आभाळमाया – गतिमान विश्व

>> वैश्विक,  [email protected]

आपण जेव्हा अगदी स्थिर, शांत, निवांत बसलेलो असतो तेव्हाही आपण विराटाकार अंतराळात किती प्रचंड वेगाने फिरत असतो याचा आपल्याला अंदाज येणं कठीण. याचं कारण म्हणजे ट्रेनमध्ये बसल्यावर कितीही वेगाने प्रवास करत असताना तो वेग आपल्याला जाणवत नाही, अगदी तसंच आपलं हे अंतराळी भ्रमण आहे. मात्र ते नैसर्गिक आहे. शिवाय आपलं ‘वाहन’ असलेली पृथ्वी गुरुत्वाकर्षणयुक्त असल्याने आपण स्थिर राहू शकतो. या गुरुत्वाकर्षणाविना पृथ्वीवर जीवसृष्टीच काय, वाहत्या पाण्याचे महासागरही टिकले नसते. अंतराळयात्रीचं भ्रमण हे त्यांना कृत्रिमरीत्या गुरुत्वाकर्षणाबाहेर पाठवल्याने घडत असल्याने ते तरंगण्याचा अनुभव घेऊ शकतात. परंतु तुम्ही पृथ्वीवर स्थिर असा की अंतराळात, तुम्ही वेगवान आहातच.

आपला चंद्र पृथ्वीभोवती फिरतो. पृथ्वी आणि चंद्र सूर्याभोवती फिरतात, तर सूर्य त्याच्या सगळ्या ग्रहमालेसकट आपल्या आकाशगंगेच्या केंद्रकाभोवती फिरतो. एवढय़ावर प्रकरण थांबत नाही. मोठमोठय़ा अब्जावधी तारे मिरवणाऱ्या दीर्घिकाही (गॅलॅक्सी) भ्रमण करतच असताना ते आपल्याला जाणवतही नाही. याचं वैज्ञानिक कारण ठाऊक असलं तरी कुतूहल मात्र नक्कीच वाटतं.

येत्या तीन महिन्यांत पावसाळ्यामुळे आकाशाकडे नजर वळवता येणार नाही. खगोल अभ्यासक आणि त्याविषयी अधिक जाणून घेण्याची इच्छा असलेले या काळात थोडा ‘थिअरी’चा अभ्यास करतात. तसा एखाद्या वृत्तपत्रीय स्तंभात अपेक्षित नाही. मात्र तरुण वर्गात विज्ञानाविषयीची जाणीव निर्माण करण्याइतपत, सोप्या शब्दांत आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करतो.

आताचा विषय या वैश्विक वस्तूंच्या गतीचाच आहे. आपल्या ग्रहमालेवर सूर्याचा प्रभाव प्रचंड आहे. एका बाजूला सूर्य आणि दुसऱ्या बाजूला सारे ग्रह, धुमकेतू, अशनी यांची गोळाबेरीज करून पारडय़ात टाकली तरी सूर्याचंच पारडं खूप खाली जाईल. कारण या ग्रहमालेत जनकतारा सूर्याचं वजन 98 टक्के, तर उर्वरीत सर्वांचं वजन केवळ दोन टक्के आहे. म्हणून एक गमतीचा प्रश्न आम्ही नव्या अभ्यासकांना विचारतो की, समजा पृथ्वी अचानक ‘गायब’ झाली तर चंद्राच्या गतीचं काय होईल? बरीच उत्तरं येतात ती ‘चंद्र कुठेतरी भरकटेल…’ खरं उत्तर असं की, चंद्राची भ्रमणकक्षा थोडी बदलेल, पण तो सूर्याभोवतीच फिरत राहील!

दोन-तीन लेखांमधून आपण सर्व ग्रहांच्या ‘गती’ जाणून घेऊ.

