भाजपकडून मनोज जरांगे यांची मनधरणी, शुक्रवारी पहाटे 2.30 वाजता राधाकृष्ण विखे आंतरवालीत

लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही भाजपचे पानिपत करणार असल्याचे स्पष्ट संकेत मनोज जरांगे पाटील यांनी दिले आहेत. मराठा मतांमुळे होणारी पडझड टाळण्यासाठी भाजपकडून जरांगे यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू झाले असून शुक्रवारी पहाटे 2.30 वाजता देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरांगे यांची भेट घेऊन त्यांच्याशी बंद दाराआड चर्चा केली.

आचारसंहिता लागण्यापूर्वी मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा यासाठी मनोज जरांगे प्रचंड आग्रही होते. परंतु मिंधे सरकारने त्याकडे कमालीचे दुर्लक्ष केले. भाजप नेते तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच मराठा आरक्षण रखडले असा आरोप करत मनोज जरांगे यांनी बुधवारी विधानसभा निवडणुकीत भाजपला धडा शिकवण्याची भाषा केली. 20 ऑक्टोबरला होणार्‍या मराठा समाजाच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी जाहीर केले.

मनोज जरांगे यांनी 20 ऑक्टोबरच्या बैठकीत भाजपच्या विरोधात कोणतीही भूमिका घेऊ नये यासाठी भाजपकडून आता आटापिटा चालू झाला आहे. त्यासाठीच देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू राधाकृष्ण विखे पाटील हे पहाटे अडीच वाजता आंतरवालीत दाखल झाले. मनोज जरांगे आणि राधाकृष्ण विखे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. मात्र या चर्चेचा तपशील समजू शकला नाही.