आभाळमाया – ‘चेल्याबिन्सक’चा अशनीपात

>> वैश्विक 

आता नेमका उच्चार चेल्याबिन्सक की केल्याबिन्सक असा प्रश्न अनेक परदेशी भाषांबाबत पडतो. कारण त्यांची लिपी आपल्यासारखी उच्चारानुवर्ती नाही. आपल्या देवनागरी लिपीद्वारे बहुतांशी उच्चार हे वाचताना अचूक येतात. अर्थात काही अपवाद वगळता, पण हा शब्द रशियन असल्याने चेल्याबिन्सक बरोबर असावं. सध्याच्या रशियातील या प्रांतातील एका घटनेने (जी मोठी दुर्घटना होताना टळली) सारं जग हादरून गेले. कधी घडली ही घटना? काय झाला त्याचा परिणाम? पुन्हा असं काही घडेल का? आणि घडलं तर काय होईल? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

ही घटना मानवनिर्मित नाही. ती निसर्गनिर्मित आहे. त्यातही ती पृथ्वीवरची नसून अंतराळी असल्याने आपल्या हाती काही नाही. इतके सगळे सांगितल्यानंतर आता ही अंतराळी गोष्ट कधीची ते सांगायलाच हवे. 15 फेब्रुवारी 2013 या रात्रीची ही विलक्षण घटना.

वेळ होती रात्री नऊ वाजून वीस मिनिटे. या चेल्याबिन्सक येथील घडय़ाळानुसार तब्बल 18 मीटर किंवा 59 फूट व्यासाचा आणि 91,00 टन वजनाचा ‘पृथ्वीनिकट’ (नीअर अर्थ) अशनी पिंवा महापाषाण 19 अंशाच्या कोनातून सुसाट म्हणजे ताशी 69,000 किलोमीटर वेगाने पृथ्वीकडे झेपावला. तो जसाच्या तसा भूपृष्ठावर आदळला असता तर झालेल्या महाभूपंपाने, कदाचित त्सुनामीने सर्व जग हादरले असते. चेर्बाकुल गावावर तो नेमका आदळला असता तर काय झाले असते याची कल्पना केलेली पिंवा न केलेलीच बरी. कारण अशा अशनींच्या आघाताने पृथ्वी डळमळत नसली तरी जीवसृष्टीला नक्कीच धोका निर्माण होतो.

65 कोटी वर्षांपूर्वी अशाच एक अतिविशाल अशनीच्या आघाताने 10 कोटी वर्षे पृथ्वीवर असलेले डायनॉसॉरचे ‘साम्राज्य’ नष्ट झाले. आता तसे व्हायची शक्यता कमी. आता अवकाशी तंत्रज्ञान खूपच पुढे गेल्याने एवढा मोठा अशनी येऊ घातला तर त्याला अवकाशातच धक्का देऊन त्याची कक्षा बदलण्याची यंत्रणा प्रयोगसिद्ध झाली आहे. डायनॉसॉर हे महाकाय प्राणी पृथ्वीवर सर्वत्र पसरले होते. हिंदुस्थानातही होते. त्यांचे प्रचंड आकाराचे अंडे अहमदाबादच्या पीआरएल संस्थेत भग्नावस्थेत ठेवल्याचे दिसते. यातले काही डायनॉसॉर सरपटणारे, चालणारे तर काही उडणारेसुद्धा होते! ‘नीअर अर्थ ऑब्जेक्टस्’ शोधणारी तांत्रिक प्रगती झाल्यावर आता आपल्याला असे धोके वेळीच समजू शकतात, परंतु त्यापासून निश्चित बचाव करता येईल की नाही ते शंभर टक्के सांगणे कठीण.

