रत्येकीची एक निराळी खासियत आहे, पण तरीही हे अद्भुत सगळीकडे अबाधित आहे. हे निसर्गनवल मात्र थक्क करणारे आहे. बस्तरच्या गुहांमधले हे अद्भुत प्रत्यक्ष अनुभवायला हवे.

[email protected]
(लेखक }ाsकसंस्वॅढतीचे अभ्यासक आहेत)