आंजर्ले खाडी गाळाने भरली; मासेमारांची अडचण, गाळ काढण्यात प्रशासनाला अपयश

आंजर्ले खाडीत मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. मासेमारांकडून शासनाकडे वर्षानुवर्षे मागणी करूनही आंजर्ले खाडीत साचलेला गाळ काढला जात नसल्याने अडखळ तसेच आंजर्ले खाडीतून मासेमारी होड्या समुद्रात लोटताना आणि समुद्रातुन होड्या परत अडखळ आंजर्ले खाडी किनाऱ्यावर आणताना मासेमारांना खुपच त्रा, होत आहे. ही समस्या सोडवण्यासाठी शासन आणि प्रशासनाला अपयश येत आहे.

दापोली तालुक्यातील हर्णे बंदर हे जिल्हयात मासेमारीसाठीचे दुस-या क्रमांकाचे बंदर ओळखले जाते. या हर्णे बंदरात मासेमारांना आपल्या मासेमारी होड्या लावण्यासाठी जेटी बांधण्यात यावी यासाठी मासेमारांकडून वर्षानुवर्षे सरकारचे उंबरठे झिजवले गेले. पत्र व्यवहारही केला गेला. मात्र जेटी काही झाली नाही. त्यामुळे जेव्हा जेव्हा समुद्रात वादळसदृष्य परिस्थिती निर्माण होते. तेव्हा तेव्हा सुरक्षित ठिकाण म्हणून अडखळ आणि आंजर्ले खाडीच्या किना-यावर मासेमार आपल्या मासेमारी होड्या आणून लावतात. शिवाय होड्या दुरुस्ती साठीही हाच आंजर्ले अडखळ खाडी किनाऱा सुरक्षित आहे. मात्र, मासेमारी होड्या आणण्यासाठीचा मार्ग पुर्णपणे गाळाने भरला आहे. त्यामुळे या साचलेल्या गाळात होड्या रुतण्याचे अनेकदा प्रकार घडलेले आहेत. त्यामुळे येथून खाडीच्या किना-यावर होड्या आणताना मासेमारांना अचडणी येत आहेत.

आंजर्ले खाडीत गाळ साचून तयार झालेल्या गाळाच्या भाटीमुळे मासेमारांना केवळ शासनाच्या नाकर्तेपणामुळे त्रास सहन करावा आहे. देशाच्या स्वातंत्र्याची पंचाहत्तरी उलटून गेली तरी ना हर्णे बंदरात जेटी झाली ना आंजर्ले खाडीतील गाळ काढण्याची समस्या सुटली. त्यामुळे मासेमारांच्या या रास्त समस्यांच्या सोडवणूकीसाठी शासनकर्त्यांना अजून किती काळ लागणार असा सवाल मासेमार करत आहेत.