>> प्रशांत गौतम
लेखन असो की अभिवाचन असो, संपादन असो की संवादातील मुलाखती असोत, त्या प्रत्येक क्षेत्रावर आपली नाममुद्रा ठसठशीत करणाऱ्या लोकप्रिय लेखिका वीणा देव यांचे झालेले निधन साहित्य, कला क्षेत्रासाठी मोठाच धक्का आहे. गोनीदांच्या कन्या ही ओळख कायम ठेवतच त्यांनी साहित्य क्षेत्रातील वाट कायम वेगळी निर्माण केली. गतवर्षीच वीणा देव यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस पुण्यात उत्साहात साजरा झाला होता. दीपावलीचे आनंदाचे पर्व सुरू असण्याच्या काळात वीणाताईंनी देवाघरी प्रस्थान ठेवले. त्यांच्या निधनाने साहित्य क्षेत्रावर दुःखाची काळी छाया पसरली आहे. थोर ऐतिहासिक कादंबरीकार, ललित लेखक गोपाल नीलपंठ दांडेकर तथा गोनीदांच्या कन्या म्हणून वीणाताईंची पहिली ओळख असली तरी त्यांच्यावर बालपणापासूनच साहित्य-वाचन संस्कृतीचे संस्कार वडील आप्पासाहेबांनी केले.
वीणा देव यांचा जन्म 26 नोव्हेंबर 1948 सालचा. म्हणजे पुढील महिन्यात त्यांचा वाढदिवस होता. गोनीदांच्या साहित्य संस्कारात वाढलेल्या वीणा देव यांनी पुण्यातील शाहू मंदिर महाविद्यालयात मराठी विभागप्रमुख म्हणून काम केले. तेथे त्यांनी 32 वर्षे अध्यापनाचे कार्य केले. ‘मराठी कथा-कादंबऱ्यांची नाट्यरूपे’ या विषयावर सादर केलेल्या प्रबंधासाठी त्यांना पीएच.डी. ही पदवी मिळाली. लेखन, संकलन आणि संपादन हे साहित्याचे विविध प्रकार त्यांनी लीलया हाताळले असून यासंदर्भातील त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत.
‘कधी कधी’, ‘परतोनी पाहे’, ‘स्त्राrरंग’, ‘विभ्रम’, ‘स्वान्सीचे दिवस’ हे त्यांचे लेखसंग्रह वाचकप्रिय आहेत. ‘स्मरणे गोनिदांची’ हा स्मरणग्रंथ आणि यशवंत देव आणि डॉ. ह. वि. सरदेसाई यांची वीणा देव यांनी संपादित केलेली दोन सर्वार्थांनी देखणी पुस्तके आहेत. तसेच त्यांनी गो. नी. दांडेकर यांच्यावर लिहिलेल्या ‘आशक मस्त फकीर’ या व्यक्तिचित्रास महाराष्ट्र शासनातर्फे उत्कृष्ट ललित साहित्य निर्मितीचा पुरस्कार मिळाला. तसेच महाराष्ट्र शासनाच्या मराठी राजभाषा सल्लागार समितीच्या त्या माजी सदस्य राहिल्या आहेत. वीणा देव यांना मोरया गोसावी जीवन गौरव पुरस्कार तसेच साईरंग प्रतिष्ठानतर्फे कर्तृत्व गौरव पुरस्कार देण्यात आला.
डॉ. वीणा देव ठाणे जिल्हा आणि विटा येथील ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा राहिल्या आहेत. साहित्य आणि कला क्षेत्रात विविध विषयांवर अनेक ठिकाणी त्यांनी व्याख्याने दिली आहेत. मुलाखती घेणे, सूत्रसंचालन याद्वारे त्यांचा आकाशवाणी, दूरदर्शनवर सहभाग राहिला आहे. 1975 पासून गो. नी. दांडेकर लिखित विविध कादंबऱ्यांच्या अभिवाचनाचे 650 हून अधिक कार्यक्रम त्यांनी केले आहेत. तसेच गोनीदा यांच्या स्मरण-जागरणासाठी विजय देव यांच्या मदतीने त्या मृण्मयी पुरस्कार, दुर्ग साहित्य संमेलन, गोनीदा यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन अशांसारखे अनेक उपक्रम राबवीत असतात. त्यांच्या मृण्मयी प्रकाशनातर्फे त्यांनी गोनीदा यांच्या दुर्मीळ साहित्यकृती प्रकाशित केलेल्या आहेत.
लेखन, संकलन, संपादन असे साहित्य प्रकार त्यांनी लीलया हाताळले, एवढेच नाही तर अभिवाचनाच्या माध्यमातून अभिजात साहित्याच्या प्रचारामध्ये त्यांनी योगदान दिले. वीणाताई या विद्यार्थीप्रिय प्राध्यापिका होत्या. कारण त्यांच्यावर गोनीदांनी घरातच मराठी भाषा आणि साहित्याचे संस्कार केले होते. वीणा देव यांनी गो. नी. दांडेकर यांच्या कादंब्रयांच्या अभिवाचनाचे साडेसहाशेहून अधिक प्रयोग केले. गोनीदा यांच्या स्मरण-जागरणासाठी त्यांनी मृण्मयी पुरस्कार, दुर्ग साहित्य संमेलन असे उपक्रम राबविले होते. मृण्मयी प्रकाशनाच्या माध्यमातून त्यांनी गोनीदा यांच्या दुर्मीळ साहित्यकृती प्रकाशित केल्या होत्या. वीणाताईंच्या निधनाने मराठी साहित्यातील एक अभिजात पर्व संपले आहे.