आता पाठक झाला श्रीजेशचा वारसदार! आशियाई अजिंक्यपद स्पर्धेसाठी हिंदुस्थान हॉकी संघाची घोषणा

स्टार गोलरक्षक पी. आर. श्रीजेशच्या निवृत्तीनंतर आता हिंदुस्थानचा गोलरक्षक कोण असणार याकडे तमाम हॉकीप्रेमींच्या नजरा लागल्या होत्या. मात्र, बुधवारी आशियाई अजिंक्यपद चषक स्पर्धेसाठी हिंदुस्थानचा 18 सदस्यीय संघ जाहीर झाला. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये राखीव असलेल्या कृशन बहादूर पाठकला श्रीजेशचा वारसदार म्हणून निवडण्यात आले आहे. याचबरोबर सूरज करकेरा याला राखीव गोलरक्षक म्हणून संघात घेण्यात आले आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानी हॉकी संघाला सलग दुसऱ्यांदा कांस्यपदक जिंकून देण्यात श्रीजेशने बहुमोल भूमिका बजावली होती.

चीनमध्ये 8 ते 17 सप्टेंबरदरम्यान ही आशियाई अजिंक्यपद चषक स्पर्धा रंगणार आहे. हरमनप्रीत सिंहच्या नेतृत्वाखालील हिंदुस्थानी संघाच्या उपकर्णधारपदाची धुरा विवेक सागर प्रसादकडे सोपविण्यात आली आहे. नियमित उपकर्णधार हार्दिक सिंह, मनदीप सिंह, ललित उपाध्याय, शमशेर सिंह व गुरजंत सिंह यांना विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे उदयोन्मुख ड्रग फ्लिकर जुगराज सिंह ज्युनियर यालाही संघात संधी मिळाली आहे. अराइजीत सिंह  हुंडल हेदेखील ड्रग फ्लिकर असतील. जरमनप्रीत सिंह, अमित रोहिदास, हरमनप्रीत सिंह, जुगराज सिंह, संजय व सुमित यांच्यावर संरक्षण फळीची जबाबदारी असेल. मधल्या फळीत राजकुमार पाल, नीलाकांता शर्मा, मनप्रीत सिंह व मोहम्मद राहील यांच्यावर विश्वास दाखविण्यात आला आहे. आघाडीच्या फळीत अभिषेक, सुखजीत सिंह हुंडल, ज्युनियर संघाचा कर्णधार उत्तम सिंह व गुरजोत सिंह हे कौशल्य पणाला लावतील.

निवड झालेला हिंदुस्थानी संघ

गोलरक्षक     ः कृशन बहादूर पाठक, सूरज करकेरा.

संरक्षण फळी ः जरमनप्रीत सिंह, अमित रोहिदास, हरमनप्रीत सिंह, जुगराज सिंह, संजय, सुमित.

मधली फळी  ः राजकुमार पाल, नीलाकांता शर्मा, विवेक सागर प्रसाद, मनप्रीत सिंह, मोहम्मद राहील.

आघाडीची फळी ः अभिषेक, सुखजीत सिंह, अराइजीत सिंह हुंडल, ज्युनियर टीम के कप्तान उत्तम सिंह, गुरजोत सिंह.

मुख्य प्रशिक्षक ः  व्रेग फुल्टोन.