2013 च्या घटनेपूर्वी रशियामधल्याच तुंगुस्का येथे 60 मीटर व्यासाचा महापाषाण अंतराळातून आदळला. हा सर्व जंगलभाग होता. तो जळून भस्मसात झाला. त्यातून होरपळलेली झाडे काळवंडून धाराशयी झाली. पृथ्वीवर प्राचीन काळात, जीवसृष्टीच्या आरंभीच्या काळात सर्वात मोठा पाषाण आदळला तो लघुग्रहासारखा 300 किलोमीटर व्यासाचा होता असे म्हटले जाते.

तशा तर रोज दिवस-रात्र उल्का कोसळतात. त्यांची संख्या हजारो-लाखोंच्या घरात जाते, परंतु यात बरेचसे जाड धूलीकण पिंवा छोटे दगडगोटे असतात. ते वातावरणाशी झालेल्या घर्षणाने जळून जातात. असा मीटिअर शॉवर आणि मोठय़ा दगडांचे जळते फायरबॉल ताशी 250 एवढय़ा प्रमाणात आम्हीही 1998 च्या नोव्हेंबर महिन्यात पाहिले होते. 1 मिलिमीटरपेक्षा कमी आकाराच्या उल्का जळताना चमकतात आणि राख होतात. मात्र त्यापेक्षा थोडे मोठे दगडगोटे पृथ्वीवर येताना जळून राख होऊन वातावरणात मिसळतात. पृथ्वीपृष्ठापर्यंत पोचणाऱयातील 99 उल्का पडल्याच्या ज्ञात घटना कमी असल्या तरी उल्कांचे अवशेष सापडल्याची उदाहरणे आहेत.

थेट माणसावर एखादी उल्का पडून अपघात झाल्याचे गेल्या 69 वर्षांतले एकमेव उदाहरण होते ते अमेरिकेतील अलाबामा राज्यातले. अॅन होजेस नावाची 34 वर्षांची महिला 30 नोव्हेंबर 1954 रोजी घरात निवांत झोपली असताना, अकस्मात एक 5 इंचाच किलोभर वजनाचा धोंडा थेट अवकाशातून वेगात येऊन तिच्या घराचे छत पह्डून आणि रेडिओवर आधी आपटून अॅन यांना धडकला. त्यात त्या अर्थातच जखमी झाल्या आणि पुढे या दुर्मिळ अवकाशी दगडाच्या मालकीवरून तिचा आणि घरमालकाचा वादही सुरू झाला. पुन्हा ‘चेल्याबिन्सका’ येथील अशनीपाताकडे वळायचे तर पृथ्वीपासून सुमारे तीस किलोमीटर अंतरावर असतानाच त्याचा सुदैवाने स्पह्ट होऊन तुकडे झाले. त्यातला एक प्रदर्शनात ठेवला आहे.

त्यामुळे वातावरणात ‘शॉक वेव्ह’ निर्माण झाली. हा स्पह्ट अमेरिकेने जपानवर टाकलेल्या अॅटमबॉम्बपेक्षा 26 पट अधिक होता. रात्री अचानक प्रखर सूर्यप्रकाशासारखे तेज पाहून लोक घाबरले. त्यातच या अश्नीचे तुकडे पडून 1490 माणसे गंभीर जखमी झाली. 7,200 इमारती हादरून त्यांच्या काचा फुटल्या. चेल्याबिन्सकच्या आसपासच्या सहा शहरांत या स्पह्टाचा आवाज आणि शॉक वेव्ह पसरली. मात्र जीवितहानी झाली नाही. हे पृथ्वीवासीयांचे सुदैव. या अशनीच्या आघाताचे भकित करण्यात आले होते. दिलेल्या वेळेपेक्षा 16 तासानंतर ही घटना घडली. त्याचे चित्रणही केले गेले. तंत्रज्ञान या सगळय़ाची भाकिते आणि नोंद करू शकते. तरी विराट निसर्गाला आवर घालणे दुरापास्तच. अतिविनाशी अशनी आदळलाच तर ‘नोंद’ पाहायला तरी कुणी असायला हवे ना. अर्थात तशी शक्यता फारच कमी. तेव्हा घाबरायची गरज नाही.

[email protected]