>> वैश्विक
आजपर्यंत प्लुटोच्या अनेक गोष्टी आपण ऐकल्या-वाचल्या. म्हणजे 1930 मधला टॉम क्लाईड टॉम्बो यांनी लावलेला प्लुटोचा शोध आणि त्याच वेळी त्यांना आलेली प्लुटोच्या ग्रहपदाची शंका. कालांतराने 2004मध्ये तोपर्यंत ‘ग्रह’ मानला गेलेल्या प्लुटोचे ग्रहपद जाणे आणि त्याचे लघुग्रहात रुपांतर होणे वगैरे. प्लुटोचा उपग्रह शेरॉन हा इतका तुल्यबळ आहे की, त्यांच्या गुरुत्वमध्य कोणा एकाच्या बाजूने नाही. त्यामुळे ही जोडग्रहाची वैशिष्टय़पूर्ण रचना म्हणावी तर त्यांच्या कक्षेतही बरेच अशनी आहेत म्हणजे इतर ग्रहांसारखा त्यांचा मार्ग स्वच्छ नाही, परिणामी प्लुटोचा ‘पूर्ण’ग्रहाचा दर्जा काढून घेण्यात आला.
अशा या प्लुटोचे जवळून ‘दर्शन’ पहिल्यांदा घेतले ते हबल या अवकाशीय दुर्बिणीने. त्याच वेळी प्लुटोच्या ध्रुवीय भागातल्या हिमटोप्या (आईसपॅप्स) आणि त्याच्या विषुववृत्ताजवळची वेगवेगळी परावर्तितता ‘हबल’च्या लक्षात आली.
1978मध्ये प्लुटोभोवती अनेक नैसर्गिक उपग्रह फिरत असल्याचे लक्षात आले. हे उपग्रह प्लुटोभोवती घडय़ाळाच्या काटय़ांच्या पद्धतीने (क्लॉकवाईज) सहा दिवसांत फिरत होते. त्याच वेळी जेम्स क्रिस्ती यांना प्लुटोचा मोठा ‘चंद्र’ शॅरॉन (खरा उच्चार पॅरेन असे म्हणतात) हा शेरॉन प्लुटोच्या खूपच जवळून म्हणजे केवळ 19,640 किलोमीटर अंतरावरून फिरतो. हे अंतर पृथ्वी-चंद्र अंतराच्या एक-पंचमांशसुद्धा नाही. त्यानंतर प्लुटोचे निक्स, हायड्रा असेही छोटे उपग्रह 2005मध्ये आढळले. 1985मध्ये प्लुटो आणि त्याचा महा-उपग्रह शेरॉन यांनी परस्परांना लावलेली ग्रहणंसुद्धा संशोधकांना पाहायला मिळाली.
एकेकाळी आणि आजही नेपच्यूनच्या ‘गती’मध्ये गडबड करणारा प्लुटो अधिकाधिक जाणून घेण्याचे प्रयत्न झाले आणि त्यातून काही निष्कर्ष निघाले. ते यापुढेही निघतच राहतील. वैज्ञानिनक शोध अमूक एका टप्प्यावर संपला असे कधीच होत नाही. त्यातून नवीन काही सामोरं येते आणि त्याचा शोध सुरू होतो. तसाच तो प्लुटोच्या बाबतीतही होत असताना, नव्याने आलेला पुरावा असे सांगतोय की प्लुटोवर भरपूर पाणी आहे!
‘नासा’ या अमेरिकेच्या अंतराळ संशोधन केंद्राने नुकतेच जाहीर केलेय की, प्लुटो पृष्ठाखाली पाण्याचा विशाल सागर आहे! प्लुटो पुष्ठावरचा किंवा त्याच्या ध्रुवीय प्रदेशातला बर्फ तर आधीपासूनच माहीत होता. आता मात्र त्याच्या एकूणच अंतरंगात जलसाठा मोठय़ा प्रमाणावर असल्याचे दिसतेय. पूर्वी ज्याची कल्पनाही केली नव्हती इतके पाणी प्लुटोवर असल्याचे म्हटले जात असून ‘नासा’च्या ‘न्यू होरायझन, स्पेसक्राफ्ट’च्या हे लक्षात आले आहे. यावर बसलेल्या ‘राल्फ-लिनिअर एटलॉन इमेजिंग स्पेक्ट्रल अॅरे म्हणजेच लेइसा (लिसा) यंत्रणेला इन्फ्रारेड (अवरक्त) फोटोग्राफीद्वारे या जलनिधीचा सुगावा लागला आहे. ‘होटायझन’च्या ‘मते’ प्लुटोची पृष्ठीय भूरचना गुंतागुंतीची असून त्यावर बर्फाचे डोंगर आणि मिथेन तसेच नायट्रोजनच्या वाहत्या हिमनद्या आहेत (ग्लेशिअर्स). प्लुटोवर स्फटिकरूपी बर्फ आणि अमोनिया हायड्रटेसही आढळलंय.
प्लुटो पृष्ठाखालचे पाणी पृथ्वीवरच्या समुद्रापेक्षा अधिक खारट (कदाचित लोणारच्या सरोवरासारखे) आहे. प्लुटोचा अंतर्भाग उष्ण असल्याने तेथे पृथ्वीवर आहे तसेच द्रवरूप पाणीही असू शकते.
पाणी म्हणजेच पृथ्वीवरच्या सजीवांसाठी जीवन आहे. पाणी कोणत्याही स्वरूपात असेल तरी त्याचे विघटन करून पिण्यायोग्य (प्याऊ) जल आणि इंधनासाठी मुबलक हायड्रोजन प्राप्त करता येऊ शकते.मग काय माणसाचे डोळे आता ‘वसतीस्थान’ म्हणून प्लुटोकडे लागतील काय? वचने की दरिद्रता? स्वप्नं तरी ‘श्रीमंत’ असावीत या न्यायाने तसा विचार करायला हरकत नाही. पण त्यातला ‘पण’च कठीण आहे. पृथ्वी-प्लुटो अंतर जवळपास साडेपाच अब्ज किलोमीटर आहे! ‘अवघ्या’ पाच-सात कोटी किलोमीटर अंतरावरच्या मंगळावर जाताना अजून तरी फे फे उडतेय… मग प्लुटोचा विचार फारच दूरचा. तरीही तो करायला कुणाची हरकत असणार?