नगरमध्ये भाजप इच्छुकांच्या मुलाखतीदरम्यान दोन गटांत गोंधळ

निवडणुकीमध्ये आम्हालाही संधी मिळाली पाहिजे, असे म्हणणे मांडताना पक्षश्रेष्ठींसमोरच भाजप पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घातला. जे निरीक्षक आहेत, तेच पक्षपातीपणा करत आहे, असे दिसल्यानंतर मोठा वादंग निर्माण झाला. या घटनेची माहिती समजताच नगरच्या राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली. या गोंधळामुळे भाजपच्या दोन गटांमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे.

भाजपाने प्रत्येक जिह्यात निरीक्षकाची नियुक्ती केली आहे. या निरीक्षकांनी जिह्याचा आढावा घेऊन एकत्र अहवाल द्यायचा आहे. त्यानुसार नगरमधील शासकीय विश्रामगृहावर पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये इच्छुक उमेदवार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

शेवगाव-पाथर्डी मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार मोनिका राजळे यांच्या विरोधात भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी थेट आरोप करत आपण निवडणूक लढणार, असे जाहीर केले होते. त्यांनी शेवगावमध्ये मेळावाही घेतला होता. पाथर्डी-शेवगाव मतदारसंघासाठी भाजपमधील इच्छुकांच्या मुलाखती सुरू असताना गोंधळ उडाल्याचा प्रकार घडला.

नगर जिह्यातील पाथर्डी-शेवगाव मतदारसंघात जोरदार रस्सीखेच आहे. त्यातच भाजप इच्छुकांच्या मुलाखती सुरू असताना गोंधळ उडाल्याने भाजपच्या दोन गटांमधील अंतर्गत कलह समोर आला आहे. नाशिकचे प्रभारी आणि नगर जिह्याचे निवडणूक निरीक्षक म्हणून विजय साने मुलाखती घेत होते. यावेळी विद्यमान आमदार मोनिका राजळे पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

मुलाखतीत खोटे पदाधिकारी दाखवून मत नोंदणीचा प्रयत्न केल्याने दोन गटांत चांगलाच वाद झाला. काही पदाधिकाऱ्यांना मुलाखतीबाबत कळविले नाही, असे काहींनी सांगितले. गोंधळ उडाल्यामुळे विजय साने यांनी काही काळ कामकाज थांबविले होते.