अरे, असे रेल्वे अपघात होतच राहतात! केंद्रीय मंत्र्यांचं वादग्रस्त विधान

तामिळनाडूमध्ये 11 ऑक्टोबरला मोठा रेल्वे अपघात झाला होता. तिरुवल्लूरमध्ये म्हैसूर-दरभंगा एक्स्प्रेस आणि मालगाडी यांच्यात धडक झाली. या अपघातामुळे एक्स्प्रेसच्या दोन डब्यांना आग लागली, तर 12 ते 13 डबे रुळावरून घसरले. या अपघातात सुमारे 20 जण गंभीर जखमी झाले होते. दरम्यान, तामिळनाडूतील या दुर्घटनेवर केंद्रीय मंत्री ललन सिंह यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. त्यांच्या या विधानामुळे लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

केंद्रीय मंत्री ललन सिंह यांनी तामिळनाडूमध्ये झालेल्या अपघातावर प्रतिक्रिया दिली. रेल्वे अपघात हे होतच असतात आणि ते जाणीवपूर्वक होत असतात असे त्यांचे म्हणणे आहे. याबाबत रेल्वे मंत्रालय चौकशी करत असून लवकरच कारवाई केली जाईल, असे असंवेदनशील विधान यावेळी त्यांनी केले.

नवरात्रीनिमित्त बिहारमध्ये सुख, शांती आणि समृद्धी नांदो, अशी आम्ही देवीकडे प्रार्थना करतो. बिहारमध्ये गेल्या 20-22 वर्षांपासून बंधुभावाची जी भावाची लोकांमध्ये जी भावना आहे ती तशीच कायम राहो, असेही ते यावेळी म्हणाले.

दरम्यान, केंद्रीय मंत्री लालन सिंह यांच्या असंवेदनशील वक्तव्यावरून आता राजकारण आणखी तापले आहे. तसेच नागरिकांमध्येही संतापाची लाट पसरली आहे. केंद्रीय मंत्र्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसने मोदी सरकारवर सडकून टीका केली.

रोजच रेल्वे अपघात होत आहेत, लोकांचे जीव जात आहेत, लोक जखमी होत आहेत. आणि नरेंद्र मोदींचे असंवेदनशील मंत्री याला ‘छोटी घटना’ म्हणून टाळाटाळ करत आहेत. हे लज्जास्पद आहे, असा हल्लाबोल काँग्रेसने केला आहे.