सूर्यमालेतले दोन आंतर्गह म्हणजे बुध आणि शुक्र. ते सूर्याभोवती त्यांच्या गतीनेच, पण सूर्यापासून पृथ्वीच्या आतल्या कक्षेत फिरतात म्हणून ते आंतर्गह. त्यामुळे ते जेव्हा सूर्यबिंबापुढून जातात तेव्हा काळ्या ठिपक्यासारखे सूर्यपृष्ठाच्या पार्श्वभूमीवर सरकताना दिसतात. त्याला त्या ग्रहांचं ‘ट्रान्झिट’ किंवा अधिक्रमण म्हणतात. ते दुर्बिणीतून पाहणं हा छान योग असतो. 2012 मध्ये झालेलं शुक्राचं ट्रान्झिट पाहण्यासाठी आम्ही सुमारे पंचवीस ठिकाणी दुर्बिणी लावल्या आणि सुमारे 25 हजार प्रेक्षकांनी पाहिले. दिवसा घडणाऱ्या मोजक्या, पण रंजक खगोलीय घटनांपैकी अधिक्रमण एक महत्त्वाची गोष्ट आहे. शुक्राचे अधिक्रमण गडद काळ्या ठिपक्यासारखे दिसते. बुध मात्र आकाराने फारच लहान असल्याने आकाश निरभ्र असेल तरच नुसत्या डोळ्यांनी दिसू शकतो अन्यथा दुर्बिणीचा वापर अनिवार्य ठरतो. अशा अधिक्रमणांच्या वेळा अनेक वर्षांनी येतात.

बुध सूर्याभोवती सेकंदाला जवळपास 48 किलोमीटर या वेगाने 88 दिवसांत फिरतो. त्याचं सूर्यापासूनचं अंतर 50 कोटी 80 लाख किलोमीटर आहे (पृथ्वीचं 15 कोटी किलोमीटर). बुधाचा सूर्याभोवती फिरण्याचा वेग पृथ्वीपेक्षा जास्त असला तरी स्वतःभोवती पृथ्वीच्या तुलनेत 58 दिवसांत फिरतो. याचा अर्थ बुधावरचं वर्ष अवघ्या 88 दिवसांचं असलं तरी त्याचा दिवस मात्र पृथ्वीच्या 58 दिवसांचा असतो.

88 दिवसांचं वर्ष असणारा बुध सूर्याच्या इतक्या जवळच्या कक्षेत आहे की, तो सारखा धगधगतच असतो. सूर्याच्या एवढय़ा जवळ असूनसुद्धा त्यावर पडणारा सूर्यप्रकाश त्यामानाने त्याला परावर्तित करता येत नाही. सूर्याचा केवळ 12 टक्के प्रकाशच तो परावर्तित करत असल्याने प्रकाश-परावर्तन किंवा ‘अल्बिडो’ खूपच कमी आहे.

सूर्याच्या सान्निध्यामुळे या खडकाळ आणि साधारण 4880 किलोमीटर व्यासाच्या ग्रहावरचं तापमान दिवसा 350 अंश सेल्सिअस एवढं प्रचंड, तर रात्री उणे 170 अंश असते. तिथे त्यामुळेच सजीव काय पाण्याचा थेंबही टिकू शकणार नाही. सगळ्यांच क्षणात बाष्पीभवन होईल. तिथे चांद्रपृष्ठासारखी भूमी असली तरी एकही यान उतरलेलं नाही. मात्र मेसेंजर यानाने बुधाच्या तीन परिक्रमा करून त्याची अधिकाधिक माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला आहे. बुधाचा अक्ष त्याच्या विषुववृत्ताशी फक्त 0.5 अंशात कललेला आहे. म्हणजे त्याचा अक्ष जवळपास सरळच आहे. बुध पूर्वेला उगवून पूर्वेलाच आणि पश्चिमेला उगवून पश्चिमेलाच मावळतो. तो आपल्या क्षितिजावर अधिकाधिक 28 अंश वर येतो आणि  केवळ 2 तासच दिसतो!